अशी आहे दिव्य वेदसंपदा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |


 


ऋच: सामानि छन्दांसि पुराणं यजुषा सह।

उच्छिष्टाज्जज्ञिरे सर्वे दिवि देवा: दिविश्रित:॥ (अथर्ववेद-११/७/२४)

अन्वयार्थ-

(पुराणम्) अतिशय पुरातन, प्राचीन व जुने असले तरी सदैव नूतन भासणारे (यजुषा सह) यजुर्वेदासह (ऋच:) ऋग्वेद, (सामानि) सामवेद, (छन्दांसि) अथर्ववेद (सर्वे) हे सर्व वेदज्ञान (उच्छिष्टात्) सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वरापासून (जज्ञिरे) उत्पन्न झाले आहे. (दिविश्रित:) दिव्य अशा ज्ञानाचा आश्रय असणारे (देवा:) दिव्योत्तम, उत्कृष्टतेने परिपूर्ण असे हे वेदज्ञान (दिवि) दिव्य गुणांनी संपन्न असलेल्या जीवात्म्यांमध्ये अपूर्व साधना व बुद्धिबळाच्या माध्यमाने प्रकट होते.

विवेचन

‘वेद’ ही परमेश्वराकडून मानवमात्रासाठी मिळालेली सर्वश्रेष्ठ ज्ञानसंपदा होय. सर्वहुत यज्ञस्वरूपी ईश्वराने चार ही वेदांची उत्पत्ती केली आहे, असे ऋग्वेद व यजुर्वेदातही वर्णिले आहे. तोच धागा पकडून उपरोक्त अथर्ववेदीय मंत्रात हे सर्वोत्कृष्ट ज्ञान परमेश्वराकडून आम्हास प्राप्त झाले आहे, असा उल्लेख झालेला आहे. इथे भगवंतांसाठी ‘उच्छिष्टात्’ हा शब्द आला आहे. सामान्य भाषेत ‘उच्छिष्ट’ म्हणजे ‘उष्टे’ असा अर्थ होतो. पण, यौगिक अर्थानुसार ‘उच्छिष्ट’ म्हणजे ‘उत्=उत्तम’ असा ‘शिष्ट=उपदेष्टा (उपदेश करणारा)’ हा किंवा संपूर्ण जगातील वस्तूवस्तूंमध्ये भरून उरलेला ‘अविशिष्ट’ तो ‘परमेश्वर’ हा अर्थ निघतो; अन्यथा सामान्य अर्थ घेतल्यास वेदार्थाचा समन्वय स्थापन होऊ शकत नाही. तसेच आहे ‘पुराणम्’ या शब्दाबाबतही! ‘पुराणम्’ म्हणजे पुराण किंवा पौराणिक काळापासून असा अर्थ न घेता ‘देहली-दीप न्यायानुसार चारही वेदांपासून नित्य नूतन भासणारा असा घेण्यात यावा. सारांशरूपाने ईश्वरीय वेदज्ञान हे पुरातन भासत असले तरी, ते सर्वकाळी नित्यनूतनच आहे. कारण, वैश्विक पातळीवरील सर्व समस्यांचे समाधान करण्याचे सामर्थ्य वैदिक वाङ्मयात आहे. काळ बदलला तरी मानवाच्या प्रवृत्ती मात्र तशाच असतात. याकरिता त्यात सुधारणा घडवून चारही वेदांतील मंत्र प्रभावीपणे उपाय सुचवितात व उपदेश करतात.

याकरिता वरील मंत्रात वर्णिलेल्या चार वेदांचा परिचय हा जाणून घेणे आवश्यक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चारही वेदांच्या संकलित मंत्र समूहांना ‘मूळ संहिता’ असे म्हणतात. वैदिक वाङ्मयात ‘संहिता’ शब्द सामान्यत: ‘क्रमबद्ध मंत्रपाठ’ या अर्थाने व्यवहारात वापरला जातो. वेदांच्या चारही संहितांमध्ये क्रमाने मंत्रपाठाची व्यवस्था आहे. ज्यामध्ये स्तुती, प्रार्थना, यज्ञभाव, गेयात्मक किंवा रक्षणात्मक मंत्राचे संकलन असते, असे हे मंत्रसमूह म्हणजेच तर ‘संहिता’ होत. क्रमाने ऋक्संहिता, यजु:संहिता, सामसंहिता व अथर्वसंहिता या चार संहिताचा विचार करूया!

ही सारी सृष्टी म्हणजे परमेश्वराची यज्ञप्रक्रियाच होय! हा विशाल सृष्टीयज्ञ घ्या किंवा वेगवेगळ्या प्रसंगी आयोजित केलेले यज्ञ वा महायज्ञ घ्या, अशा यज्ञाचे संपादन करण्याकरिता होता. अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांची आवश्यकता असते. जो ऋत्विज यज्ञामध्ये स्तुतिपर मंत्रांचे उच्चारण करीत दिव्यतत्त्वांचे (देवतांचे) आवाहन करतो, त्यास ‘होता’ असे म्हणतात. अशा होतृगणांकरिता उपयुक्त अशा ऋचांचे (मंत्रांचे) संकलन ऋग्वेदात करण्यात आले आहे. ‘अध्वर्यू’ नावाचा ऋत्विजज्या गद्यात्मक मंत्रांचे उच्चारण करीत यज्ञकार्य संपन्न करतो, ते मंत्र यजुर्वेद संहितेत आहेत. ‘उद्गाता’ नावाचा ऋत्विक स्वरांसह स्तुतिपूर्ण मंत्रांचे सुमधुर गायन करतो, ते मंत्रसंकलन सामवेद संहितेत आहे, तर ‘ब्रह्मा’ नावा ऋत्विज यज्ञाचे विधिवत निरीक्षणपूर्व संचालन करतो, त्यावेळी ज्ञानपूर्वक जबाबदारी तो पार पाडत असतो. यज्ञकार्यात निर्माण होणारी विघ्ने किंवा दोष उद्भवले, तर तो त्यांना बुद्धिपूर्वक ज्ञानदृष्टीने दूर करतो, अशा मंत्रांचे संकलन अथर्ववेदात आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा समूह! ‘ऋचा’ या छन्दोबद्ध पद्यात्मक असतात. यात प्रतिपाद्य अर्थांचे स्तवन केले जाते.

 

‘ऋच्यते स्तुयते प्रतिपाद्योऽर्थो

यया सा ऋक्।’'

 

पतंजली मुनींनी आपल्या महाभाष्यात ऋग्वेदांच्या २१ शाखांचा उल्लेख केला आहे. शौनकांनी ‘चरणव्यूह’नामक परिशिष्टग्रंथात शाकल, बाष्कल, आश्वलायन, शांखायन, मांडूकायन या पाच शाखा वर्णिल्या आहेत. यात ‘शाकल’ ही शाखा परिपूर्ण असून तीच सर्वत्र आढळते, तर बाष्कल ही अपूर्ण मानली जाते. इतर तीन शाखा सध्या उपलब्ध नाहीत. ऋग्वेदीय मंत्र भागाचे क्रम दोन रूपात होतात- १. अष्टक क्रम आणि २. मण्डल क्रम!

 

अष्टक क्रमात संपूर्ण ऋग्वेद संहिता आठ अष्टकांमध्ये विभागली जाते. प्रत्येक अष्टकात आठ-आठ अध्याय मिळून एकूण ६४ अध्याय होतात. हे अध्याय पुन्हा वर्गात विभागले जातात आणि प्रत्येक वर्गात पाच-पाच मंत्र असतात. अशा प्रकारे एकूण ६४ अध्यायात २००६ वर्ग होतात. यापेक्षा मंडलक्रम अतिशय महत्त्वाचा व विज्ञानसंमत ठरतो. या मंडल क्रमानुसार संपूर्ण ऋग्वेद संहिता १० मंडलात विभागली असून यात ८५ अनुवाकआहेत. या अनुवाकांमध्ये १,०२८ सूक्तेअसून एकूण मंत्रांची संख्या १०,५८९ इतकी आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ‘ज्ञान’ हा ऋग्वेदाचा विषय आहे. या वेदाशी ‘ऐतरेय’ व ‘शांखायन’ या ब्राह्मण ग्रंथांचा संबंध आहे.

 

दुसरा वेद म्हणजे ‘यजुर्वेद’ होय. कर्मकांड या वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. यजुर्वेदाचे ‘शुक्ल यजुर्वेद’ व ‘कृष्ण यजुर्वेद अशा दोन स्वतंत्र शाखा आहेत. ‘कृष्ण यजुर्वेदा’चे मंत्रद्रष्टे वैशंपायन ऋषी व ‘शुक्ल यजुर्वेदा’चे मंत्रद्रष्टे याज्ञवल्क्य ऋषी आहेत. माध्यंदिन व काण्व अशा यजुर्वेदाच्या दोन शाखा उपलब्ध आहेत. ‘शुक्ल यजुर्वेदा’त केवळ मंत्राचाच समूह आहे, तर ‘कृष्ण यजुर्वेदा’त छंदोबद्ध मंत्र व गद्यात्मक विनियोग यांचे मिश्रण आहे. या वेदात एकूण ४० अध्याय असून मंत्रसंख्या १,९७५ इतकी आहे. शेवटचा अध्याय ‘ईशावास्योपनिषद’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘शतपथ ब्राह्मण’ व ‘बृहदारण्यक उपनिषद’ हे यजुर्वेदाशी संबंधित प्राचीन ग्रंथ आहेत. या वेदांतील मंत्र प्राधान्याने गद्यात्मक आहेत. ‘यजुभि: यजन्ति’ म्हणजेच यज्ञकार्यात यजुर्वेदाच्या मंत्रांनी आहुत्या दिल्या जातात.

 

तिसरा वेद म्हणजे ‘सामवेद’ होय. यात १८७५ इतकी मंत्र संख्या आहे. ‘पूर्वाचिकम्’ आणि ‘उत्तरार्चिकम्’ असे सामवेदाचे दोन भाग आहेत. ‘सामन्’ याचा शाब्दिक अर्थ ‘गायन’ असा होतो. अशा मंत्रांना जेव्हा विशिष्ट पद्धतीने गायले जाते, तेव्हा ‘साम’ असे म्हणतात. ‘उपासना’ हा या वेदाचा विषय आहे. यज्ञाच्या वेळी उद्गाता या मंत्रांचे सुस्वर गायन करतात.

 

या वेदाच्या हजारो शाखा सांगितल्या जातात, पण सध्या ‘कौथुमिय,’ ‘राणायमीय’ आणि ‘जैमिनीय’ या तीन शाखा उपलब्ध आहेत. हे विशेष पद्धतीने गायले जातात. ‘उपासना’ हा या वेदाचा विषय आहे. शेवटचा वेद म्हणजे ‘अथर्ववेद’ होय. या विषयी व चारही वेदांसंदर्भात आणखी विस्तृत माहिती आगामी सदरात पाहू या..!

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

९४२०३३०१७८

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@