सतरंगी रे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |




सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ८५ युवांना समाजाच्या उत्थानासाठी नि:स्वार्थीपणे प्रेरित करणे, त्यांच्याकडून समाजकार्य करून घेणे, त्यातूनच त्या विद्यार्थ्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे, त्यांच्यातील राष्ट्रप्रेम, समाजनिष्ठा जागवणे, हे काम ‘सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुप’ करत आहे. या ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत, प्रा.अमेय महाजन. या ग्रुपचे उद्दिष्ट हेच की, सुट्टीच्या काळात तरुणांना प्रशासनासोबत काम करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे. प्रशासनालाही मानवी रूप असून भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा आणि कल्याणपूर्तीसाठीच त्यांची निर्मिती आहे, हे युवकांना कळायला हवे. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांना घेऊनच काही महिन्यात याच ‘सतरंगी’ नावाने संस्थाही उभारण्यात येणार आहे.

 

तरुणाईचे स्वप्न, तरुणाईचे व्यक्तिमत्त्व विविधरंगी आणि विविध भावलालित्याने रंगलेले असते. त्याची मनोरम व्याप्ती म्हणजे ‘सतरंगी.’ प्रा. अमेय महाजन यांच्या ‘सतरंगी’मध्येही तर बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. ‘हम होंगे कामयाब’ म्हणणारे किंवा ‘पापा कहते है, बडा नाम करेगा’ म्हणणारे किंवा अगदी ‘डर के आगे जित है’ म्हणणारे युवक-युवती या ‘सतरंगी’मध्ये आहेत. प्रत्येकाला समाजभान आहे, प्रत्येकाला समाजकल्याणाची व त्याद्वारे देशकल्याणाची आस आहे. अर्थात, जागतिकीकरणाच्या रेट्यात अतिप्रोफेशनल होत डॉलर वगैरे हिशोब लावणारी, संगणक-मोबाईलच्या बटणांवर भावना खेळवणारी युवापिढी असाही विचार करते का? असे काहीजणांना वाटू शकते. पण हो, समाजहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन आयुष्याचे मार्ग ठरवणारे युवक-युवती आजही आहेत. त्याचे मूर्त रूप आहे ‘सतरंगी’चे युवा सदस्य. या ग्रुपची बांधणी करणारे प्रा. अमेय महाजन यांचे वडील सुनिल रा.स्व.संघाचे स्वयंसेवक. ते एअरफोर्समध्ये कामाला, तर आईचे वडील भालचंद्र पारनाईक हेही ‘वनवासी कल्याण आश्रम’चे कार्यकर्ते. त्यामुळे संघविचारांचे बाळकडू रक्तातच नव्हे, तर मनात आणि विचारातही भिनलेले.

 

समाजसेवेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, एम.फिल आणि ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रा. अमेय हे वेगवेगळ्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत होते. मुंबई विद्यापीठामध्येही ते कार्यरत होते. या दरम्यान त्यांचा अनेक विद्यार्थ्यांशी, युवकांशी संपर्क आला. याच काळात त्यांनी अनुभवले की, युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. भावनांना वास्तवात मूर्त करण्याची प्रचंड ताकद असते. मात्र, या युवाशक्तीला सकारात्मक व्यासपीठ मिळत नाही. मग या युवाशक्तीचा गैरवापर विघातक विचारांचे व्यासपीठ करते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ याचे उत्तम उदाहरण देता येईल. डोळ्यासमोर ‘हम को कुछ करना है, कुछ कर गुजरना है’ म्हणत अमाप उत्साहाने सळसळणार्‍या युवकांना आपण कोणती दिशा द्यायची, हे त्यांच्या शिक्षकांवरच निर्भर असते. हा विचार करताक्षणीच अमेय यांनी ठरवले की, एक शिक्षक म्हणून महाविद्यालयातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना समाजभान शिकवायला हवे, त्यांच्या संवेदनशील मनात देशभक्ती आणि समाजनिष्ठा जागवायला आणि टिकवायला हवी. शनिवार, रविवार, दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना आवडेल, रूचेल आणि त्यातनूच त्यांच्या सहभागातून समाजहित साधता येईल, असे उपक्रम राबवायला त्यांनी सुरुवात केली.

 

हे कोणते उपक्रम राबवायचे? तर याबाबत त्यांच्या मनात निश्चित संकल्पना होती. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ (टिस)मध्ये शिकत असताना अमेय यांना समाजशीलता अभ्यासक्रमाद्वारे शिकणार्‍या आणि शिकवणार्‍यांनाही बहुतेकदा प्रशासनावर खापर फोडताना पाहिले होते. प्रत्येकवेळी चूक सरकारी योजना आणि ती योजना राबवणार्‍या प्रशासनाची असते, असाही समज सुशिक्षित तरुणांमध्ये बळावताना पाहिला होता. मात्र, ‘सब समाज के प्रति स्नेहप्रेम’ सांगणार्‍या रा.स्व.संघाची पार्श्वभूमी असणार्‍या प्रा. अमेय यांना यामध्ये प्रशासनाच्या चुकीऐवजी नागरिक म्हणून आपलीही भूमिका आहे, असेच वाटे. या विचारांना पुष्टी देणारे दररोजच्या जीवनात खूप काही घडेही. उदाहरणार्थ- दररोज प्रवास करताना ठाणे तीन हात नाक्यावर अमेय यांना वाहतूक नियंत्रक पोलीस दररोज दिसे. वाहनांचा कर्कश गोंगाट, ऊन-पाऊस, दगदग, प्रवासी वैतागलेले. मात्र, हा पोलीस जीवाच्या आकांताने वाहतूक सुरळीत चालावी म्हणून हातवारे करतो, शिट्टी वाजवतो. त्याचे आभार तर सोडाच, पण तोही माणूसच आहे, असे कोणालाही त्याच्याबद्दल वाटत नसेल. असेच एकंदर वातावरण. आपण एक तासही या नाक्यावर उभे राहू शकत नाही. मात्र, सगळ्या गैरसोयी सहन करत प्रदूषणाचा मारा खात हा पोलीस न चुकता तिथे कामावर हजर असतो आणि इमाने इतबारे कामही करतो. त्याच्या मानवी गरजांचे काय? तसेच ‘धूम मचाले धूम मचाले’ म्हणत अमानवी वेगाने वाहने हाकणार्‍या आणि नाहक मृत्युमुखी पडणार्‍या युवकांची संख्याही लक्षणीय. त्यांच्या अचानक अवेळी मृत्यूने त्यांच्या कुटुंबाच्या होणार्‍या नुकसानाचे काय?

 

यासाठी प्रा. अमेय यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वाहतुकीवर काम करण्याचे ठरवले. प्रशासनासोबत काम करण्याचा डॉ. अमेय यांना अनुभव होताच. माधव माळवे, साहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनातून वाहतूक नियंत्रक पोलिसांसाठी त्यांनी काम केले. वयाच्या २३ व्या वर्षी प्रा. अमेय यांची नियुक्ती ठाणे वाहतूक नियंत्रक पोलीस अॅडव्हायझरी कमिटीवर झाली होती. त्यातूनच मग पुढे ओळख होत ‘सतरंगी’ ग्रुपने पनवेलमध्ये डेप्युटी आरटीओ हेमांगिनी पाटील यांच्यासोबत उपक्रम राबवले. पनवेल परिसरातील बस स्थानकाचा परिसर चित्रांनी रंगवण्याचे काम मुलांनी उत्साहाने केले. क ाम करायचे असेल, तर आपोआप संधी उपलब्ध होतात हे निश्चित. त्यामुळे रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या सहकार्याने ‘सतरंगी’ने एक अभ्यासपूर्ण काम केले. रायगडमधील सुधागड तालुक्यातील ३९ वनवासी वाड्या-पाड्यांचे सर्वेक्षण. कातकरी समाजाचे पाडे. दारू गाळण्यांसबंधीच्या आणि त्याच्या दुष्परिणामाचे सर्व चटके पाड्याने भोगलेले. पोलीस तिथे छापा टाकत, पण पुन्हा ते काम सुरू होई. दारू गाळण्याचे, दारू पिण्याचे काम कसे कमी होईल, यासंबंधी सत्य माहिती हवी होती. ‘सतरंगी’च्या १३ विद्यार्थ्यांनी १२ दिवस त्या पाड्यांवर औपचारिक सर्वेक्षण केले. पाड्यांमध्ये मिसळण्यासाठी दारूबंदी, दारूचे दुष्परिणाम यावर पथनाट्य तयार केले. ते पथनाट्य पाड्या-पाड्यात जाऊन सादर केले. पथनाट्य पाहायच्या निमित्ताने वनवासी बांधव गोळा होत. त्यातूनच मग संवाद साधत. ही होती सर्वेक्षणकरण्याची पद्धती. या सर्वेक्षणाचा अहवाल ‘सतरंगी’ने अत्यंत परिणामकारणरीत्या बनवला. तसेच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या माध्यमातून कोल्हापूरमधील वाहतूक बेटांवर वाहतुकीसंबंधी नियमांची जागृती यावर ‘सतरंगी’ने काम केले. त्यानंतर ‘सतरंगी’ला संधी मिळाली, औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत काम करण्याची. औरंगाबादचे एस.पी. डॉ. श्रीकांत परोपकरी यांच्या मार्गदर्शन आणि साहाय्याने शहरामध्ये लाचलुचपत विभागाविषयी जागृती करणे, कायद्यांचे जागरण करणे हे काम त्यांनी केले.

 

इतकेच नाही, तर ठाणे विभागीय पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने महिला सुरक्षा, वाहतूक सुरक्षा यावरही ‘सतरंगी’च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य बसवले. चौकाचौकात जनजागृती केली.‘सतरंगी’च्या विद्यार्थ्यांचा जागृती कार्यक्रमांतर्गत शहरातील निवास, खाणे, जाणे-येणे हा सगळा खर्च संबंधित पोलीस खाते करते. यातून विद्यार्थ्यांना काय मिळते? तर यातून विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील जग आणि कायदे समजतात. समाजाचे वास्तव अनुभवायला मिळते. नेमके समाजाचे प्रश्न काय आहेत? आणि ते कसे सोडवावेत याचे प्रथमदर्शी ज्ञान आणि प्रात्यक्षिक मिळते. इतकेच नव्हे, तर प्रशासन आणि त्याची लोकाभिमुखता काय आहे, प्रशासन म्हणजे कोणी बाहेरून आलेली व्यवस्था नाही, तर प्रशासन मानवी चेहरा आहे, हे अनुभवता येते. हेच महत्त्वाचे आहे. कारण, आज आपण पाहतो की, तरुणांना प्रशासन, देशाविरूद्ध तरुणांना भडकावण्याचे षड्यंत्र काही फुटीरतावादी करत आहेत. ‘सतरंगी’च्या उद्दिष्टांमुळे आणि कार्यपद्धतीमुळे अशा फुटीरतावाद्यांना यथायोग्य उत्तर मिळते आहे.

 

प्रा. अमेय महाजन म्हणतात, कोणाला ‘सतरंगी’च्या कार्यामध्ये सहभागी व्हायचे असेल, सूचनाही मांडायच्या असतील, तर त्यांचे स्वागत आहे. कारण, नवनवीन कल्पना आणि कार्य यामुळेच तर तरुणांच्या भावविश्वाला ‘सतरंग’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘सतरंगी’च्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.प्रा. अमेय यांना तरुणाईला विधायक कार्यास जोडायचे आहे. गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. कारण, गडचिरोली नक्षल्यांच्या केंद्रस्थानी आहे. या विद्यापीठामधील तरुणाईला सकारात्मक प्रेरणा मिळाली, तर गडचिरोली आणि परिसराचे रूप पालटेल. येथील स्थानिक तरुणाई एकवटली, तर नक्षली कारवायांना आळा बसेल. हेच काम प्रा. अमेय महाजनांना करायचे आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. देशाच्या युवकांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा देणार्‍या प्रा. अमेय महाजन आणि ‘सतरंगी’चे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल. या लक्ष्यसिद्धीसाठी कितीही समस्या अडथळे आले तरीही...कारण,

 

ढुंढ लेते है अंधेरो मे मंजिल अपनी

जुगनू कभी रोशनी के मोहताज नही होते

संपर्क: प्रा. अमेय महाजन ९७६९३७१३८३

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@