बालनाट्य रंगभूमीची नवी उमेद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019   
Total Views |


 


मराठी बालनाट्य रंगभूमीला पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी झटणार्‍या व मुलांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना उलगडणार्‍या पल्लवी वाघ-केळकर यांच्याविषयी...

 

मराठी रंगभूमीला उतरती कळा लागल्याची खंत वारंवार बोलून दाखवली जाते. मात्र, प्रत्यक्षात पुढाकार घेऊन त्यासाठी काही ठोस करणारे हात थोडकेच! मराठी रंगभूमी आणि बालनाट्य नव्या पिढीसमोर आणून, त्यांच्यातील एक कलाकार घडवणारी ठाण्यातील ‘थिएटर कोलाज’ ही कला प्रशिक्षण संस्था आणि या संपूर्ण कला प्रशिक्षण मंचाचा डोलारा सांभाळणार्‍या अभिनेत्री पल्लवी वाघ-केळकर. मोबाईल, व्हिडिओ गेम्सच्या आभासी जगात रमणार्‍या चिमुकल्यांना त्यांचे कलागुण जोपासता यावेत, या दृष्टीने सुरू केलेल्या या संस्थेचे हे दुसरे वर्ष.


मानवी जीवनात कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने रंगमंच आणि कलाक्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. या संकल्पनेतून बाल रंगभूमीसाठी योगदान द्यावे, या विचाराने ‘थिएटर कोलाज’ ही संकल्पना पुढे आली. पल्लवी केळकर यांनी ५ ते १५ वर्षांचा वयोगट हा कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, ही बाब हेरून याच वयोगटातील मुलांसाठी कलाप्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. सुरुवातीला ‘आमच्या मुलाला कुठल्या जाहिरातीत काम मिळेल का?,’ ‘त्याला कुठल्या मालिकेसाठी विचारणे येईल का?’ असे प्रश्न विचारणार्‍या पालकांना त्यांनी बालरंगमंच आणि मुलांसाठी दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणाची विस्तृत माहिती दिली. त्याला कोणत्या मालिका-जाहिरातींमध्ये काम मिळेल, यापेक्षा तो जेव्हा रंगमंचावर वावरेल, त्यावेळी असणारा त्याचा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता कला प्रशिक्षणातून आम्ही मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला. या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमासह मुलांच्या वाचन, मंथन, निरीक्षण आदी गोष्टींचा बारकाईने विचार करण्याकडे लक्ष देण्यात आले. प्रशिक्षण वर्गातील मुलांना मोबाईल, व्हिडिओ गेम्स यापेक्षा मराठी, हिंदी पुस्तके नव्या गोष्टींशी ओळख करून देण्यात आली. मराठी रंगभूमीप्रमाणेच दुर्लक्षित होत असलेली बालनाट्य रंगभूमी पुन्हा एकदा झोतात यावी, या दृष्टीने पल्लवी वाघ-केळकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

 

बालकलाकारांना सोबत घेऊन दरवर्षी एक व्यावसायिक नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याचे लक्ष्यथिएटर कोलाज’ने निर्धारित केले आहे. आपल्या कार्यक्षेत्रातून वेळ काढत बालरंगभूमी जपावी, जगावी यासाठी खारीचा वाटा उचलत या कामासाठी योगदान देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासात दोन मैलाचे टप्पे गाठण्यात पल्लवी आणि त्यांच्या टीमला यश मिळाले आहे. पहिल्या वर्षी पल्लवी वाघ यांनी ‘फोर जी’ हे बालनाट्य सादर केले. बालनाट्य सादर करताना ते केवळ लहान मुलांसाठीच न करता पालकांनाही विचार करायला लावणारे ठरेल, हा त्यामागचा हेतू होता. प्रत्येक कलाकृतीतून मुलांना एका भावविश्वात नेण्यासह पुढील पिढी म्हणून एक बोधही या नाटकांद्वारे मांडण्यात आला. मात्र, ‘फोर जी’ या नाटकाचे केवळ तीन प्रयोग होऊ शकले. मात्र, पल्लवी आणि त्यांच्या टीमला मोठा अनुभव देऊन गेले. याच काळात अनेक बालकलाकारही घडत होते. रंगमंचावर वावरण्यासाठी मेहनत घेत होते. साहजिकच त्याचे फळ त्यांना वर्षभरातच मिळाले.

 

पल्लवी यांच्या संकल्पनेतून ‘टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’ हे बालनाट्य रंगमंचावर आले. सध्या या बालनाट्याला मुंबई व ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. बालपणापासूनच कलेचे संस्कार झाल्याने साहजिकच पल्लवी यांचा ओढा रंगभूमीकडे होता. मुंबईत जन्मलेल्या पल्लवी यांचे बालपण मात्र ठाण्यातले. वडील डॉ. उल्हास वाघ हे एका सरकारी दंतवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत होते. मात्र, त्यांनाही कलाक्षेत्राची विशेष आवड होती. दूरदर्शनवरील लहान मुलांच्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. पल्लवी आणि त्यांचा भाऊ नकळतपणे या मालिकेचा भाग होत गेले. कलाक्षेत्राचे असे संस्कार होत गेल्याने या क्षेत्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन त्यांनाही मिळत गेला. नाट्यक्षेत्रातील नामवंत व्यक्तींना जवळून अनुभवण्याची संधी वडिलांमुळे त्यांना मिळत गेली. मुलीने वैद्यकीय क्षेत्र निवडावे, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, पहिल्यांदा ‘पृथ्वी थिएटर’मध्ये नाटक मिळाल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मात्र, महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा, विद्यापीठ, ‘इंडियन नॅशनल थिएटर’मध्ये (आयएनटी) बाजी मारत अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर सोडली, ती आजतागायत कायम आहे.

 

पल्लवी यांंनी  फिलॉसोफी विषयात पदवी पूर्ण केली. मात्र, अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा त्यांचा मनोमन निर्णय केव्हाच झाला होता. मग अभिनयातील बारकावे अभ्यासण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्या दरम्यान दूरदर्शनवर ‘आमची मुंबई’ या कार्यक्रमातून दूरचित्रवाणीसाठी काम पाहिले आणि या दोन वर्षांनंतर त्यांची पुढील वाटचाल वेगाने झाली. यानंतर ‘किमयागार,’ ‘अबीर गुलाल’ यांसारख्या नाटकांमधून त्या अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या. दरम्यान, कुटुंब सांभाळताना काही काळ त्यांना अभिनयापासून दूर राहावे लागले. मात्र, त्यावेळेतच सुचलेली संकल्पना म्हणजे ‘थिएटर कोलाज!’ मराठी बालनाट्य रंगभूमी चिरंतर राहावी, या प्रेरणेने लढणार्‍या या रणरागिणीला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@