पवारांचा नौटंकीबाज भाईचारा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |



भाईचार्‍याचा मुद्दा घेतला तरी शरद पवारांकडे पाहून कोणाला वाटेल का, ही व्यक्ती सामाजिक सौहार्द-सलोखा वाढीसाठी काही काम करू शकते? तर कधीच नाही. कारण, पवारांनी आतापर्यंत ‘भाईचारा’ शब्दाचाच खून पाडण्याचे काम इमानेइतबारे केल्याचे निरनिराळ्या घटनांतून दिसते व पटतेही.

 

आयुष्यभर शीरखुर्मा ओरपत दर्गा-मजारीवर चादरी चढवण्याचे काम करणार्‍या शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केदारनाथ-बद्रिनाथ धाम दर्शन फारच खुपल्याचे दिसते. पंतप्रधानांच्या मंदिरदर्शनावर प्रतिक्रिया देताना पवारांनी मोदींच्या वैयक्तिक-धार्मिक कृतीला ‘नौटंकी’ ठरवले, तर स्वतःच्या इफ्तार पार्टीला मात्र ‘भाईचार्‍या’ची कृती म्हटले. वस्तुतः देशासह अवघ्या महाराष्ट्राला कोण ‘नौटंकीबहाद्दर’ आणि कोण ‘भाईचारा वाढवणारा’ हे चांगलेच माहिती आहे. केंद्रात सर्वात पहिल्यांदा मंत्री झाल्यापासून सर्वाधिक काळ ‘भावी पंतप्रधानपदा’वर डोळा लावून बसलेल्या शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या नौटंकीचे कितीतरी नमुने सांगता येतील. पुलोदच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेवर बसताच “पुन्हा कधीही काँग्रेससोबत जाणार नाही,” असे म्हणणारे पवार नंतर मात्र सत्तेचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर विराजमान होईल, असे दिसताच काँग्रेसबरोबर गेले.

 

पुढेही सोनिया गांधींच्या विदेशीपणावर उतारा म्हणून ‘देशी काँग्रेस’ काढणार्‍या पवारांनी सत्तेचे डोहाळे लागताच सोनियांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेससोबत चांगला १५ वर्षे सत्तासुखाचा आनंद घेतल्यानंतर २०१४ साली पवारांनी भाजपबरोबरही पाट लावण्याचा प्रयत्न केलाच होता! शरद पवारांबाबत वर उल्लेखलेली ही पलटीमार कृत्ये नौटंकी नव्हे, तर काय होती? आपण करतो त्या प्रत्येक कृतीला सत्याची चाड असलेली, ‘पुरोगामी’, ‘आधुनिक’ वगैरे म्हणायचे आणि इतरांनी केलेल्या वैयक्तिक कृतीलाही ‘नौटंकी’ ठरवायचे, हेच काम करत आलेल्या पवारांना याचे उत्तर देता येईल का? भाईचार्‍याचा मुद्दा घेतला तरी शरद पवारांकडे पाहून कोणाला वाटेल का, ही व्यक्ती सामाजिक सौहार्द-सलोखा वाढीसाठी काही काम करू शकते? तर कधीच नाही. कारण, पवारांनी आतापर्यंत ‘भाईचारा’ शब्दाचाच खून पाडण्याचे काम इमानेइतबारे केल्याचे निरनिराळ्या घटनांतून दिसते व पटतेही.

 

अनेकानेक जातीयवादी संघटना पाळून राज्यात एका समाजाला दुसर्‍या समाजासमोर उभे करण्याचे श्रेय शरद पवारांकडेच जाते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी विशिष्ट जातीचा द्वेष करणार्‍या संस्था-संघटनांविरोधातही पवारांनी कधी भूमिका घेतली नाही. २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटात मुस्लीम तरुणांना अटक केल्यानंतर नेहमी नेहमी फक्त मुस्लिमांनाच का लक्ष्य केले जाते, असा सवाल पवारांनी केला होता. तद्नंतर वेगाने चक्रे फिरली व अटकेत असलेल्या मुस्लीम तरुणांवरचा दहशतवादाचा आरोप हिंदूंच्या माथी मारला गेला. हे अर्थातच पवारांच्याच विधानाचे फलित होते. पवारांचे हे कृत्य ‘भाईचार्‍या’च्या नेमक्या कोणत्या व्याख्येत बसते? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून तर शरद पवारांच्या ‘भाईचार्‍या’ला चुड लावणार्‍या राजकारणाला अजूनच काटे फुटले. केवळ सत्तेच्या हव्यासापायी हिंदू धर्मीयांत फूट पाडण्यासाठी शरद पवारांनी छत्रपती-पेशवे, पुणेरी पगडीवरून वादग्रस्त वक्तव्ये केली. परिणामी, महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला सुरुवात झाली. आजही प्रत्यक्ष समाज जीवनात आणि समाजमाध्यमांवरही कुठे ना कुठे हा द्वेषाचा सिलसिला सुरूच आहे. कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीला, हिंसाचाराला अशा जातीयवादी शब्दांची, वक्तव्यांची पार्श्वभूमी नव्हती का? म्हणूनच आज शरद पवार ज्या भाईचार्‍याच्या बाता मारतात, त्या केवळ आपल्या विशिष्ट समाजाच्या मतपेटीपुरत्याच मर्यादित असल्याचे स्पष्ट होते.

 

२००३ साली संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी तर शरद पवारांनी ‘भाईचार्‍या’चा आदर्शच घालून दिला होता. शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी उपस्थित सर्वांनीच, ज्यात काँग्रेसच्या तत्कालीन खा. नजमा हेपतुल्लादेखील होत्या, त्यांनी डोक्यावर भगवा फेटा बांधला. केवळ सोनिया गांधी आणि शरद पवारांनी आपल्या डोक्यावर फेटा बांधलेला नव्हता. असे का? महाराष्ट्राच्या मातीतल्या आणि स्वतःला ‘मराठा नेता’ म्हणवून मिरवणार्‍या पवारांना भगव्या फेट्याची लाज वाटत होती? की आपल्या या कृत्यामुळे इतके दिवस जपलेले, सांभाळलेले धर्मनिरपेक्षतेचे सोवळे गळून पडेल, अशी भीती पवारांना वाटत होती? तर तसे नव्हे, स्वतःच्या पक्षाचा मुस्लिमांशी असलेला ‘भाईचारा’ धोक्यात येऊ नये म्हणूनच पवारांनी असे केले होते.


म्हणजेच
, ज्याप्रमाणे मुस्लिमांचा ‘भाईचारा’ फक्त मुस्लिमांपुरताच मर्यादित असतो, तसेच पवारांचा ‘भाईचारा’ही फक्त स्वतःच्या गोटातल्यांपुरताच असतो, त्यात विश्वबंधुत्व तर सोडाच, राज्यबंधुत्वाचाही लवलेश नसतो, हेच स्पष्ट होते. अन् अशी व्यक्ती आज भाईचार्‍यावर बोलते, तेव्हा त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे, शरद पवार नरेंद्र मोदींबद्दल हे जे काही बोलले ते एका इफ्तार पार्टीत. म्हणूनच मोदींची केदारनाथ-बद्रिनाथ यात्रा आणि ध्यानधारणा पवारांना ‘नौटंकी’ वाटत असेल, तर मग पवारांची इफ्तार पार्टी काय समाजसेवेचे व्रत होते का? आज पवारांना मोदी हिमालयात जाऊन बसल्याचे दिसले, पण ते गेली पाच वर्षे न थकता, सुट्टी न घेता दररोज १६ ते १८ तास काम करत असल्याचे कधी दिसले नाही. असे का? की आता स्वतःच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्यामुळे सैरभैर झालेल्या माणसासारखी टीका करण्याची हौस पवार अशा वक्तव्यांतून भागवत आहेत? असे प्रश्न उपस्थित होतात.

 

दुसर्‍या बाजूला लोकसभा निवडणूक निकालाच्या पृष्ठभूमीवर विरोधकांनी इव्हीएमच्या नावाने बोंबा मारण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. इव्हीएमच्या नावाने शिमगा करण्यात शरद पवारही आघाडीवर आहेत. परंतु, शरदरावांचे पुतणे अजित पवारांनी मात्र इव्हीएमवर शंका घेता येणार नाही, असे म्हटले. म्हणजेच अजितदादांनी आपल्या काकांच्या आणि पक्षाध्यक्षांच्या नेमकी विरुद्ध भूमिका घेतली. पण असे का झाले असावे? सोबतच यंदाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवारांनी जाहीर सभेत शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनाही उघडे पाडले होते. एका सभेत मंचावरून भाषण करणारी मुलगी पंतप्रधानांबद्दल आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलत असताना शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंनी तिला रोखले नाही. अजितदादांनी त्याचाच उल्लेख करत सदर मुलीला अशी भाषा शोभत नाही, असे म्हणत झापले होते. अजित पवारांच्या बोलण्यामागे जनता मला कितीही ‘टग्या, टग्या’ म्हणत असली तरी तशी व्यक्तिमत्त्वे खुद्द शरद पवार आणि सुप्रियाताईच आहेत, हा अर्थ दडलेला होता. कारण, नंतर अपशब्द उच्चारणार्‍या मुलीला सुनावण्याचे काम अजित पवारांनीच केले होते, शरद पवार वा सुप्रिया सुळेंनी नव्हे. पण, अजितदादांनी तरी असे का केले असावे? आणखी एक गोष्ट म्हणजे, संपूर्ण मतदानात अजित पवार मुलगा पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये तळ ठोकून होते. पक्षाच्या अन्यत्रच्या उमेदवारांकडे अजित पवारांनी लक्षही दिले नव्हते. पार्थ पवारांची उमेदवारीदेखील शरद पवारांच्या माघार घेण्यातूनच आली होती. असा हा काका-पुतण्यातील, आजोबा-नातवातील, भावा-बहिणीतील संघर्ष इथे प्रत्येक ठिकाणी दिसतो. कदाचित या संघर्षाची परिणती बारामतीत सुप्रियाताईंच्या पाडावात आणि मावळात पार्थ पवारांच्या उदयातही होऊ शकते. म्हणूनच शरद पवारांनी आता देश वगैरे सोडून आपल्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यावे. परिवारात नेमका काय कलह सुरू आहे, त्याचा विचार करावा. कारण, नरेंद्र मोदींचे काय करायचे, त्याचा विचार देशातल्या मतदाराने आधीच करून ठेवला आहे. त्यामुळे शरद पवारांनी डोक्याला फार ताण देण्याची गरज नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@