द्रोणाचार्यांचा अंत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |



ऋषींनी सांगूनही आणि आपल्या पुत्राचा वध झाला आहे, हे ऐकूनही गुरू द्रोण शस्त्र खाली ठेवायला तयार नव्हते. त्यांचे रक्त जणू १६ वर्षाच्या मुलासारखे सळसळत होते आणि ते पांडवांच्या सैन्याचा प्रचंड संहार करत होते. त्यांनी २४ हज्जार सैनिक मारले तरी, त्यांचे समाधान होत नव्हते. क्रोधाने ते वेडेपिसे झाले होते. त्यांनी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र हातात घेतले. हे पाहून रथ नसलेल्या आणि असाहाय्य अशा धृष्टद्युम्नाकडे भीम मदतीला धावून गेला. भीमाने त्याला आपल्या रथात घेतले. ते दोघेही द्रोणांशी लढू लागले. त्यांनी द्रोणांची शस्त्रे निष्क्रिय करून टाकली, पण तरीही द्रोण ऐकत नव्हते.

 

भीमाची जागा सात्यकीने घेतली आणि भीम रथ घेऊन द्रोणांच्या जवळ आला. तो त्यांना म्हणाला, “क्षत्रियांची जागा ब्राह्मणाने घेतली आणि खूप अनर्थ झाला. खरे म्हणजे, तुम्ही दयाळू असणे आणि तुम्ही कुणालाही दु:ख न पोहोचविणे हा तुमचा धर्म! पण, तुमचे सर्व सद्गुण सोडून तुम्ही आता खाटिक झाला आहात. तुम्हाला सत्तेची आणि संपत्तीची हाव सुटली आहे. या क्षात्रधर्म पाळणार्‍या क्षत्रियांचा तुम्ही नाहक जीव घेत आहात. अज्ञानामुळे तुम्ही काय करत आहात तेच तुम्हाला समजत नाही. आपली पत्नी आणि मुलगा यांच्यासाठी तुम्हाला संपत्ती हवी असेल तर पुन्हा ऐका. तुमचा पुत्र मेला आहे. तुम्ही इतरांना धर्म शिकवता आणि स्वत: मात्र तो पाळत नाही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?”

 

त्याचे हे शब्द द्रोणांच्या जिव्हारी लागले. तो नेहमीच द्रोणांशी असे उपहासाने बोलत असे. आज मात्र द्रोणांना त्याचे हे शब्द लागले आणि त्यांना कळून चुकले की, भीम खरे बोलत असून आपलेच वागणे चुकले आहे. एका क्षणात त्यांनी आपले धनुष्य खाली ठेवले, त्यांनी राधेय आणि दुर्योधन यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, “आता तुम्ही काळजीपूर्वक युद्ध करा. मी यापुढे लढणार नाही. मी शस्त्रे खाली ठेवतो आहे. तुम्ही पांडवांपासून आपले रक्षण करा.”

 

द्रोण रथावर योगमुद्रा धारण करून बसले. त्यांच्या मनात देहत्यागाचा विचार आला. ते अलिप्त झाले. धृष्टद्युम्न हाती तलवार घेऊन पुढे आला. पण तेवढ्यात अर्जुन आला आणि म्हणू लागला, “नको! त्यांना मारू नका, आपण त्यांना जीवंत कैद करून घेऊन जाऊ.” पण, ते शब्द धृष्टद्युम्नच्या कानी पडलेच नाही. कारण, त्याला आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घ्यायचा होता. कोणतीही हालचाल करत नसलेल्या द्रोणांचे शिर त्याने हाती घेतले आणि तलवारीने त्यांचा शिरछेद केला. क्षणार्धात आभाळी तेजाचा लोळ उसळला आणि द्रोणांचे त्यांच्या पूर्वजांशी मिलन झाले. आकाशात जमलेल्या ऋषिमुनींना द्रोण भेटले. दिव्यदृष्टी लाभलेले संजय, कृप, युधिष्ठिर आणि कृष्ण यांच्याशिवाय इतर कोणालाच हे मिलन दिसले नाही.

 

धृष्टद्युम्नचे अंग द्रोणांच्या रक्ताने ओलेचिंब झाले. त्याच्या एका हातात तलवार आणि दुसर्‍या हाती द्रोणांचे शिर होते. रथातून खाली उडी मारून त्याने ते शिर भूमीवर टाकले. सर्व सैनिक भयाने आक्रोश करू लागले. धृष्टद्युम्नची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती. भीम आणि धृष्टद्युम्न यांनी एकमेकांना आलिंगन दिले. ते धुंद होऊन नाचू लागले. भीम धृष्टद्युम्नला म्हणाला, “तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली म्हणून मला खूप हर्ष होत आहे. लवकरच सूतपुत्र राधेय आणि दुर्योधन यांचाही असाच शेवट होईल तेव्हा मी तुला पुन्हा एकदा अभिनंदन म्हणून असेच मिठीत घेईन.”

- सुरेश कुळकर्णी

([email protected])

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@