गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी विम्याच्या खास योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019   
Total Views |


आरोग्य विम्याच्या मेडिक्लेमच्या ज्या पारंपरिक पॉलिसी आहेत, त्यात सर्व प्रकारचे आजार समाविष्ट असतात. पण, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार असे जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, अशा आजारांसाठी खास पॉलिसीज उपलब्ध आहेत. मधुमेहींना संरक्षण देणार्‍या पॉलिसीजची जी कमतरता होती, ती आता भरून निघाली आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असणार्‍यांनी त्यांच्या आजारासाठी असलेली खास पॉलिसी घ्यावीच, पण त्याशिवाय पारंपरिक पॉलिसीही घ्यावी.

 

भारतात मधुमेही रुग्णांचे प्रमाण भरपूर आहे. अशांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून बर्‍याच विमा कंपन्यांनी नव्या खास योजना कार्यरत केल्या आहेत. रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने मधुमेहींसाठी 'केअर फ्रीडम' या नावाची योजना जाहीर केली आहे. ही योजना सर्व वयोगटातील लोकांना संरक्षण देते. जे 'इन्सुलिन' वर अवलंबून आहेत, अशांनाही संरक्षण देते. ही विमा योजना कमाल दहा लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देते. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात २०१७ साली मधुमेहींची संख्या ७२ दशलक्ष होती. २०२५ सालापर्यंत ही संख्या १३४ दशलक्ष होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 'सिग्मा टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी'चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसून सिकदर यांच्या मते, या आकडेवारीपेक्षा मधुमेहींची संख्या भारतात अधिक आहे.

 

मधुमेहामुळे कालांतराने इतर अवयव निकामी होऊ शकतात व त्यावेळी उपचारांवर प्रचंड खर्च होतो. त्यामुळे विमा कंपन्या मधुमेहाला विमा संरक्षणात प्राधान्य देत नव्हत्या. एखाद्याला पॉलिसी घेताना मधुमेह असेल तर त्याला काही विमा पॉलिसीत संरक्षण मिळत नाही व मधुमेह व त्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर विमा कंपन्या याचा खर्च देत नाहीत. पॉलिसी काढताना असलेला आजार 'एक्सक्लुजन क्लॉज'मध्ये समाविष्ट केला जातो. पॉलिसी घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विमा पॉलिसी घेताना असलेल्या आजारांना संरक्षण मिळते. काही विमा कंपन्या पॉलिसी घेताना असलेल्या आजारांना अधिक प्रीमियम आकारून संरक्षण देतात.

 

'टाईप-२' मधुमेहींना बहुतेक विमा कंपन्या संरक्षण देतात. हा मधुमेह खाण्याच्या सवयी व जीवनपद्धतीमुळे होतो. पारंपरिक विमा पॉलिसीत जास्त प्रीमियम आकारून 'टाईप-२' प्रकारच्या मधुमेहाला संरक्षण दिले जाते. पण, हे संरक्षण पॉलिसी काढल्यापासून चार वर्षांनंतर दिले जाते. पण, यासाठी पॉलिसीत सातत्य हवे. पॉलिसीचे 'अंडररायटिंग' काम केले आहे, हेही याबाबत महत्त्वाचे आहे. काही काही पॉलिसींच्या अंडररायटिंगमध्ये मधुमेहाचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढले तर विमा संरक्षण दिले जात नाही. पण, मधुमेहासाठी खास असलेल्या योजनांमध्ये सर्व प्रकारचे संरक्षण उपलब्ध असते.

 

मधुमेहींसाठी 'रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी'शिवाय 'सिग्मा टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी'ची 'प्रो हेल्थ' या नावाची पॉलिसी 'टाईप-२'च्या मधुमेहींना संरक्षण देते. ही पॉलिसी अडीच लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतची उतरविता येते. 'स्टार हेल्थ इन्शुरन्स'ची 'डायबेटिस सेफ' या नावाची पॉलिसी असून ही पॉलिसी तीन लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंतची उतरविता येते. या पॉलिसीत रुग्णालयात भरती झाल्यास पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे विम्याचा दावा संमत होतो. उदाहरणच द्यायचे तर, रुग्णालयाने तुम्हाला खोलीचे भाडे कितीही आकारले तरी विमा कंपन्या साधारणपणे उतरविलेल्या विम्याच्या रकमेच्या एक टक्का रक्कमच खोली भाडे रोज मंजूर करतात. समजा, एखाद्याची पॉलिसी रक्कम १ लाख रुपये असेल तर, त्याला रुग्णालयात भरती असलेल्या काळात दररोज खोलीचे भाडे म्हणून एक हजार रुपये विमा दावा मंजूर केला जाणार.

मधुमेही रुग्ण जर घरी औषधोपचार घेत असेल, तर मधुमेहींसाठीच्या खास पॉलिसीत याचाही खर्च नियमांनुसार मिळू शकतो. अशा उपचारांना विम्याच्या भाषेत 'डोमिसिलरी' उपचार म्हटले जाते. मधुमेहावर उपचारांची गरज आहे, पण काही कारणांसाठी रुग्णालयामध्ये दाखल न करता घरीच उपचार दिले जात असतील व असे उपचार तीन दिवसांहून अधिक कालावधीसाठी दिले गेले, तर अशा उपचारांचा दावाही संमत होऊ शकतो. मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब होऊ शकते, दृष्टी कमी होऊ शकते, गँगरिन होऊ शकते व गँगरिन झाल्यास अवयवही कापावा लागतो. हे गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. तसेच मानसिक उदासीनता, वाढीव रक्तदाब, भय वगैरेंसारखे कमी गंभीर स्वरूपाचे आजारही होऊ शकतात. अशा कमी गंभीर स्वरूपाच्या आजारांनाही 'रेलिगेअर', 'सिग्मा टीटीके' व 'बजाज अलायन्स' या विमा कंपन्या संरक्षण देतात. विम्याचा दावा संमत करताना रुग्णालयाचाही विचार केला जातो. जर रुग्णालय लहान असेल व तेथे पंधराहून कमी खाटा असतील तर विम्याच्या दाव्याची कागदपत्रे सादर करताना अशा लहान रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही सादर करावे लागते.

आरोग्य विम्याच्या मेडिक्लेमच्या ज्या पारंपरिक पॉलिसी आहेत, त्यात सर्व प्रकारचे आजार समाविष्ट असतात. पण, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार असे जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, अशा आजारांसाठी खास पॉलिसीज उपलब्ध आहेत. मधुमेहींना संरक्षण देणार्‍या पॉलिसीजची जी कमतरता होती, ती आता भरून निघाली आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असणार्‍यांनी त्यांच्या आजारासाठी असलेली खास पॉलिसी घ्यावीच, पण त्याशिवाय पारंपरिक पॉलिसीही घ्यावी. समजा, एखाद्याचे मधुमेहींसाठी खास असलेली पॉलिसी उतरविली आहे, पण त्याने पारंपरिक पॉलिसी घेतलेली नाही व अशा पॉलिसीधारकाची समजा, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली तर अशा पॉलिसीधारक मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा दावा करू शकणार नाही. त्यामुळे खास पॉलिसी उतरविणार्‍याने पारंपरिक पॉलिसीही उतरवायला पाहिजे. एक वेळ गंभीर आजारांसाठी असलेली विमा पॉलिसी नाही उतरवली तरी चालेल, पण पारंपरिक आरोग्य विमा पॉलिसी उतरावयासच हवी. दोन्ही पॉलिसी उतरविल्यास फारच चांगले.

 

आरोग्य विम्याच्या भरलेल्या 'प्रीमियम' वर आयकर सवलत मिळते, हा आणखी एक फायदा आहे. गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या पॉलिसीत त्या गंभीर स्वरूपाच्या आजाराचा विम्याचा दावा जितक्या जास्त रकमेचा मंजूर होणार, तितका पारंपरिक पॉलिसीत होेणार नाही. दोन्ही पॉलिसी एकाच कंपनीच्या उपलब्ध असल्यास एकाच कंपनीत उतरविता येतील. तसेच वेगवेगळ्या कंपनीच्याही उतरविल्यास चालतात. सर्व प्रकारच्या आरोग्य विम्याचा कालावधी एक वर्ष असतो. शक्यतो, विमा पॉलिसी अंतिम मुुदतीपूर्वी नूतनीकरण करण्याचे राहून गेले तर मुदतपूर्तीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत नूतनीकरण करता येते. पण, मुदतपूर्तीच्या तारखेपासून नूतनीकरण केलेल्या तारखेपर्यंतच्या कालावधीत विम्याचा दावा दाखल करून घेतला जात नाही व संमत केला जात नाही. जर एक महिना उलटून गेला तर मात्र ती पॉलिसी पुन्हा नव्याने उतरविली जाते. जुन्या पॉलिसीत असलेले फायदे या नवीन पॉलिसीत समाविष्ट होत नाहीत व प्रतीक्षा कालावधी वगैरेचे नियम नव्याने लागू होतात. समजा, हर्नियाच्या उपचारासाठी एक वर्षाचा प्रतीक्षा कालावधी (थरळींळपस झशीळेव) असेल तर असे नियम पुन्हा नव्याने लागू होतीलभारतात १०० स्थूल व्यक्तीपैंकी ३८ व्यक्तींना मधुमेह असतो. अशा या प्रचंड मधुमेही असणार्‍या भारत देशात, त्यांच्यासाठी खास आरोग्य विमा योजना असणे गरजेचे होते व ती गरज आता कित्येक विमा कंपन्यांनी पूर्ण करून मधुमेहींना दिलासा दिला आहे.



g.shashank२५@gmail.com

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@