‘राणी भवना’ची साठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |


राणी लक्ष्मी भवन’ नाशिक या संस्थेला यंदा दि.२५ मे रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवशी संस्थेचा ‘हीरक महोत्सव’ साजरा होत आहे. पहिल्या उद्घाटनाची मी साक्षीदार आहे म्हणून हृद्यआठवण.

 

राष्ट्र सेविका समितीया अखिल भारतीय महिला संघटनेची भारतात जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत एकूण ६० प्रतिष्ठाने आहेत. त्यातील स्वत:ची वास्तू असलेले ‘राणी लक्ष्मी भवन,’ नाशिक हे पहिले प्रतिष्ठान. तसे पाहिले तर ‘स्त्रीजीवन विकास परिषद’ ही राष्ट्र सेविका समितीची पहिली नोंदणीकृत संस्था. त्याचा उपक्रम म्हणजे ‘गृहिणी विद्यालय.’ पण, या विद्यालयाचे वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी घेतले गेले. कारण, संस्थेला स्वत:ची जागा नव्हती.

 

राणी लक्ष्मीचे नाव प्रतिष्ठानला देण्याचे कारण असे की, ‘राष्ट्र सेविका समिती’ने आपले तीन आदर्श मानले आहेत. १) मातृत्व - जिजाबाई २) कर्तृत्व - अहिल्याबाई ३) नेतृत्व - राणी लक्ष्मीबाई. या सर्वांचे स्मारक व्हावे असे वंदनीय मावशी (समिती संस्थापिका) तथा लक्ष्मीबाई केळकर यांच्याप्रमाणे समितीच्या अनेक सेविकांना वाटत होते. त्याप्रमाणे इ.स. १९५८ मध्ये राणीसाहेबांच्या बलिदानाला १०० वर्षे पूर्ण होणार होती. हे औचित्य साधून त्या वर्षी म्हणजे १९५८ मध्ये हे स्मारक व्हावे, असे समितीने ठरविले.

 

त्यासाठी स्थानाचा विचार केला गेला. वंदनीय मावशींच्या मनात नाशिकला स्मारक व्हावे, असे होते. आम्ही सेविकांनी प्रश्न विचारला, “मावशी, राणीसाहेबांचे कार्य व बलिदान मध्यप्रदेशात! मग झाशी, ग्वाल्हेर सोडून नाशिक का निवडले?” मावशींनी उत्तर दिले, “नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. सार्‍या भारतातून लोक येथे येतात. त्यांच्या समोर हे स्मारक राणीसाहेबांचे सतत स्मरण करून देणारे राहील.” अशा दूरदृष्टीने स्थान पक्के झाले. जागेची शोधाशोध झाली.

 

गोळे कॉलनीत मुख्य रस्त्यावर दोन लहान घरे शेजारी-शेजारी असलेली विकायची आहेत, असे समजले. त्यांच्या मालकांशी बोलणी होऊन ४० हजार किंमतीत घरे घेतली. नाशिकच्या मावशींच्या बरोबरीच्या सेविका जाह्नवी बाई (वहिनी) मोडक, ताई मेहेंदळे, इंदुताई गायधनी वगैरे सर्वजणी कामाला लागल्या. घरे घेतली खरी, मग पैशांची जमावजमव करणे भाग होते. समितीजवळ गुरुदक्षिणेशिवाय दुसरा कोणताच पैसा नव्हता. त्या पैशात भागणे शक्य नसल्याने निधी गोळा करण्यासाठी पावती पुस्तके छापली गेली. एकट्या नाशिकमध्ये इतके पैसे जमणे शक्य नाही. मग नाशिकजवळ मुंबई!

 

त्यावेळी समितीच्या मुंबई प्रदेशच्या कार्यवाहिका मा. बकुळताई देवकुळे होत्या व स्मारक समितीच्या सभासद होत्या. निधी संकलनाची बरीच जबाबदारी त्यांनी उचलली. आमच्यासारख्या त्यावेळच्या तरुण सेविकांच्या मदतीने बराचसा निधी मुंबईत गोळा झाला. इमारतींची डागडुजी झाली. दर्शनी इमारतीला ‘राणी भवन’ हे नाव दिले. बाजूच्या इमारतीला ‘देवी अहिल्या स्मारक’ नाव दिले. ‘राणी भवना’समोर राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा उभारण्याचे ठरले. तो नेहमीप्रमाणे अश्वारुढ न करता हातात ढाल-तलवार घेतलेला करून घेतला.

 

दि. २५ मे, १९५८ उद्घाटनाची तारीख ठरली. ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्वत:ची वास्तू होणार होती. त्यामुळे समितीत उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण होते. अनेक ठिकाणांहून विशेषत: महाराष्ट्रातून ५०० हून अधिक सेविका आल्या होत्या. मुंबईहून ९० सेविका उपस्थित होत्या. दि. २५ मे रोजी परिसर आनंदाने उजळला. शाळेचे पटांगण सेविकांनी फुलून गेले. वंदनीय मावशी व नाशिकमधील मान्यवर मंचावर स्थानापन्न झाले. माननीय मावशींनी संस्थेचा उद्देश व आवश्यकता सांगितली. केवळ महिलांनी उभ्या केलेल्या या संस्थेचे मान्यवरांनी कौतुक केले. संघटित स्त्रीशक्ती काय करू शकते, याचे उदाहरण जनतेपुढे उभे राहिले.

 

दुपारी शोभायात्रा निघाली. हायस्कूलमधून सुरुवात होऊन ‘राणी भवन’मध्ये उभारलेल्या राणीच्या पुतळ्याला मानवंदना देऊन शोभायात्रा पुन्हा हायस्कूलमध्ये येऊन विसर्जित झाली. मावशींच्या चेहर्‍यावरचे समाधान सर्व सेविकांना समाधान व उत्साह देऊन गेले. आज ६० वर्षे ‘राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती’ अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवित आहे. संसारोपयोगी वस्तूंची निर्मिती व विक्री ‘राणी भवन’मध्ये सुरू झाली. सुरुवातीला स्वकष्टाने पदार्थ बनवून दुकानात ठेवून विक्री करीत. आता दुकान उत्तम प्रकारे चालत आहे. अजूनही सेविकाच दुकान चालवत आहेत. पाळणाघर, बालवाडी, महिला वसतिगृह, ‘अहिल्या भवन’मध्ये आहे. भजनी वर्ग, पौरोहित्य वर्ग, आरोग्य केंद्र यांचा समाजाला चांगला उपयोग होतो आहे. समितीच्या इतर प्रतिष्ठानात असे उपक्रम थोड्या फार फरकाने चालू आहेत. आज ‘राणी भवन’ इमारतीचा संपूर्ण कायापालट झाला आहे. २००-२५० खुर्च्या मावतील, एवढे सभागृह आहे. ४० ते ५० मुलींची सोय वसतिगृहात होणार आहे. संस्थेच्या सभागृहामुळे नाशिककरांची उत्तम सोय झाली आहे. अर्थात, जनतेच्या सहकार्याने हा जगन्नाथाचा रथ ‘राष्ट्र सेविका समिती’ने पेलला. असेच सर्वांचे सहकार्य सतत समितीला लाभो, ही जनता जनार्दनाला प्रार्थना...!

- सुशीला महाजन

९३२२५०४७३७

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@