सक्ती किती आवश्यक, किती अनावश्यक?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019   
Total Views |


 
 

जीवनात शिस्त आणि सातत्य या नेहमीच यशप्राप्ती आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या बाबी ठरत असतात. आधुनिक काळात दैनंदिन कामासाठी नागरिकांचा बराचसा अवधी हा प्रवासात व्यतीत होत असतो. शहराअंतर्गत प्रवासासाठी आजमितीस दुचाकीचा सर्रास वापर होताना दिसत आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट आवश्यक आहे किंवा नाही, हा आजमितीस चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

 

नाशिकमध्ये सध्या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्ती आणि चारचाकी चालकांसाठी सीटबेल्टसक्ती यांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहर पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या या मोहिमेबद्दल अनेक तर्कवितर्क, मतमतांतरे शहरात नागरिकांमार्फत व्यक्त केली जात आहेत. शहर पोलिसांच्या मते, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे, हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नक्कीच आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात हेल्मेट न वापरल्याने अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरुणाई वेगाच्या नादात सुसाट वाहन चालवत असते. त्यामुळे अपघात झाल्यास डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघातमुक्त शहर अशी नाशिक शहराची ओळख निर्माण करण्यासाठी ही सक्ती करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत.

 

दुसरीकडे काही नागरिकांच्या मते हेल्मेटची सक्ती केली जाऊ नये, तर ती ऐच्छिक असावी. तसेच, हेल्मेटमुळे चेनस्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांचे फावते, असे मतदेखील काही नागरिक व्यक्त करतात. काही ज्येष्ठ नागरिकांच्या मते, त्यांनी हेल्मेट परिधान केल्यावर त्यांना वाहन चालविताना समस्या येते तसेच मागील गाडीचा हॉर्न ऐकू येणे, बाजूची गाडी दिसण्यात समस्या निर्माण होणे यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ दुचाकीस्वार यांना लक्ष्य न करता शहरातील बेशिस्त रिक्षाचालक, रस्त्यात मध्येच उभी करण्यात येणारी वाहने, नो पार्किंग झोनमधील वाहने आदी बाबींवरदेखील पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे, अशा आशयाचा सूरदेखील काही नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे.

 

आपण दोन्ही बाजू पाहिल्या तर, हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती असावी की नसावी, हा प्रश्न पुढे उभा ठाकतो. मुळात भारतीय मन हे मोठ्या प्रमाणात स्वयंशिस्तीचे आहे, असे नाही. काही भारतीय नागरिक हे शिस्त पाळणारे नक्कीच आहेत तर, काहींना हेल्मेट वापराबाबत खरोखर समस्यादेखील असतील. मात्र, हे जरी खरे असले तरी, कायद्याचे पालन स्वतःहून करणे याबाबत भारतात मोठ्या प्रमाणात उदासीनता आढळते.अगदी हेल्मेटचे उदाहरण जरी बाजूला ठेवले तरी, सिग्नल पाळणारे किती नागरिक आहेत, याचादेखील यासाठी आपण विचार करू शकतो. याउलट सक्ती केली किंवा एखादी गोष्ट अपरिहार्य आहे, असे सांगितले तर आपण सर्वजण लगेच त्या गोष्टीचा स्वीकार करतो.

 

पोलीस हा घटक घाबरविणारा नाही तर तो रक्षण करणारा आहे, हे आपल्यावर अन्याय झाला की, आपल्याला जाणवते. एरवी पुढे पोलीस उभे असतील तर, तो रस्ता बदलून आपले वाहन दामटविण्यात काही वाहनचालक धन्यता मानत असतात. हा विचार आपण सर्वांनीच बदलला, तरी कोणत्याही गोष्टीची सक्ती करून ती गोष्ट लागू करण्याची गरजच भासणार नाही, हे मात्र खरे. तसेच, मानवी मन हे सवयीचे गुलाम आहे. एखाद्या गोष्टीची सवय जर आपल्याला जडली तर, ती कायमस्वरूपी जडते. या सक्तीच्या माध्यमातून महिनाभर जरी ही मोहीम शहर पोलिसांनी राबविली तरी, एका महिन्यात नाशिककर नागरिकांना हेल्मेटची सवय लागण्याची आणि त्यातून अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

हीच बाब चारचाकी वाहनाच्या बाबतीतदेखील लागू होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच वाहनात सीटबेल्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, काही वाहनांत सीटबेल्ट न लावल्यास विशिष्ट प्रकरचा ध्वनी प्रसारित होण्याचीदेखील रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहन उत्पादन कंपन्यांनी चालकाची सुरक्षा आपल्या बाजूने पूर्णतः जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही कुछ नही होता.. या अविर्भावात काही कारचालक आपली बेफिकिरी दर्शवित असतात. सीटबेल्टचा वापर केल्याने प्राण वाचल्याच्या अनेक घटना समोर असूनही या बेफिकिरीस आळा घालण्यासाठी सक्तीशिवाय अजून कोणता पर्याय असू शकतो का, हाच मुळात प्रश्न आहे.

 

नाशिक शहर पोलीस आणि विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये यापूर्वी वाहनचालकांचे हेल्मेट आणि सीटबेल्टबाबत प्रबोधन करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. अगदी गणेशोत्सव काळात गणपतीची वेशभूषा केलेल्या नागरिकांच्या माध्यमातून गणपती आरती करत जीवनाचे महत्त्वदेखील नाशिक पोलिसांनी पटवून दिले आहे. तसेच, हेल्मेट परिधान करणार्‍यांचा रस्त्यावर गौरव करत इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनदेखील शहर पोलिसांनी केले आहे. त्यामुळे प्रबोधन करूनही जागृती होत नसेल तर, जागे करण्यासाठी सक्ती आणि दंडवसुली हाच पर्याय आहे, या भावनेतून शहर पोलिसांनी ही मोहीम आखली असावी.

 

सक्तीने सर्व प्रश्न सुटत नाहीत. उलट काही प्रश्न निर्माण होतात, असाही मतप्रवाह आहे. त्यातूनच शहरात वाढणार्‍या घरफोड्या, इतर अनुषंगिक कायदा- सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे पोलिसांचे असणारे दुर्लक्ष आणि उपरोक्त नमूद घटकांवर कारवाईची असणारी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत आणि यात काही चुकीचेदेखील नाही. सद्रक्षण करणे, जसे पोलिसांचे कर्तव्य आहे, तसे खलनिग्रहण करणे हीदेखील पोलिसांची जबाबदारी आहे. नाशिक पोलिसांनी हेल्मेटसक्तीऐवजी शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणावी, अशी अपेक्षा आहे आणि त्यात वावगे काहीच नाही. मात्र, असे असले तरी राज्यात गुन्हे प्रकटीकरण दरात नाशिकचा असणारा तिसरा क्रमांक दुर्लक्षित करून चालणार नाही.

 

सक्ती असावी की नसावी, यापेक्षा सक्ती करण्याची गरजच का निर्माण व्हावी, याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. भारतीय कायदा हा लोकप्रतिनिधींच्या सहभागाने तयार होत असतो. त्यामुळे भारतातील कायदे हे लोकमान्यता असणारे आहेत. त्यामुळे कायद्यात असणारी तरतूद ही सर्वांनी अमलात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक शिस्त आणि सामाजिक जाणीव समृद्ध होण्यास चालना मिळेल. कारणे, अडचणी या सर्वांनाच असतात. मात्र, त्यातून मार्ग काढत सामाजिक आणि व्यक्तिगत हिताचे पालन करणे आवश्यक असते. याच जाणिवेतून नाशिक पोलीस ही मोहीम राबवित असणार. त्यामुळे नाशिककर म्हणून आपण सर्वांनीच या मोहिमेचे स्वागत करत, यापुढे सक्ती करावी लागेल, अशी वेळ न आणण्यासाठी प्रयत्न करावयास हवे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@