बेलुगा देवमासा, जलचर आणि गुप्तचरसुद्धा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




रशियन नौदलाने शास्त्रीय उपकरणं अंगावर बांधलेला देवमासा आपल्या भागात सोडलाय म्हटल्यावर नॉर्वेला हेरगिरीचा संशय आला. त्यांनी तो त्वरित व्यक्त केला. यावर अजून रशियन नौदलाने वा सरकारने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क या युरोपखंडाच्या अति उत्तरेकडच्या देशांनास्कँडिनेव्हियन देश’ असं म्हटलं जातं. हे देश इतके चिमुकले आहेत की, त्यांचा शेजारी असलेल्या अवाढव्य रशियाच्या तुलनेत ते फारसे कोणाच्या खिजगणतीतही नसतात. या तीन देशांच्या बरोबर फिनलंड आणि आईसलँड हे देशही जमेस धरले, तर त्यांना ‘नॉर्डिक देश’ असंही म्हणतात. विशालकाय रशियन अस्वलाने आपल्या उजव्या बगलेत एखादं मेंढरू धरलेलं असावं, तसे ते भासतात. राजकीय किंवा लष्करीदृष्ट्या त्यांचं वजन सामान्य आहे. रशियाच्या तुलनेत ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी हेही चिमुकलेच म्हणायचे, पण त्यांचं वजन काय आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे परवाच्या एप्रिल २०१९ मध्ये रशियाने एका नॉर्वेजियन हेराला पकडल्याची बातमी ऐकून सगळ्यांनाच गंमत वाटली. चिमुकला नॉर्वे अवाढव्य रशियावर हेरगिरी करतो. अर्थात, यात नवल काहीच नाही. जगातला प्रत्येक देश आपल्या शेजारी देशांवर किंवा आपले आर्थिक, व्यापारी हितसंबंध जिथे गुंतलेत, त्या देशांवर हेरगिरी करतो. किंबहुना, कोणी असं करत नसेल, तर राजनैतिकद़ृष्ट्या त्याला बावळटच म्हटलं पाहिजे.

 

तर फोर्ड बर्ग नावाच्या ६३ वर्षीय नॉर्वेजियन इसमाला रशियन पोलिसांनी अटक केली. रशियन पाणबुड्यांबद्दलची गुप्त माहिती तो नॉर्वेची राजधानी ओस्लोकडे पाठवत असल्याच्या आरोपावरून त्याला १४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्या वकिलाने सांगितलं की, आपण हेरगिरी वगैरे करतोय, याचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला ठराविक दिवशी एक माणूस भेटायचा. तो त्याला चक्क एक उघडं पाकीट द्यायचा. पाकिटात काही पैसै, काही नकाशे आणि काही माहिती असे. तो माणूस ते सगळं याला दाखवून सांगायचा की, हे पाकीट तू ठराविक ठिकाणी नताशा नावाच्या बाईकडे द्यायचं. बस, तुझं काम संपलं. त्याबद्दल तुझा हा मोबादला. म्हणजे पाणबुड्यांची हेरगिरी करणार्‍या त्या अज्ञात मंडळींनी या फोर्ड बर्गला एखाद्या निरोप्याप्रमाणे वापरून घेतला.

 

नॉर्वेेजियन अधिकार्‍यांनी अर्थातच या सगळ्या प्रकरणाबाबत कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्यांनी वेगळाच मुद्दा पुढे आणला, जो फारच मजेदार आहे. नॉर्वेच्या अति उत्तरेकडच्या समुद्री भागाला ‘फिनमार्क रिजन’ असं म्हणतात. या फिनमार्कमधल्या नॉर्वेजियन मच्छीमारांना अलीकडे एक ‘बेलुगा’ जातीचा देवमासा वारंवार दिसतो. ‘बेलुगा व्हेल’ किंवा ‘बेलुगा देवमासा’ हा ११ ते १८ फूट लांब आणि १ हजार ते १६०० किलो वजनाचा पांढरा शुभ्र असा मुख्यतः आर्क्टिक समुद्रातच आढळतो. अवाढव्य देवमाशाने अख्खं प्रवासी जहाज गिळून टाकल्याच्या दंतकथा ‘सिंदबादच्या सफरीं’च्या गोष्टीत किंवा तशाच अद्भुत कथांमध्ये आढळतात. पण, प्रत्यक्षात देवमासे हे शार्क माशांप्रमाणे क्रूर नसतात. उलट ते शांत आणि आनंदी स्वभावाचे असतात. माणसानेच उलट गेल्या १००-१५० वर्षांत त्यांच्या शरीरातल्या चरबीयुक्त तेलासाठी, मांसासाठी त्यांची बेछूट शिकार करून त्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आणले आहे.

 

नॉर्वेजियन मच्छीमारांना हा ‘बेलुगा देवमासा’ वारंवार दिसू लागला. इतर अनेक देवमाशांमधून तो त्यांना वेगळा कळायला लागला. कारण, कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्याप्रमाणे त्याच्या मुस्कटावर एक वेसण घातलेली होती नि तिच्यावर चक्क काहीतरी अक्षरं होती. आणखी काही दिवसांनी हा देवमासा इतका धीट झाला की, खेळ म्हणून तो या मच्छीमार जहाजांवरचे दोर तोंडाने खेचू लागला. मग मच्छीमारांनी प्रयत्नपूर्वक त्याच्या वेसणीवरची अक्षरं वाचली. ती होती ‘सेंट पीटर्सबर्गची उपकरणे.’ म्हणजे या माशाच्या वेसणीवर काहीतरी शास्त्रीय उपकरणे बसवलेली आहेत, तेव्हा सावध राहावे. अलीकडे सगळ्याच देशांमधील शास्त्रज्ञ, प्राणी, पक्षी, जलचर यांच्यावर नाना तर्‍हेचे प्रयोग करीत असतात. पक्ष्यांच्या पायांना विशिष्ट कडी अडकवणे आणि त्याद्वारे त्यांचा प्रवास, विशिष्ट ऋतूंमधील स्थलांतर आदींचा अभ्यास करणे ही तर खूपच सामान्य बाब झाली आहे. तसेच सेंट पीटर्सबर्गमधील म्हणजेच रशियातले वैज्ञानिक काहीतरी प्रयोग करीत असावेत, म्हणून नॉर्वेजियन अधिकार्‍यांनी सेंट पीटर्सबर्गमधील जलचर संशोधन केंद्राकडे विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले की, “आम्ही सध्या तरी व्हेल माशांबाबत कसलाही प्रयोग हाती घेतलेला नाही.” तेव्हा हा मासा रशियन नौदलाचा असू शकतो. रशियन नौदलाच्या उत्तर विभागाचे एक केंद्र ‘सेव्हेरोमॉर्क्स’ हे व्हेल जिथे दिसतो तेथून जवळच आहे.

 

रशियन नौदलाने शास्त्रीय उपकरणं अंगावर बांधलेला देवमासा आपल्या भागात सोडलाय म्हटल्यावर नॉर्वेला हेरगिरीचा संशय आला. त्यांनी तो त्वरित व्यक्त केला. यावर अजून रशियन नौदलाने वा सरकारने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियनांनी पाण्यातल्या हेरगिरीसाठी देवमाशाचा उपयोग समजा केला असलाच, तर त्यातही फार नवल काही नाही. ब्रिटनने आणि अमेरिकेने गेल्या कित्येक वर्षांपासून प्राणी, पक्षी आणि जलचर यांचा हेरगिरीसाठी इतका सर्रास वापर केला आहे की, आपण आश्चर्याने थक्कच होतो. दुसर्‍या महायुद्धात चर्चिलने एक विशेष दल निर्माण केलं होतं. ‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप.’ खुद्द जर्मनीत किंवा जर्मनव्याप्त प्रदेशात सतत काहीतरी घातपाती कृत्यांवरून जर्मनांना हैराण करून सोडायचं, हे या दलाचे काम होते. या दलाने वापरलेल्या असंख्य युक्त्यांपैकी एक अशी एक अशी ग्रुपचे लोक ५०-६० उंदीर पकडायचे. त्यांना मारून त्यांच्या पोटात स्फोटकं दडवली जायची मग. ग्रुपचे हस्तक जर्मनव्याप्त प्रदेशातल्या एखाद्या कारखान्यात काहीतरी निमित्त काढून जायचे आणि आपल्याजवळचे हे मेलेले उंदीर जागोजागी टाकून ठेवायचे. मेलेल्या उंदरांचा ‘सुगंध’ दरवळायला लागला की, आपण काय करतो? उंदीर शोधून काढतो नि रस्त्यात टाकतो. पुढचं काम कावळे करतात. थंड प्रदेशात आणि विशेषत: कारखान्यात सगळ्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा एक उत्तम उपाय असतो. सगळा कचरा बॉयलरमध्ये फेकायचा. मग काय? धडाड्धूम! उंदरांच्या पोटात स्फोटकं थोडीच असायची, पण बॉयलर हा हवाबंद एअरकॉम्प्रेस्ड असतो ना! बॉयलरसह कारखाना हवेत उडायचा.

 

अशीच युक्ती ब्रिटिश सैन्याने अगदी आता इराकच्या युद्धात वापरली. रस्त्याच्या कडेला स्फोटकं ठेवायची. स्फोटकांवर वजन म्हणून एखादं मेलेलं कुत्रं वा मांजर ठेवायचं. वजन उचललं गेलं की स्फोट व्हावा, अशी योजना केलेली असायची. मागून येणारे इराकी सैनिक वा अतिरेकी मुजाहिदीन वगैरेंनी दुर्गंधी दूर करण्यासाठी तो प्राण्याचा मुडदा लाथेनं ठोकरला की, प्रचंड स्फोट व्हायचा आणि प्राण्यांच्या मुडद्याशेजारी जाणसांचे मुडदे पडायचे. अमेरिका तर १९६० सालापासून समुद्री कासवं, शार्क मासे, समुद्रपक्षी, सीलमासे आणि डॉल्फिन या सर्व प्राण्यांवर प्रयोग करते आहे. या सर्वांमध्ये डॉल्फिन माशांनी फारच उत्तम कामगिरी बजावली आहे. हा मासा बुद्धिमान असतो आणि शिकवलेल्या गोष्टी पटापट आत्मसात करतो. पाण्यात पेरलेले सुरुंग ओळखणं आणि नष्ट करणं हे फार महत्त्वाचं कार्य डॉल्फिन्सनी व्हिएतनाम युद्धात केलं. बहारीनच्या युद्धात केलं आणि परवाच्या इराक युद्धातही केलं. आपण नेहमी असं पाहतो की, मोठमोठ्या आलिशान कार्यालयांमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये माणसांना हालचाल करण्यावर खूपच कडक नियम असतात. अगदी एकाच कार्यालयातली माणसं असली तरी, एका विभागातून दुसर्‍या विभागात जाताना त्यांना आपली ओळखपत्रं यंत्रासमोर धरावी लागतात किंवा अंगठा यंत्रावर ठेवून ओळख पटवावी लागते. शिवाय जिकडेतिकडे सीसीटीव्हीचे कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून असतातच. पण, इतक्या कडेकोट कार्यालयात मांजरं मात्र बिनधास्त फिरत असतात. ती कुणाच्या विशिष्ट मालकीची नसतात.


जेवणाच्या वेळेमध्ये सगळेच जण त्यांना काहींना काही खायला घालतात
. कॅन्टीनची पोरं त्यांना उरलंसुरलं दूध घालतात. अमेरिकन हेरखात्याने म्हणजे ‘सीआयए’ने नेमकी ही गोष्ट हेरली. त्यांनी बरीच मांजरं पकडली. त्यांच्यावर चक्क शस्त्रक्रिया केली आणि त्यांच्या कानात सूक्ष्म मायक्रोफोन्स बसवले. म्हणजे आता पाहा. एखादा मोठा उद्योगपतीत्याच्या बोर्डरुममध्ये आपल्या उद्योगाच्या विस्तारयोजनेबद्दलकाहीतरी गुप्त माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देत असेल, तर ती माहिती तिथे लुडबुडणार्‍या मांजराच्या कानातल्या सूक्ष्म मायक्रोफोनमधून थेट ‘सीआयए’च्या मुख्यालयात रेकॉर्ड होत राहील. हीच गोष्ट शत्रुराष्ट्राचा नेता, सेनापती, अतिरेक्यांचा म्होरक्या अशा कोणाहीबाबत होऊ शकते.

या अफलातून योजनेवर ‘सीआयए’ने किती खर्च केला असेल? तर तब्बल २० दशलक्ष डॉलर्स! पण, ही योजना गुंडाळावी लागली. कारण, बाकी नको नको त्याचा अभ्यास करणार्‍या ‘सीआयए’ शास्त्रज्ञांनी मांजर या प्राण्याच्या मनोरचनेचा अभ्यास केला नाही. मांजर हे कुत्र्याप्रमाणे इमानी नाही. ते कधीही कुत्र्याप्रमाणे पूर्ण माणसाळत नाही आणि माणसाच्या आज्ञा पाळेलच याची खात्री नाही. ते स्वत:च्या मनाप्रमाणेच वागतं. म्हणजे आता कल्पना करा की, स्टॅलिन भाषण करतोय, त्यांच्या मांडीवर बसलेल्या मांजराच्या कानातून इकडे वॉशिंग्टनमध्ये ‘सीआयए’ प्रमुख अॅलन डल्लेस ते भाषण ऐकतोय. अरे, पण मध्येच हा कसला आवाज? हा तर उंदराचा आवाज. कारण, क्रेमलिनमधील एक उंदीर दिसल्यावर मांजर स्टॅलिनच्या मांडीवरून उतरुन उंदरामागे धावतंय. त्याला कसं थांबवणार?

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@