अनपेक्षित नक्कीच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |


 


एक्झिट पोलच्या आकड्यात धक्कादायक असे काहीच नाही. राजकारणात अचानक काहीच घडत नाही. कुठलीही राजकीय घटना ही एका सुनिश्चित राजकीय प्रक्रियेचे फलित असते. मोदींना ते जमले आहे. त्यामुळे आज जे आकडे समोर आले आहेत त्यात अनपेक्षित काहीच नाही.


२०१९च्या निवडणुकीचा निर्णय दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना मोदीप्रेमी, भाजप समर्थक आणि या देशात काही चांगले घडावे या अपेक्षेने मतदान करणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला सुखावतील अशा प्रकारच्या आकड्यांचे भाकीत एक्झिट पोल करणाऱ्यांनी वर्तविले आहे. पारडे अर्थातच मोदींच्या बाजूने झुकलेले आहे आणि सर्वसामान्य मतदारांनी राहुल गांधींसारखे नेतृत्व नाकारल्याचे चित्र समोर येत आहे. निरनिराळ्या एक्झिट पोलचे आकडे निरनिराळे असले तरी, ५४३ पैकी किमान २६७ ते कमाल ३०० जागा या एक्झिट पोलने एनडीएला दिल्या आहेत. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत निकालाची चुणूक दाखविणाऱ्या या पोलविषयी सगळ्यांनाच उत्कंठा होती. निवडणूक आयोगाच्या मनाईनंतर तर ही उत्कंठा फारच वाढत गेली. यातून जे आकडे समोर येत आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाला आणि मोदीद्वेषाचा कंडू स्वयंरचित आकडे देऊन शमविला होता, अशा मंडळींना बसलेला धक्का मोठाच आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’च्या काही विद्यार्थ्यांनी तर नागपुरातून नितीन गडकरीदेखील पडणार, असे बिनधास्त निष्कर्षही काढले होते. मुद्दा असा की, यातून जे व्हायचे तेच घडले आणि आणि आता ही मंडळी तोंडावर पडली आहेत. वस्तुत: मोदींचे शांतपणे केदारनाथच्या दर्शनासाठी जाणे तिथे जाऊन बराच काळ आपल्या आराध्यासाठी वेळ देणे हा खरा एक्झिट पोलचा निकाल होता. युद्धानंतर एक मोठा शांतीकाळ असतो. निसर्गही ही प्रक्रिया नाकारत नाही. या शांतीकाळात लोक आपापल्या कुवतीनुसार झालेली दगदग क्षमविण्यासाठी प्रयत्न करतात. ही अवाक्याशी जोडलेली गोष्ट आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कोणी परदेशात जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेतात, तर कोणी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविणे पसंत करतात. मोदींनी देवांचा देव असलेल्या महादेवालाच गाठले. आपण जिंकणार असल्याचा आत्मविश्वास प्रतीत करण्याचाच हा एक मार्ग होता.

 

अल्पसंख्याकांच्या आगळीकीला ‘सेक्युलॅरिझम’ मानणाऱ्यांना अशा प्रकारे पंतप्रधानांचे देवदर्शन मान्यच नव्हते. त्यामुळे मोदींच्या या कृतीवरही टीका केली गेली. विवेकाचे भान हरपून मोदींच्या श्रद्धेचीही यथेच्छ टवाळी करण्यात आली. दुर्गापूजेवर बंदी घालणाऱ्या ममतांच्या पक्षाने याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नसती, तर ती बातमीच झाली असती. त्यामुळे त्याही आपल्या स्वभावाला जागल्या. या सगळ्याच्या माकडचेष्टांमधून मोदींनी कुंपणावर बसणारा एक मोठा वर्ग आपला चाहता करण्याची संधी सोडली नाही. यापूर्वी मोदींनी दिल्लीत घेतलेली पत्रकार परिषदही अशीच रंगविण्यात आली. वस्तुत: निवडणूक संपण्याच्या एक तास आधी घेतलेली ही पत्रकार परिषद गाजणार, अशीच त्याची वेळ होती. मात्र, मोदींनी आपल्यातल्या जुन्या प्रवक्त्याला इथे थोडी मोकळीक दिली. देशातल्या निवडणूक प्रक्रियेचे मोठे कौतुकाने निवेदन केले. इतक्या मोठ्या लोकशाहीचा रथ कसा हाकला गेला, याचे ते विवेचन होते. पत्रकारांविषयी सहानुभूती व्यक्त केली आणि आपल्या अध्यक्षांसाठी बरीच मोकळी जागा सोडली. आता यावरही वादंग केला गेला. ‘पत्रकारांना ते तोंड देत नाहीत. आपल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत,’ असा कांगावा केला गेला. काही लोकांनी पत्रकार परिषदेत मोदींचे वाभाडे काढले जावे, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. ती संधी कधी मिळेल, याची ते वाट पाहत असतात. दुसऱ्या बाजूला राहुल गांधींची पत्रकार परिषद होती. आपल्या वाट्याला येणारा भयंकर प्रश्न टाळण्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीने आपल्या पत्रकार परिषदेतही मोदींनाच सादर केले. फरक एवढाच होता की, तुम्ही मोदी, शाहंना अवघड प्रश्न का विचारत नाही, असा प्रतिसवालच त्यांनी केला. या दोन्ही पत्रकार परिषदेतला गुणात्मक आणि मूल्यात्मक फरक एवढाच होता की, मोदी आपल्या आत्मविश्वासाच्या आधारे पत्रकारांना सामोरे गेले आणि राहुल गांधी आपल्या बालीश स्वभावानुसार काथ्याकुट करीत राहिले.

 

सुरुवातीपासून ही लढाई एकतर्फीच होती. महाराष्ट्रात राज ठाकरे, उत्तरप्रदेशात माया-अखिलेश युती अन्य ठिकाणी अजून काही या आणि अशा कितीतरी गमजा विरोधकांनी केल्या तरीही त्यांना मोदींसमोर आव्हान काही उभे करता आले नाही. यात मूलभूत फरक असा होता की, मोदी पंतप्रधान होण्यासाठी लढत होते आणि इतर मोदींना हरविण्यासाठी लढत होते. ज्या काँग्रेसने या देशाला इतके मातब्बर नेते दिले, त्या काँग्रेसलाच आज स्वत:च्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या पक्षाच्या लोकांसाठीदेखील राहुल गांधी गयावया करीत फिरत होते. प्रादेशिक पक्ष हा गेल्या दोन दशकातला सर्वात प्रभावी घटक. काँग्रेसने आपली भिस्त त्यांच्यावरच ठेवली. स्वत:चे उमेदवार उभे करण्यापेक्षा किंवा मरगळलेले संघटन उभे करण्याकरिता काँग्रेसकडून काहीच प्रयत्न झाले नाही. २०१४ ला काँग्रेसला २० टक्क्यांहून अधिक मतदान होतेच. मात्र, त्यावर नेतृत्वाच्या आधारे अधिक मताचा डोलारा उभारता आला नाही. भाजपने मोदींच्या रूपाने ते केले आणि राज्यांमध्येही योगी, देवेंद्र फडणवीस यांसारखे पर्याय समोर आणले. महाराष्ट्रात काँग्रेसने आपल्या राज्यसभा देताना आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा कुमार केतकरांसारख्या भाट पत्रकाराची निवड केली. त्यामुळे पक्ष म्हणून त्यांची मरगळ काही केल्या गेलीच नाही. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार या राज्यांमध्ये तर विरोधी पक्षाची लढाई लहान लहान पक्षांनीच लढली. आता सोनिया गांधी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांच्यासारख्या पराभूतांच्या पायऱ्या चढत आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीचा सूर मोदींनी ज्याप्रकारे लावायला हवा होता तो तसाच लावला. मध्यप्रदेश, राजस्थान यासारखी मोठी राज्ये भाजपकडून काबीज केल्यानंतर काँग्रेस काही बरे करेल असे वाटत होते,पण आता आपला उरला सुरला जनाधारही काँग्रेस गमावेल अशी चिन्हे आहेत. राजकारणात अचानक काहीच घडत नाही. कुठलीही राजकीय घटना ही एका सुनिश्चित राजकीय प्रक्रियेचे फलित असते. मोदींना ते जमले आहे. त्यामुळे आज जे आकडे समोर आले आहेत त्यात अनपेक्षित काहीच नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@