मरणारी मुकी झाडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2019   
Total Views |



हिरव्यागर्द झाडीचे आकर्षण कुणाला नसते? किंबहुना ऐलतटावर पैलतटावर पाय पसरून बसलेला औदुंबर आध्यात्मिक बाज सांभाळणारे वड आणि पिंपळ किंवा लोभस जटा पिंजारणारे उंच नारळाचे झाड किंवा गर्द फुललेला गुलमोहर, आजही कवितेचाच विषय होईल. शहरी भागात मुद्दाम सोसायटीच्या बाजूला ठरवून वृक्षराजी तयार केली जाते. स्तुत्य उपक्रम. झाडं जगतील तर माणूस जगेल, नक्कीच. पण सध्या शहर भागात या वृक्षांना काय झाले आहे, असा प्रश्न उभा राहतो. संसर्गजन्य रोगाने एखाद्या वस्तीतली माणसं आजारी पडावीत किंवा पशुपक्ष्यांनी एखाद्या संसर्गजन्य रोगाने माना टाकाव्यात तसे काहीसे या मोठाल्या झाडांचे होताना दिसत आहे. गर्द सावली देणारी, वाटसरूंनाच नव्हे तर स्थानिकांना लळा लावणारी झाडे जी दहा वर्षांपूर्वी दिमाखात होती, त्या झाडांचे आता काय झाले, हा सर्वेक्षणाचा विषय आहे. दुर्दैव असे की, यातली बरीच झाडं बहुतेकदा बेकायदेशीर मारली गेली. कशासाठी तर सिमेंट काँक्रिटचा भस्मासूर उभा करण्यासाठी. कुणाला घरासमोरचं अंगण मोकळं करून तिथे गॅलरी काढायची होती किंवा घराचे क्षेत्रफळ वाढवायचे होते. घरा-अंगणाला धरून असलेलं झाड बहुतेकदा त्या झाडाच्या आसपासच्या लोकांनीच तोडलं. त्याचे तुकडे तुकडे केले. याची खंत ना खेद कुणी बाळगली. बहुतेकदा लोक हेच म्हणतात की, त्यांनी ते झाड लावले होते, त्यांच्या जागेत होते, त्यांची मर्जी त्यांनी तोडले. मात्र, लोकांना जेव्हा झाडाची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांना कायद्याने काय शिक्षा होते, याची जाणीव व्हायला लागली तेव्हा मग या कत्तलींना आळा बसला. त्यातही मोक्याच्या जागी, चौकात असलेल्या मोठ्या झाडांना थोडा दिलासा मिळाला. कारण त्यांना हात लावणाऱ्यांना कायद्याने शिक्षा होणार, कोर्ट-कचेऱ्या करायला माणसं धजावत नाहीत. त्यामुळे झाड तोडायला लोक दहादा विचार करतील, असे झाडांना आणि वृक्षप्रेमींनाही वाटले. पण झाड कुर्‍हाडीने तोडता येत नसेल तर मग काय करायचे? याचाही विचार काही क्रूर लोकांनी करून ठेवलाच. त्यामुळेच मोक्याच्या ठिकाणची दिमाखदार, डौलदार झाडे सुकताना मरताना दिसत आहेत. याचे गौडबंगाल काय असेल? सुकणारी मरणारी झाडं मुकी होती. पण त्याची सावली लाभलेली माणसं तरी मुकी नाहीत ना?

 

झाडे का मरतात?

 

विक्रोळी टागोर नगर क्रमांक ४ येथे एक भलेमोठे बदामाचे झाड कोसळले. कालपरवापर्यंत हे झाड चांगले होते. पण ते अचानक कोसळले. त्यावेळी त्या झाडाखाली एक टेम्पो, तीन दुचाकी आणि आणि काही पादचारी होते. कल्पना करा, आपल्या सावलीच्या कक्षेत इतक्या जणांना सामावणाऱ्या या झाडाचा घेर किती असेल आणि हे झाड किती मोठे असेल? या झाडाने किती उन्हाळे-पावसाळे पाहिले असतील. पण तरीही अचानक हे झाड कोसळले आणि त्यामध्ये १ टेम्पो, ३ दुचाकींचे नुकसान झाले, त्याशिवाय ४ जण गंभीर जखमी झाले. हे झाड का कोसळले? यावर काही जणांचे म्हणणे की, झाडाच्या बाजूला एक गटार आहे. त्या गटाराच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. गटाराच्या रूंदीकरणासाठी जेसीबी वापरण्यात आला. त्या बदामाच्या झाडाची मुळे त्या नाल्यापर्यंत पोहोचली होती. नाल्याचे रूंदीकरण करणाऱ्या जेसीबीमुळे या बदामाच्या झाडाची मुळे कापली गेली. त्यामुळे ते बदामाचे झाड कोसळले. अरेरे... भौतिक गरजांची पूर्ती करताना पुन्हा एक झाड हकनाक मेले. या झाडाचा खून झाला. अर्थात या प्रसंगाची शहानिशा करून दोषींना शिक्षा होईल. पण उपनगरीय परिसरातील हे पहिलेच प्रकरण नसावे. उपनगराचे शहरीकरण होताना अनेकदा नाले, रस्ते, घर, शाळा, दुकान, बाजार वगैरेंचा विचार होतोच तसाच झाडांचाही होतोच होतो. सजीव म्हणून झाडांनाही माणसांसारखे विशिष्ट हक्क आहेतच. फक्त फरक इतकाच की, झाडं संवेदना असूनही बोलू शकत नाहीत. मुकी बिचारी असल्यामुळे त्यांच्यावर असंख्य अन्याय होतच असतात. गंमत म्हणून फुलं, पानं, फांद्या तोडणे, झाडाच्या खोडाला खिळे ठोकणे, झाडाच्या बाजूलाच वणवा जाळ पेटवणे, कुणाचीही जयंती असू दे का, वाढदिवस की कोणताही कार्यक्रम, शोभेच्या विजेची माळ झाडांच्या अंगाखांद्यावर इतकेच काय कर्कश्श आवाजाचे भोंगे झाडाला बांधलेले. सजीव म्हणून झाडाला याचा किती त्रास होत असेल, याची गणती न केलेली बरी. असो, दृष्टीआड सृष्टी, त्यामुळे झाडांना होणारा त्रास न दिसणारा असतो, त्यामुळे तो तितकासा कुणी विचारातही घेत नाही. पण मोक्याच्या ठिकाणची किंवा जिथे नव्या वसाहतींचा पुनर्विकास होत आहे, तिथलीच झाडे का मरत आहेत? कुणी सांगेल का?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@