नक्षलींना प्रत्युत्तर देण्यासाठी आमचा प्लान तयार : पोलीस महासंचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |




गडचिरोली
: “भूसुरुंग स्फोटातून १६ सैनिकांचा बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांना ठेचण्यासाठी आमचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांना सडेतोड उत्तर दिले जाईल. लवकरच ते तुम्हाला कृतीतून दिसेल,” असे सांगत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना रोखठोक शब्दांत इशारा दिला.

बुधवार दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात १६ सैनिक हुतात्मा झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज गडचिरोलीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गाडीच्या चालकालाही हुतात्म्याचा दर्जा दिला जाईल. त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत केली जाईल, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

 

ते म्हणाले की, “नक्षलवाद्यांचा हल्ला अत्यंत दुर्दैवी होता. आयईडी स्फोटद्वारे नक्षलवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणले. यासाठी नेमका कशाचा वापर केला गेला आणि नक्षलवाद्यांच्या कुठल्या दलाने हा स्फोट घडवला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.”

 

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. आम्ही नक्षलवादाविरोधात कारवाई सुरूच ठेवणार आहोत. नक्षल्यांविरोधात पूर्ण ताकदीनिशी कारवाई करू. नक्षलवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. आमचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. लवकरच तो कृतीतून दिसेल. झालेल्या चुका सुधारू,” असे सांगत जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिला.

 

पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीत खोडा घालण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न मोडून काढल्यामुळे नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. तरीही पोलीस दल गाफील नव्हते. आताच्या परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईत सुधारणा करू. मी स्वतः गडचिरोलीच्या पोलीस निरीक्षक पदावर काम केले आहे. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आताच्या परिस्थितीनुसार आढावा घेऊन रणनीतीत बदल करू.” “संपूर्ण आव्हानांचा सखोल आभ्यास करू आणि पुन्हा अशा घटना होणार नाही याचीही काळजी घेऊ. तीच चूक पुन्हा करणार नाही. हल्ल्यातून नक्कीच धडा घेऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला. नक्षलींना चकवण्यासाठी १५ जवान आणि चौघे जण दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र, नक्षलींना माहिती मिळाल्यामुळेच त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोलीत मंगळवारी मध्यरात्रीच सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याचे काम सुरु असलेल्या भागातील तब्बल ५० वाहनांची जाळपोळ केली होती. संपूर्ण गावभर शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर लावून १५० नक्षलींनी ५० वाहने आणि अन्य यंत्रसामग्री पेटवली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@