‘बुद्धांकुर मित्रमंडळ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019   
Total Views |



आमच्या मित्रमंडळाचे नाव ‘बुद्धांकुर’ का? तर तथागतांनी शांती आणि समतेचा संदेश दिला. तो शांती आणि समतेचा संदेश आज जगभराच्या स्थैर्याचा केंद्रबिंदू आहे. समरसतेचे काम करताना, तथागतांची शिकवण प्रकर्षाने अभ्यासली. तेव्हा कळले की, बुद्धाच्या शांतीची क्रांती समस्त मानवतेला प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे आयुष्यात बर्‍यापैकी स्थिरावलेल्या आमच्या सर्वधर्मीय आणि सर्वजातीय मित्रांनी ठरवले की, आपण एक मंडळ स्थापन करायचे; ज्यात बुद्धाच्या शांती आणि समतेचा अंकुर उमलेल आणि सतकार्यातून त्याचा बोधीवृक्ष होईल,” ‘समरसता गतविधी, विक्रोळी’चे मदन कुशवाहा सांगत होते. आज विक्रोळीमध्ये गल्लीबोळात बाबासाहेब आंबेडकरांचे तसेच तथागत गौतम बुद्धांचे नाव लावणार्‍या शेकडो संस्था आहेत. या संस्था आपापल्या परीने समाजकार्य करत असतात. गेल्या दशकापासून या उत्सवांचे किंवा उपक्रमांचे स्वरूप बदलत आहे. विक्रोळीमधील सर्वच मंडळे समाजहिताचे कार्यक्रम राबवताना दिसत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’चे उपक्रम.

 

या मंडळाचे अध्यक्ष दीपक आहिरे सांगतात की, “बालपणापासूनच आम्ही सगळे मित्र. जातीपातीच्या भिंती आमच्यात कधी आल्याच नाहीत. आज बालवय संपून प्रौढत्वाची वाट सुरू आहे. नकळत्या वयापासून आम्ही आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती साजरी करतो. बाबासाहेबांनी समाजाला संघटित आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग दिला आहे. आम्ही ठरवले की, परिसरातील युवकांना, नागरिकांना संघटित करून मंडळ स्थापन करून समाजजागृतीचे उपक्रम सुरू करायचे. ज्यामुळे समाजबांधव एकत्र येतील आणि स्पर्धा टळेल. सगळ्यांच्या सहकार्याने काहीतरी चांगले होईल.”

 

दीपक यांचे म्हणणे खरे होते. नाक्यावर जिथे हे मित्र एकत्र जमत, तिथे वर्षानुवर्षे लोक कचरा टाकत. कुंडीच्या बाहेर कचरा ओसंडून वाहायचा. घाण दुर्गंधीचे साम्राज्यच! कालांतराने परिसरात कचरा घेण्यासाठी घंटागाडी येऊ लागली तरीही लोक तिथेच कचरा टाकत. ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’ने मागच्या वर्षी या घाणीचा नरक साफ केला. ती जागा इतकी स्वच्छ केली की, नव्या माणसाला वाटणारही नाही की इथे कधी कचर्‍याचे साम्राज्य होते. या मोकळ्या छोट्या जागेवर ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’ने वाचनालय सुरू केले. इथे विविध विचारधारेचे आधारस्तंभ असलेली वृत्तपत्रे वाचायला ठेवलेली असतात. हेतू हाच की, नाक्यावर जमणार्‍या कोणीही इतर बाजारगप्पा करण्यापेक्षा वर्तमानपत्र वाचावे. बहुतेक सर्वच वर्तमानपत्रे तिथे असल्यामुळे त्या त्या दिवशीच्या प्रमुख बातम्यांचे अनेक पैलू तिथे जमणार्‍यांना समजतात. अर्थात, सर्वचजण वर्तमानपत्र वाचतात असे नव्हे, पण केवळ कोणीतरी काहीतरी म्हणते आणि त्याचे अफवांमध्ये रूपांतर होते आणि ती अफवा घेऊन कोणी परिसरामध्ये वाद-वितुष्ट करायला आले तर ती घटना तशी नव्हती तर अशी आहे आणि सगळ्याच वर्तमानपत्रात अशीच दिलेली आहे, याबाबत चर्चा होते. कोणी म्हणेल की, आता मोबाईल, संगणकाचा जमाना आहे. मात्र, तरीसुद्धा वस्तीपातळीवर वर्तमानपत्राचे महत्त्वाचे स्थान अबाधितच आहे. याचे प्रत्यंतर ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’च्या वाचनालयामुळे येते.

 

परिसरातील कोणी आर्थिक मदतीशिवाय किंवा एकटे-एकटी असल्यामुळे वैद्यकीय सेवेस मुकत असतील, तर ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’चे सदस्य, पदाधिकारी एकवटतात. ज्याला जमेल ती मदत करतात. आर्थिक मदतीचा भार सर्वजण मिळून उचलतात, हे विशेष. इतकेच नव्हे, तर परिसरातील युवावर्गावरही या मित्रमंडळाची विशेष स्नेहमयी नजर असते. परिसरातील मुले-मुली वाईट संगतीला तर लागली नाहीत ना, दुष्कृत्य तर करत नाहीत ना किंवा कुठे फसत तर नाहीत ना, यावरही मंडळाचे पदाधिकारी लक्ष ठेवतात. जर दुर्दैवाने तसे काही असेल, तर सगळे प्रमुख पदाधिकारी त्या मुलामुलींच्या पालकांना तसे वैयक्तिकरीत्या, खाजगीत आणि अगदी आपलेपणाने सांगतात. इतकेच नव्हे, तर मुलगा किंवा मुलगी त्या प्रसंगातून कशी बाहेर येईल, यासाठी,मदतही करतात. ही मदत अगदी पालकांने आपल्या मुलांसाठी करावी इतकी निर्विवाद नि:स्वार्थी असते. त्यामुळे या मंडळाबाबत परिसरात तशी आदरयुक्त भावनाच आहे. जयंती, पुण्यतिथीही हे मंडळ साजरे करते. अर्थात, विक्रोळीच्या रूढीप्रमाणे या दिवशी अन्नदान करण्याचे कामही हे मंडळ करते. पण यातही पुन्हा ‘सबको साथ लेके चलो’ हीच भावना असते. या मंडळाच्या अन्नदान उपक्रमामध्ये विविध जातीधर्माचे लोक सामील झालेले दिसतात, हेच या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाचे म्हणणे आहे की, परिसरातील कोणाही व्यक्तीचे नाहक नुकसान होऊ नये, शोषण होऊ नये व यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मात्र, हे सगळे करत असताना मंडळ कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनरचा आधार घेत नाही. समाजकारणामध्ये राजकारण नको, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेही मंडळामध्ये विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विविध विचारधारेचे लोक आहेतच.पण आपआपले राजकीय विचार ते मंडळाच्या उपक्रमांमध्ये लादत नाहीत.

 

आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्मरण करणारी आणि तरुणांना आयुष्यात प्रेरणा देणारी व्याख्याने, कार्यक्रम आयोजित करण्यावर मंडळाचा भर राहणार आहे. कोरेगाव-भीमा दंगलीवेळी महाराष्ट्र पेटत असताना ‘बुद्धांकुर मित्रमंडळ’ काय करत होते? असे विचारल्यावर पदाधिकारी म्हणाले, “आम्ही परिसरातील युवकांना शांती आणि सबुरी सांगत होतो. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवूही नका, हे सांगत होतो. कारण, बुद्धांनी सांगितलेला शांतीचा धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेला संघटनेचा धम्म हा पाळायचा असेल, तर जातीय तणाव, द्वेष, हिंसा टाळायलाच हवी.” आज काही संघटना समाजामध्ये डॉ. बाबासाहेबांचे मुळ विचार समाजामध्ये न सांगता त्यांच्या मनाला येईल ते बाबासाहेबांचे विचार म्हणून सांगत आहेत. समाजाची दिशाभूल करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘बुद्धांकुर मित्रमंडळा’च्या पदाधिकार्‍यांचे विचार आणि कृती दीपस्तंभाप्रमाणेच आहेत.

 


(संपर्क: दीपक आहिरे- 8879275432

मदनमोहन कुशवाहा-9321546945)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@