विणीचा हंगाम उलटल्यावर सापडले कासवाचे घरटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |



 

वेळासच्या किनाऱ्यावरील घटना ; घरट्यात आढळली १११ अंडी

मुंबई (अक्षय मांडवकर) : कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणारा सागरी कासवांचा विणीचा हंगाम संपुष्टात येऊन महिना उलटला आहे. असे असताना मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर सोमवारी सायंकाळी सागरी कासवाचे घरटे आढळून आले आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या नोंदींनुसार साधारण एप्रिल महिना उलटल्यावर मादी कासव किनाऱ्यावर अंडी घालण्याकरिता येत नाही. परंतु, सोमवारी आढळलेल्या घरट्यामुळे राज्यातील कासव संवर्धनाच्या कामामध्ये नवी नोंद झाली आहे. तज्ज्ञाच्या मते, अशा प्रकारची ही दुसरी नोंद असून यापूर्वी जून महिन्यातही कासवाचे घरटे सापडले होते.

२००३ पासून राज्याच्या कोकण किनारपट्टीवर सागरी कासव संवर्धनाचे काम सुरू आहे. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीची सागरी कासवे मोठया संख्येने आढळतात. दरवर्षी या प्रजातीच्या माद्या रत्नागिरी जिल्ह्यातील १२ आणि सिंधुदुर्गातील ६ किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. सागरी कासवांचा विणीचा हंगाम हा प्रामुख्याने डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांचा असतो. या कालावधीत मादी किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. काही वेळा एप्रिल महिन्यातही घरटी झाल्याची नोंद आहे. मात्र आता विणीचा हंगाम संपून महिना उलटल्यानंतर मादी कासवाचे घरटे आढळल्याची नोंद झाली आहे. समुद्री कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध झालेल्या वेळासच्या किनाऱ्यावर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कासवाचे घरटे सापडले. विशेष म्हणजे ठाण्याहून पर्यटनासाठी आलेल्या शिरीन वैद्य, सोहम भिडे आणि श्रेयस जोशी या पर्यटकांना किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेली मादी दिसली.






 

पर्यटकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही किनाऱ्यावर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी १११ अंडी आढळून आल्याची माहिती वेळासच्या कासव संवर्धन मोहिमेचे कार्यकर्ते विरेन्द्र पाटील यांनी दिली. सध्या पौर्णिमेनंतरची मोठी भरती सुरू असल्याने अंडी सुरक्षित राहावी म्हणून हॅचरीमध्ये कृत्रिम घरटे बांधून त्यामध्ये त्यांना हलविल्याची त्यांनी सांगितले. शिवाय सकाळी उष्णता अधिक असल्याने कृत्रिम घरट्याचे तापमान स्थिर राहावे म्हणून हॅचरीवरून हिरव्या रंगाच्या जाळीचे आच्छादन केल्याचे, पाटील म्हणाले. यंदा वेळासच्या किनाऱ्यावर सागरी कासवांची २० घरटी आढळून आली होती. त्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना सोडण्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात आले. मात्र आता पुन्हा घरटे आढळून आल्याने पावसाळ्यात पाण्यापासून घरटे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वेळासच्या कार्यकर्त्यांवर आहे.

तज्ज्ञांच्या मते, विणीचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर घरटे झाल्याची ही दुसरी नोंद आहे. यापूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरटे झाल्याची नोंद असल्याची माहिती राज्याच्या सागरी कासव संवर्धन मोहिमेचे प्रणेते भाऊ काटदरे यांनी दिली. कासव संवर्धनाची मोहिम सुरू करताना केलेल्या सर्वेक्षणात काही जुन्या लोकांनी पावसाळ्यातही कासवाची पिल्ले दिसल्याचा दावा केला होता. मात्र गेल्या १८ वर्षांतील कामादरम्यान आजवर कधीही पावसाळ्यात घरटी झाल्याची नोंद झाली नसल्याचे भाऊंनी सांगितले. तर सोमवारी सापडलेल्या अंड्यांमधील पिल्लांचा जन्मदर कमी असण्याची शक्यता या विषयावर पीएचडी करणाऱ्या सुमेधा कोरगावकर यांनी वर्तविली आहे. सभोवतालचे तापमान वाढल्यावर पिल्लांचा मृत्यूदर हा शक्यतो वाढतो. साधारणपणे तापमान वाढल्यानंतर घरट्यामधील वाळूत आर्द्रता वाढते. महाराष्ट्रातील किनारे हे खाडीक्षेत्राजवळ असल्याने तेथील वाळूमध्ये आर्द्रता निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी घरट्यामधील वाळू कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण कोरगावकर यांनी नोंदवले आहे. त्यामुळे सोमवारी सापडलेल्या घरट्याची विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे, त्या म्हणाल्या.

 

कासव विणीची प्रक्रिया

* किनाऱ्यावर वाळूत खड्डा तयार करून त्यामध्ये मादी आपली अंडी घालते.

* एक मादी कासव १०० ते १५० अंडी घालते.

 * भरतीच्या पाण्यापासून अंडी सुरक्षित राहावी म्हणून हॅचरी बांधली जाते.

 * हॅचरीमध्ये कृत्रिम घरटे तयार करून त्यामध्ये अंडी हलविली जातात.

* ४५ ते ५५ दिवसांमध्ये अंडी उबवून त्यामधून पिल्ले बाहेर पडतात.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 

 
 
 
 


@@AUTHORINFO_V1@@