सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019   
Total Views |




लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढत भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचा गड राखणार का? त्यांचे मताधिक्क्य वाढणार की घटणार? असे अनेक प्रश्न बारामती मतदारसंघासह संपूर्ण राज्याला पडले होते. अखेर आजच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. दोन वेळेस खासदार असलेल्या व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देत सुळे यांना आव्हान दिले होते. कुल यांचे पती आ. राहुल कुल यांनीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावत सुळे यांच्यासमोर आव्हान उभे करत चुरस निर्माण केली होती.

 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले होते. मागील पंचवार्षिकमध्ये झालेल्या मतदानात यंदा 3 टक्क्यांची वाढ झाली होती. हा वाढलेला टक्का कुल यांच्या बाजूने झुकतो की काय, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, हा वाढलेला मतदानाचा टक्काच सुळे यांच्यासाठी तारणहार ठरला. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. आजतागायत काही अपवाद वगळता पवार कुटुंबाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे.

 

२०१४च्या निवडणुकीत महादेव जानकरांनी झटका दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आत्मपरीक्षण करत मागील पाच वर्षांत मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवला होता. तसेच जनतेच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. याशिवाय कांचन कुल या नवख्या उमेदवार होत्या. यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती व ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने त्यांचे संघटन कमी पडले. तसेच शहरी भाग सोडता इतर ठिकाणी भाजपची ताकद कमी असल्याने कुल यांना १ लाख, ५४ हजार, ९९४ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@