पराभूत मानसिकतेचे बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |




निकाल लागायच्या आधीच सुरू झालेली रडारड ही कसली लक्षणे मानायची? किमान शब्दांत वर्णन करायचे तर, ‘मनाने हरलेली माणसे’ एवढेच त्याचे वर्णन करता येईल. बहुसंख्य मतांनी निवडून येणारे नेते हे काही आपल्याला नवे नाही. मात्र, निकाल लागायच्या आधीच आपला पराजय मान्य केलेले नेते आणि पक्ष मात्र आपण पहिल्यांदाच पाहात आहोत.

 

घरातले एखादे मूल नापास झाले की, घरातील वडीलधार्‍यांचे म्हणणे ठरलेलेच असते. शाळा कशा नीट शिकवित नाहीत ते शालेय बोर्डच कसे निकृष्ट दर्जाचे, यांसारख्या असंख्य तक्रारी पुढे यायला लागतात. फारच कमी घरातून मुलाने अभ्यास केला नाही, अशी सरळ कबुली दिली जाते. २०१९च्या निवडणुका याही सर्वच राजकीय पक्षांच्या परीक्षा घेणार्‍याच होत्या. आता मुद्दा असा, निकाल लागायच्या आधीच सुरू झालेली रडारड ही कसली लक्षणे मानायची? किमान शब्दांत वर्णन करायचे तर, ‘मनाने हरलेली माणसे’ एवढेच त्याचे वर्णन करता येईल. बहुसंख्य मतांनी निवडून येणारे नेते हे काही आपल्याला नवे नाही. मात्र, निकाल लागायच्या आधीच आपला पराजय मान्य केलेले नेते आणि पक्ष मात्र आपण पहिल्यांदाच पाहात आहोत. वस्तुत: विजयाचे श्रेय मनमोकळेपणे स्वीकारणार्‍या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव अशी काही सन्माननीय नावे नक्कीच घेता येतील.


१९७१ साली इंदिरा गांधींवर खुद्द अशी परिस्थिती ओढवली होती की, अंतर्गत वादांमुळे त्यांनी ‘गाय-वासरू’ चिन्ह घेऊन लोकसभेची निवडणूक लढविली होती. आता ‘गाय-वासरू’ चिन्ह घेऊनही इंदिरा गांधींनी आपल्या करिष्म्याच्या आधारावर ही निवडणूक दणदणीत फरकाने जिंकली. यानंतर विरोधकांनी जी रडारड सुरू केली, त्याला काही तर्कच नव्हता. आपल्या ठाकरी शैलीतल्या फटकार्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाळासाहेबांचे एक वाक्य त्यावेळी गाजले होते. शिवाजी पार्कातल्या सभेत बाळासाहेब म्हणाले होेेते की, “हा विजय गाईचा नाही, बाईचा नाही, हा विजय आहे शाईचा.” त्यावेळी बॅलेट पेपरवर मतदान होत होते. मतदान पत्रिकांवर शिक्के मारले जात. बाळासाहेबांनी असा आरोप केला होता की, “लोकांनी अन्य कुठल्याही चिन्हावर शिक्का मारला तरी त्यावरची शाई अदृश्य होते आणि गाय-वासरू चिन्ह असलेल्या ठिकाणी तो शिक्का उमटतो.” यानंतर मतपेट्या पळविल्या जाण्याचे आरोप होते.

 

बंगालमध्ये तर तृणमूल कार्यकर्तीचा बटण दाबण्याचा व्हिडिओेदेखील व्हायरल झाला होता. वस्तुत: असा आरडाओरडा व्हायला लागला की, पराभव निश्चित मानणारी आपली मंडळी आहेत. २०१५ साली अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढविली, त्यावेळी त्यांना लोकसभेसाठी सगळ्यात पहिल्यांदा कमी मते पडली. त्याचवेळी त्यांनी इव्हीएम यंत्रात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यात मजेशीर बाब अशी की, लोकसभेच्या मागोमाग आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत मात्र केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत चांगले मतदान झाले. तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी यावेळी ट्विट करून केजरीवाल यांना आपण खोटारडे असल्याचे मान्य कराल का? अशी विचारणा केली होती. पुढे काँग्रेसनेदेखील हाच सूर आळवला. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इथल्या निवडणुका काँग्रेस जिंकली, त्यावेळी हा आरोप पुन्हा केला गेला नाही.

 

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीबारामती भाजपने जिंकली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” असे विधान करून खळबळ माजवून दिली होती. त्यानंतर पीतपत्रकारिता करणारी वर्तमानपत्रे मूळ घटनाक्रमाचे तपशील न देता खोडसाळ बातम्या देतात, त्याचप्रमाणे पवारांनी आपल्याला कुणीतरी अन्य कुठलेही बटण दाबले की, कमळाला मतदान होत असल्याचे सांगितले होते. वस्तुत: ही रडारड नवी नाही. महत्त्वाचे म्हणजे, निकालाच्या आधीच त्यांनी हे राग आळवून घेतले होते. पराभवाची खात्री त्यांना इतकी आहे की, त्याआधीच कशाच्या तरी माथ्यावर खापर फोडून त्यांना मोकळे व्हायचे आहे. यंदा पहिल्यांदाच पवारांसमोर कुणीतरी इतके कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे त्यांनाही आपले खापर कुणाच्या तरी माथ्यावर फोडायचे आहेच.

 

वस्तुस्थितीत, लोकशाहीत इव्हीएमवर शंका घ्यायला हरकत नाही. मात्र, आपला पक्ष जिंकला की इव्हीएम उत्तम आणि अन्य पक्ष जिंकला की, मग मात्र यांना त्रास व्हायला सुरुवात होते. खुद्द सुब्रह्मण्यम स्वामीदेखील न्यायालयात गेले होते. इतक्या सार्‍या वाद-प्रवादांनंतरच निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्रणा अस्तित्वात आणली. जेणेकरून मतदाराला त्याने मतदान केलेल्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दिसावे. आता मतदान केल्यानंतर लोकांना आपण केलेल्या मतदानाची पावती पाहाता येते. आपल्या हिश्श्याचे काही हरवले की वाटते, एका अज्ञात इसमाने घातलेल्या मोहिनीचे किस्से अजरामर आहेत. तक्रार करायला आलेले सगळे नेते आपण पाहिले, तर त्यांच्या डोक्यावर घिरट्या घालणारे पराभवाचे सावट गडद आहे. चंद्राबाबूंसमोर जगनमोहन रेड्डी यांचे संकट आहे, पवारांच्या राष्ट्रवादीला घरघर लागली आहे आणि काँग्रेसचे तारू काठाला लागायला तयार नाही.

 

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काय होऊ शकते ते समोर आहे. इव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट यंत्रणा आपल्याला निवडणूक प्रक्रिया वेगाने घडवून आणण्याकरिता मदत करू शकतात. आपल्याला हवा तसा निकाल मिळविण्याचे यंत्र कदाचित वेगळ्या पद्धतीने बनवून घेता येईल आणि मग घरी बसल्याबसल्या आपल्याला पडलेल्या बहुमताचा आकडा रोजच पाहाता येईल. सध्या राहुल गांधी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी या मंडळींना अशा यंत्राची मोठी गरज आहे. किमान पुढची पाच वर्षे तरी त्यांना अशा यंत्राच्या आधारावर काढता येऊ शकतात. तरी निवडणूक आयोगाने लोकशाहीला आपल्या सहभागाने सुदृढ करणार्‍या या नेत्यांच्या गरजेचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@