होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१९

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |


होमियोपॅथीच्या प्राथमिक तपासणीमध्ये रुग्ण कशाप्रकारे लक्षणे सांगतो
, याचे निरीक्षण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे माणसाचा खरा स्वभाव कधी वर येतो, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. म्हणजे रुग्ण जेव्हा स्वतःच्या स्वभावाबद्दल सांगत असतो, तेव्हा प्रत्येकवेळी तो खरे सांगत असेल, असे नाही.

अनेक रुग्ण स्वतःचे वाईट गुण इतरांपासून लपवून ठेवतात. परंतु, इथेच चिकित्सकाची खरी परीक्षा असते. कारण, रुग्णाच्या बोलण्यातून, बोलण्याच्या पद्धतीतून, वागण्याच्या पद्धतीमधून व शारीरिक हालचालीवरून तसेच त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरून व या घटनांमध्ये रुग्णाने काय प्रतिक्रिया दिली वा कसा वागला, यावरून रुग्णाचा खरा स्वभाव चिकित्सकाच्या लक्षात येतो. उदा. एक रुग्ण त्याच्याबद्दल सांगत असताना म्हणाला की, त्याला कशाचीही अजिबात भीती वाटत नाही. जे काही नशिबात असेल तसे घडेल. त्याचबरोबर अनेक आध्यात्मिक व प्रवचनांचे व संतांचे दाखलेही त्याने दिले. परंतु, प्रत्यक्षात त्याच्या रक्ताच्या तपासणीमध्ये थोडासा त्रास आहे, असे जेव्हा आढळून आले, तेव्हा हा रुग्ण प्रचंड घाबरला व आठवडाभरात दहा डॉक्टरर्सना रिपोर्ट्स दाखवून आला. त्या रुग्णाची ही प्रतिक्रिया त्याचा मूळ स्वभाव जाणून घेण्यासाठी पुरेशी आहे. ही प्रतिक्रिया ही उत्स्फूर्तपणे आलेली असते व ही प्रतिक्षिप्त क्रियाच त्या रुग्णाचा खरा स्वभाव असतो. बाकी त्याने सांगितलेल्या नीडरपणाच्या गोष्टी या त्याच्या भित्र्या चेहर्‍यावर त्याने चढवलेला मुखवटा असतो. आपल्याला याच मुखवट्यामागचा खरा चेहरा जाणून घ्यायचा असतो.

याचबरोबर रुग्णाचे छंद व सवयी जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. कारण, हे छंद किंवा सवयी हे रुग्णाच्या आतून येणार्‍या इच्छाशक्तीचे रूपक आहे. म्हणूनच रुग्ण फावल्या वेळात काय करतो किंवा स्वतःचे कुठले छंद जोपासतो? त्यातून त्या रुग्णाला काय मिळते? त्या आनंदाची तुलना तो कशी करतो? कुठल्या मानसिक स्थितीमध्ये त्याने हे छंद जोपासले आहेत व त्यातून त्याला कसे वाटते? इत्यादी माहितीही फार उपयुक्त ठरते. या छंदातून माणसाची आतील इच्छा दिसून येते. या छंद व सवयीतून त्या माणसाला शांतता व मानसिक आनंद व विश्रांती मिळते. त्यामुळे या माहितीतून त्या माणसाच्या स्वभावविशेषाचे कंगोरे आपणास कळून येतात.

रुग्ण आपल्या मानसिक स्थितीच्या अनुसारच आवडीनिवडी जोपासत असतो. उदा. एखादा मानसिक अस्वस्थता असलेला रुग्ण किंवा ज्याला सतत हाताने काहीतरी काम करण्याची इच्छा असते, असा माणूस मग छंदसुद्धा असेच जोपासतो, ज्यामध्ये सतत हाताची हालचाल होत राहील. असा माणूस मग शिवणकाम करील किंवा चित्र काढत राहील किंवा एखादे वाद्य वाजवत राहील, जेणेकरून त्याच्या हातांना काही काम मिळेल. त्यामुळे अशा वागण्यातून तो स्वतःची मानसिक अस्वस्थता नियंत्रणात आणण्याचा नैसर्गिक प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेस हे नियंत्रणाच्या आवाक्यात नसते तेव्हा मग माणूस आजारी पडतो. पुढील भागात आपण याबद्दल अजून खोलात माहिती घेऊया.

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

९८६९०६२२७६


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@