भाजपची पश्चिम बंगालमधील रणनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |



एक्झिट पोलमध्ये भाजपला बंगालमध्ये ४२ पैकी १९-२३ जागा मिळतील, याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने तृणमूल आणि ममतांविरोधात वापरलेल्या रणनीतीची आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल.


१७व्या लोकसभेच्या निवडणुका सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी वादग्रस्त ठरल्या आहेत. कधी निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणाबद्दल निर्माण झालेले संशय, तर कधी प्रियांका गांधींनी न लढवलेली निवडणूक, तर कधी काँग्रेस नेते व मोदी यांच्यात झालेली जाहीर वादावादी वगैरे सतत काही ना काही घडतच होते. मात्र, ज्या प्रकारचा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदानादरम्यान झाला तसा कुठेही झाला नाही. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान कोलकाता शहरात झालेला हिंसाचार अभूतपूर्व होता. सरतेशेवटी अमित शाहंना त्यांचा रोड शो रद्द करावा लागला. या हिंसाचारात कोलकाता शहरातील एका महाविद्यालयात ईश्वरचंद्र विद्यासागर या थोेर समाजसुधारकाच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. या हिंसाचारात भाजप आणि तृणमूल काँगेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले. ही संधी साधून अमित शाह तसेच ममता बॅनर्जींनी एकमेकांवर प्रचंड टीका केली. ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांनुसार भाजपने राज्याच्या बाहेरून गुंड आणले व राज्यात दंगे घडवून आणले; तर अमित शाह यांच्या मते बॅनर्जींच्या गुंडांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. निवडणूक आयोगाने ‘कलम ३२४’ चा प्रथमच वापर करून एक दिवस अगोदर प्रचार थांबवला. शिवाय शिक्षा म्हणून निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या केल्या.

 

अमित शाह-ममता बॅनर्जी यांच्या वादात पंतप्रधान मोदींनी यथावकाश उडी घेतली वबॅनर्जींंना सत्ता जाण्याची भीती वाटत असून त्यांचे संतुलन बिघडले आहे,’ अशी टीका केली. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस म्हणजे २३ मे हा ममता बॅनर्जींचा सत्तेतला शेवटचा दिवस असेल, असे भाकित अमित शाह यांनी केले. एका पातळीवरून बघितले, तर प्रचाराची ही पातळी, आरोप-प्रत्यारोप हे संसदीय राजकारणाची शोभा वाढवणारे नाही. म्हणूनच ही लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी ‘अभूतपूर्व’ ठरली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भाजपचे विरोधक व भाजप यांच्यातील सत्तेसाठीची तीव्र चुरस. या निवडणुकीत एकेक खासदार महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच भाजप व भाजप विरोधकांनी सर्व शक्ती एकवटून ही निवडणूक लढवली आहे. भाजपला २०१४ साली उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र वगैरे राज्यांत जे अभूतपूर्व यश मिळाले होते, ते यंदा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कमी वाटते. याचा भाजपधुरिणांना अंदाज असल्यामुळे त्यांनी या खेपेला पश्चिम बंगालच्या ४२ खासदार संख्येवर खास लक्ष ठेवलेले आहे. तामिळनाडू, ओडिशा वगैरे राज्यांत भाजप जरी कमकुवत असला तरी, तेथे भाजपचे एकतर मित्र पक्ष सत्तेत आहेत किंवा ओडिशाचे नवीन बाबूसारखे भाजपचे मित्र होऊ शकतील, असे पक्ष सत्तेत आहेत. भाजपला चिंता आहे, ती पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींची, ज्यांनी भाजपशी उभा दावा मांडला आहे.

 

भाजपने पश्चिम बंगालवरच का लक्ष केंद्रित केले, याची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. पश्चिम बंगालला डाव्या विचारांचा मोठा वारसा आहे. तेथे १९७७ पासून २०११ पर्यंत अखंड डावी आघाडी सत्तेत होती. नंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने डाव्यांचा पराभव करून सत्ता मिळवली. आजही तेथे ममता बॅनर्जींचा पक्ष सत्तेत आहे. आज तेथे अशी स्थिती आहे की, एका बाजूला ममता बॅनर्जींचा पक्ष तर दुसरीकडे डावे पक्ष, काँग्रेस वगैरे कमकुवत राजकीय शक्ती आहेत. भाजपला वाटत आहे की, त्यांना डाव्यांची व काँग्रेसची मतं मिळू शकतील. या गडबडीत जर आपल्याला आठ-दहा खासदार निवडून आणता आले तर तेथे खाते उघडता येईल, असा भाजपचा हिशोब आहे. बंगाली समाजात भाजपचा ‘हिंदुत्वाचा अजेंडा’ काही प्रमाणात लोकप्रिय होताना दिसत आहे. ममता बॅनर्जींना काही केल्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पाय रोवू द्यायचे नाहीत. म्हणूनच या दोन राजकीय शक्तींत एवढी कटुता निर्माण झालेली दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१७ साली झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तेव्हापासून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये स्पष्टपणे हिंदुत्वाचा अजेंडा वापरला आहे. अमित शाह यांच्या रोड शोमध्ये हनुमान व श्रीराम यांचे मोठे फुगे वापरले होते. एका अंदाजानुसार बंगाली समाजात हिंदुत्वाचा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. भाजपतर्फे सरस्वती पूजन, रामनवमी वगैरेंसारखे पारंपरिक हिंदू सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. अशा कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. या प्रतिसादाचे प्रत्यक्ष मतांमध्ये किती रूपांतर होते, हे लवकरच कळेल. या संदर्भात काही आकडेवारीकडे नजर टाकली, तर या मुद्द्यावर प्रकाश पडेल. भाजपला २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सहा टक्के मते मिळाली, तर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये १७ टक्के मते मिळाली होती. ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. हे वाढलेली ११ टक्के मते कुठून आली? काही अभ्यासकांच्या मते, मार्क्सवादी पक्षाचे मतदार आहेत. याच काळात मार्क्सवादी पक्षाची मतं १३ टक्क्यांनी कमी झालेली. मार्क्सवादी पक्षाचे मतदार भाजपकडे वळण्याची प्रक्रिया २०१४ च्या निवडणुकांपासून सुरू झाली. याचा आणखी एक पुरावा म्हणून २०१६ साली पश्चिम बंगालमधील कुचबिहार येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला २८ टक्के मते मिळाली होती. यामुळे सावध झालेल्या तृणमूल काँग्रेसने मे २०१८ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये बळाचा वापर करायला सुरुवात केली. यात झालेल्या हिंसाचारात सुमारे दोन डझन लोकं बळी पडली. बंगाली समाजाने याबद्दल ममता बॅनर्जींना कधी क्षमा केलेली नाही.

 

ममता बॅनर्जी तेथे २०११ पासून सत्तेत आहेत. त्यांनी २०११ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये १९७७ सालापासून सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला पराभूत केले. एवढेच नव्हे, तर पुन्हा २०१६ साली ममता बॅनर्जींनी डाव्या आघाडीचा सपशेल पराभूत केले. पश्चिम बंगालमध्ये गेली अनेक दशकं काँग्रेस नामशेष झालेली आहे. याचा साधा अर्थ असा की, पश्चिम बंगालमध्ये ममतांचा तृणमूल काँग्रेस व डावी आघाडी या दोनच राजकीय शक्ती महत्त्वाच्या ठरतात. पण, २०११ साली झालेल्या पराभवातून डावी आघाडी अद्याप सावरलेली नाही. परिणामी, ममता बॅनर्जींच्या कारभारावर नाराज असलेल्या मतदाराला भाजपचा आयताच पर्याय समोर आला आहे. नेमके याच कारणांसाठी ममता बॅनर्जी भाजपला डोकं वर काढू देण्यास तयार नाहीत. त्यांना व्यवस्थित माहिती आहे की, पश्चिम बंगालच्या राजकारणात काँग्रेस पक्ष केव्हापासून गलितगात्र अवस्थेत आहे. आता जवळपास अशीच अवस्था डाव्या आघाडीची आहे. म्हणजे ममता बॅनर्जींना तेथे कोणताच विरोध नाही. अशा वातावरणात भाजप हा पर्याय म्हणून समोर येत आहे. याच भाजपला पश्चिम बंगालमध्ये लक्षणीय यश मिळेल असे नाही. मे २०१४च्या मोदी लाटेत केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली़ पण, जागा मात्र एखाद-दोनच जिंकता आल्या. अमित शाह यांच्या अंदाजाप्रमाणे, २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भाजप २३ जागा जिंकेल. या सर्व रणनीतींचे काय परिणाम झाले, याचा निर्णय २३ मे रोजी समोर येईल. काही अभ्यासकांच्या मते, भाजपचे खरे लक्ष्य २०२१ साली पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका हे आहे. त्या विधानसभा निवडणुका आता झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त तीव्र स्पर्धात्मक वातावरणात होतील, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@