मसूद अजहरच्या बंदीला पुलवामा हल्ला ठरला कारणीभूत : भारताची प्रतिक्रिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्लाच कारणीभूत ठरला,” अशी प्रतिक्रिया भारत सरकारने आज गुरुवारी दिली. “मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला,” असा दावा आता पाकिस्तान करीत आहे, पण, “ही घडामोड पाकिस्तानला मोठा हादरा देणारी ठरली असून, आपला राजनयिक पराभव लपविण्यासाठीच हा देश अशा प्रकारचा दावा करीत आहे,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

 

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी चीनचा विरोध मावळण्यामागील कारण स्पष्ट केले. भारताने चीनला मसूद अझहरविरोधात सबळ पुरावे सादर केले. “भारतातील त्याच्या दहशतवादी कारवायांची माहिती ठोस पुरावे आणि कागदपत्रांसह चीनला दिली. त्यावर समाधानी होऊन चीनने आपला विरोध मागे घेतला आणि मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला,” असे रवीशकुमार यांनी सांगितले.

 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे ठोस पुरावे अमेरिका, चीन आणि पाकिस्तानसह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीलाही सादर केले. या पुराव्यांमुळे पुलवामा हल्ल्यात जैशचाच हात होता आणि हा कट पाकिस्तानच्याच भूमीत शिजला, हे सिद्ध झाले. परिणामी मसूदचा आजवर बचाव करणार्‍या चीनलाही आपली भूमिका बदलवावी लागली. चीननेच साथ सोडल्याने पाकिस्तान हतबल झाला,” असे रवीश कुमार यांनी सांगितले.

 

मसूदच्या बदल्यात भारताने चीनला काही देऊ केले आहे काय?, असे विचारले असता, “राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत कधीच तडजोड करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करणे, हाच आमचा एकमेव उद्देश होता आणि तो साध्य झाला. चीनने यात भारताला सहकार्य केल्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिकच मजबूत होणार आहेत,” असे ते म्हणाले. ’‘पुलवामा येथील आत्मघाती हल्लाच मसूदच्या पतनासाठी कारणीभूत ठरला. हा भारताचा सर्वांत मोठा विजय आहे,” असेही त्यांनी सांगितले.

 

मसूद अझहरवर पाकचीही बंदी

इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र संघाने ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पाकिस्ताननेदेखील त्याच्यावर बंदी घातली आहे. बुधवारीच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले होते. संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला तसेच उरी आणि पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मसूद मुख्य सूत्रधार होता. विशेष म्हणजे इतके दिवस याबाबत चीनने नकाराधिकाराचा वापर केला होता. मात्र, भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश मिळाले आहे. अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यासाठी भारताने दबाव टाकला होता. याला चीनने अनेकदा विरोध केला होता. या संदर्भातील फ्रान्सच्या प्रस्तावावर चीनने नकाराधिकार वापरला होता. त्यावरून अमेरिकेसह जगभरातील अन्य देशांनी चीनवर टीकादेखील केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@