इंटरनेटच्या जगात प्रतिजैविकांचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |

 


गैरवापर! काही संकेतस्थळांवर साईड-इफेक्ट्स अतिशयोक्त स्वरूपात दिले जातात. त्यामुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण होऊ शकते व त्यामुळे औषधे कोर्स पूर्ण होण्याआधीच बंद केली जातात आणि याचा परिणाम म्हणून प्रतिजैविकांना प्रतिकार तयार होतो किंवा एकंदर निष्पत्ती वाईट होते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल इन्फॉरमेटिक्समध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका इटालियन सर्वेक्षणानुसार, सामान्य जनतेतील ९१३ सहभागी सदस्यांपैकी ७३.४ टक्के लोक प्रतिजैवकांच्या वापराबाबत माहिती शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात आणि त्यापैकी ३२.३ टक्के लोक इंटरनेटद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत:च्या स्वत: औषधे घेतात. इंटरनेट आणि सोशल मीडिया हे संवादाचे शक्तिशाली स्रोत आहे. त्यांचा वापर केला जाऊ शकतो आणि घातकरीत्या गैरवापरही! प्रतिजैविकांचा वापर आणि प्रतिजैविक प्रतिकार (अँटिबायोटिक रेझिस्टन्स) यांसारख्या विषयांवरील मते सर्वत्र व्यक्त करण्याची, स्वत:च्या स्वत:समजुती पक्क्या करण्याची आणि या विषयांबाबत सोशल मीडियावर चर्चा करण्याची प्रवृत्ती अनेक लोकांमध्ये आढळते.

सहज उपलब्ध असलेल्या आणि वापरण्यासाठी अत्यंत सुलभ अशा इंटरनेटद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीवर देखरेख ठेवण्यासाठी कोणतीही शिक्षित यंत्रणा नाही, हे फार दु:खद आहे. इंटरनेट हा आता सर्व वयोगटांसाठी माहितीचा प्राथमिक स्रोत झालेला आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही वैशिष्ट्यपूर्ण औषधाची गरज नसलेल्या एखाद्या आजाराची साथ आल्याची माहिती इंटरनेटद्वारे पसरल्यास भावनाप्रधान जनतेमध्ये उन्मादाची (हिस्टेरिया) लाट निर्माण होऊ शकते आणि त्यातून प्रतिजैविकांचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे एखाद्या प्रतिजैविकाला प्रतिकार निर्माण होऊ शकतो. याचा साधा अर्थ म्हणजे एखाद्या प्रादुर्भावाचा नाश करण्यासाठी विशिष्ट प्रतिजैविक दिले तरीही तो प्रादुर्भाव त्याचा प्रतिकार करून कायम राहू शकतो.

कॉजेंट मेडिसिन २०१८मध्ये ग्रोशेक आणि अन्य अन्वेषकांनी केलेल्या एका अभ्यासात प्रतिजैविकांच्या गैरवापराचा संबंध अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्सबाबत इंटरनेटवरून प्रचंड प्रमाणात पसरणार्याै चुकीच्या माहितीशी जोडण्यात आला होता. अशा चुकीच्या माहितीतून घेतल्या गेलेल्या प्रतिजैविकांमुळे उपचारास अत्यंत कठीण अशा जीवाणूंचा अर्थात सुपरबग्जचा विकास होतो. फिजिशिअन्सना भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे, रुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे नातेवाईक हे दिलेल्या औषधांच्या साईड-इफेक्ट्सबद्दल इंटरनेटवरून माहिती शोधतात. डॉक्टर्स लाभ विरुद्ध धोकेयांचे गणित मांडूनच औषधे देतात. मात्र, काही संकेतस्थळांवर साईड-इफेक्ट्स अतिशयोक्त स्वरूपात दिले जातात. त्यामुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण होऊ शकते व त्यामुळे औषधे कोर्स पूर्ण होण्याआधीच बंद केली जातात आणि याचा परिणाम म्हणून प्रतिजैविकांना प्रतिकार तयार होतो किंवा एकंदर निष्पत्ती वाईट होते. अर्थात, युकेत अँडरसनने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करणारे लोक साधारणपणे उच्चशिक्षित असतात आणि प्रतिजैविकांच्या वापराविषयी तसेच गैरवापराविषयी त्यांना अधिक चांगली माहिती असते.

सामान्य जनतेला इंटरनेटद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीमुळे स्वत:च डॉक्टर झाल्याची भावना येते आणि ते आजारी पडतात, तेव्हा त्यांना ज्यांची अजिबात गरज नाही, अशी प्रतिजैविके घेतात. याचे सर्वाधिक आढळणारे उदाहरण म्हणजे साधी सर्दी. साधी सर्दी हा बहुतेकवेळा विषाणूजन्य (व्हायरल) आजार असतो आणि तो स्वत:हून नियंत्रणात येतो. त्यासाठी प्रतिजैविकांची गरज नसते. तरीही त्यावर उपचार म्हणून अनेकदा प्रतिजैविके घेतली जातात. अगदी छोट्या बाळांनाही प्रतिजैविके दिली जातात. दुसरे उदाहरण आहे लघवीसाठी कॅथेटर्स लावलेल्या व ज्यांची घरीच काळजी घेतली जात आहे, अशा वयोवृद्ध लोकांचे. मूत्रमार्गाच्या प्रादुर्भावासाठी (युटीआय) अनावश्यक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे असिम्प्टमॅटिक बॅक्टेरियाअर्थात प्रादुर्भावाची लक्षणे नसलेल्या जीवाणूंची उपस्थिती दिसून येते. अशा रुग्णांना प्रतिजैविकांची गरज नसते, पण दुर्दैवाने अशा रुग्णांना तीव्र प्रतिजैविके दिली जातात.

 

दुर्दैवाने, प्रतिजैविक प्रतिकारासाठी आता लिंगाचा किंवा वयाचा निकष उरलेला नाही. प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरामुळे छोटी मुले व वयोवृद्ध लोक सारख्याच प्रमाणात प्रतिजैविक प्रतिकारासह कम्युनिटी अक्वायर्ड इन्फेक्शन्सना बळी पडत आहेत, हा धोक्याचा इशारा आहे. जे रुग्ण गरज नसताना बेछूटपणे प्रतिजैविके घेतात किंवा जे रुग्ण सांगितलेल्या कालावधीच्या पूर्वीच प्रतिजैविके घेणे थांबवतात किंवा अन्य काही प्रकारे प्रतिजैविकांचा गैरवापर करतात, त्यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. मग अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. काहीवेळा इंट्राव्हेनस (आयव्ही) ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविकांचे उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. बराच काळ रुग्णालयात ठेवून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर खर्चाचा बोजा पडतो.

 

उदाहरण द्यायचे, तर गेल्या आठवड्यात १६ वर्षांच्या एका मुलीला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात, युटीआयसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सहा दिवस रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे घेतली होती. यातील सलग दोन दिवस डॉक्टरांकडून तपासून न घेता, त्यांचा सल्ला न घेता ती प्रतिजैविके घेत होती. तिने सांगितल्याप्रमाणे तिने हे प्रकार यापूर्वीही नियमितपणे केले होते (गेल्या काही महिन्यांतही) आणि त्यांचे चांगले परिणाम तिला दिसून आले होते. मात्र, यावेळी पाचव्या दिवशी तिचा ताप उलटला आणि उलट्याही सुरू झाल्या. अल्ट्रासाऊंड (युएसजी) केली असता, तिला असेंडिंग पायलोनफ्रिटिसकिंवा मूत्रमार्गात तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतर केलेल्या युरिन कल्चरमध्ये असे दिसून आले की, यातील जीवाणूंवर (ऑरगॅनिझम्स)उपचार करणे कठीण झाले आहे. कारण, सामान्यपणे वापरल्या जाणार्या बहुतेक प्रतिजैविकांना प्रतिकार निर्माण झाला आहे. त्यामुळे तिला महागडी ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके दीर्घकाळासाठी द्यावी लागणार होती. गरज नसताना वारंवार प्रतिजैविके घेतल्याचा परिणाम म्हणूनच हे झाले असावे, असा अंदाज आहे. अखेर ती रुग्ण बरी झाली, पण या प्रक्रियेत ती खूप अशक्त झाली. तिचे वजन कमी झाले. परीक्षा बुडाली आणि खिशाला चांगलीच कात्री लागली.

- डॉ. संजिथ ससीधरन

(लेखक फोर्टिस असोसिएट एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@