ममता ते मणिशंकर : राजकीय सुडाचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |

 
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याला पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. राजधानी कोलकाता येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रोडशोवर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला, दगडफेक करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. या हिंसाचाराचा करावा तेवढा निषेध कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सुडाच्या प्रवासात शब्दश: लोकशाहीचा गळा आवळला आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश आणि बिहार ही राज्ये गुंडागर्दीसाठी ओळखली जात होती, कोणतीही निवडणूक म्हटली की या दोन्ही राज्यात हिंसाचार, गोळीबार, मतदान केंद्र ताब्यात घेणे, बोगस मतदान असे अनेक प्रकार होत होते. यावेळी उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या काळात कोणतेही मोठे गैरप्रकार झाले नाही, आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या नाही. बंगालमधील स्थिती उपद्रवग्रस्त जम्मू काश्मीरसारखी झाली आहे. यावेळी निवडणूक गैरप्रकाराच्या आणि हिंसाचाराच्याही सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्या. तसे पाहिले तर पश्चिम बंगाल हे नक्षलप्रभावित राज्य आहे. मात्र घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये नक्षलवाद्यांचा कोणताही हात नाही. हा सारा हिंसाचार आणि निवडणूक गैरप्रकाराच्या घटना तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या इशार्यावर घडवून आणल्या आहे.
 
 
 
पश्चिम बंगाल मध्ये डाव्यांच्या काळातही हिंसाचाराच्या घटना होत होत्या, पण यावेळी होणार्या हिंसाचाराच्या घटनांची व्याप्ती आणि गांभीर्य खूप जास्त आहे.पश्चिम बंगालमध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता, त्यात भाजपासह अन्य विरोधी पक्षांच्या 60 कार्यकत्यार्र्चा बळी गेला होता. त्या निवडणुकीतून ममता बॅनर्जी सत्ताप्राप्तीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून आले. सारा माध्यमांनी ममतांच्या तोंडात शेण घातले तरी त्यांना त्याची खंत नाही. अमित शाह यांच्या रोडशोवर हल्ला करूनच तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी विद्यासागर महाविद्यालयाच्या प्रांगणात घुसून थोर समाजसेवक ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड केली. पश्चिम बंगालच्या जनतेच्या दृष्टीने ही सर्वांत गंभीर आणि आक्षेपार्ह घटना म्हणावी लागेल. पश्चिम बंगालची जनता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद विद्यासागर यांना खूप मानते. हे दोन्ही महापुरुष बंगाली जनतेचे आराध्यदैवतच म्हणावे लागतील. त्यामुळे विद्यासागर यांच्या पुतळ्याची तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी तोडफोड करणे बंगाली जनता कधीच खपवून घेणार नाही.
 
 
ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून त्याचे खापर भाजपावर फोडण्याचा तृणमूल कॉंग्रेसचा प्रयत्न होता, पण तो त्यांच्यावरच उलटला. या घटनेमुळे राज्यातील जनता तृणमूल कॉंग्रेसवर प्रचंड खवळली आहे. ममता बॅनर्जी यांची वागणूकही मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघून देण्याची धमकी ही ममता बॅनर्जी यांना शोभणारी असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही. एका राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानाला पाहून घेण्याची धमकीच कशी देऊ शकतो, हा प्रकार संघ राज्य प्रणालीसाठी धोकादायक म्हणावा लागेल. एवढ्या एका कारणावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करता येऊ शकते. मुळात ममता बॅनर्जी यांनी स्वत: आणि त्यांच्या सरकारने आतापर्यंत एवढ्या घोडचुका केल्या की, यातील प्रत्येक मुद्यावर त्यांचे सरकार बरखास्त करता येऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणुकीच्या काळात टिका करण्याचा ममता बॅनर्जी यांना अधिकार आहे. मात्र ही टिका करतांना प्रत्येकवेळी ममता बॅनर्जी यांचा तोल गेला आहे. अथवा त्यांनी जाणिवपूर्वक आपला तोल जाऊ दिला आहे, असेच म्हणावे लागेल. मी किती आक्रमक आहे, पंतप्रधानांनाही भीत नाही, हे दाखवण्याच्या नादात ममता बॅनर्जी यांनी सभ्य राजकारणाच्या सर्व मर्यादा कधी ओलांडल्या, हे त्यांनाही समजले नाही.
 
 
पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणार्या ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांचा व्यक्ती म्हणून नाही तर ते ज्या पदावर आहे, त्या पंतप्रधान पदाचा तरी आदर करायला पाहिजे. पण ममता बॅनर्जी यांना हे सांगणार कोण? मुळात ममता बॅनर्जी यांना हे समजत नाही, असे नाही, पण सुडाने आंधळी झालेली व्यक्ती जसे स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसते आणि आपण काय करत आहोत, याचे जसे त्याचे भान सुटते, तशी स्थिती ममता बॅनर्जी यांची झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, भाजपाने चोरपावलांनी बंगालमध्ये मारलेली जबरदस्त मुसंडी. मोदी को एकभी सीट नही मिलेगा म्हणणार्या ममतांनी इतके चवताळून उठणे यातच सर्वकाही आले. ममतांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा समयी जागा फारच कमी मिळाल्या तर आपण कोणते तोंड घेऊन अन्य विरोधी पक्षांकडे जाणार, याचीच चिंता त्यांना सतावीत आहे. तिकडे मोदी आणि अमित शाह यांनी ममतांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे.
 
 
 
ममता बॅनर्जी यांची ही वागणूक कमी होती की काय म्हणून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ‘एम कॅडर’चे मणिशंकर अय्यर यांनी आपल्या वागणुकीने राजकारणातील ‘नीचपणाचा’ कळस गाठला आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हटले होते. त्यावेळी गदारोळ झाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना निलंबित केले होते. मात्र नंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. एवढी ठेच लागल्यावरही अय्यर यांना शहाणपण आले नाही. पहिल्यांदा ठेच लागल्यानंतर पुन्हा ठेच लागणार नाही, यासाठी प्रयत्न करणार्याला, काळजीपूर्वक पावले टाकणार्याला शहाणा म्हटले जाते. पण पहिल्यांदा ठेच लागल्यानंतरही दुसर्यांदा चुकून नाही तर जाणूनबुजून जो स्वत:ला ठेच लागावी म्हणून पावले टाकतो, त्याला शहाणा कसे म्हणता येईल. त्याची गणना मुर्खातच करावी लागेल. अय्यर यांनी या दुसर्या गटात स्वत:चा समावेश करुन घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात यावेळी कुठेच न दिसणारे अय्यर आतापर्यंत काहीच कसे बोलले नाही, असा विचार लोक करत असताना अय्यर यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. मोदी नीच असल्याचा आपल्या एका ताज्या लेखातून त्यांनी पुनरुच्चार केला. यावर पत्रकारांनी त्यांची भूमिका विचारली असता, तुमच्या जाळ्यात फसण्याइतका मी उल्लू नाही, असे अय्यर म्हणाले.
 
 
 
मुळात अय्यर हे उल्लू असल्यामुळेच त्यांनी मोदी यांना नीच म्हणण्याचा उल्लुपणा केला आहे. आधी आपल्या या उल्लुपणाची राजकीय किंमत चुकवली असतानाही अय्यर यांना शहाणपण येत नसेल आणि तीच चूक ते पुन्हा करत असतील, तर त्यांना उल्लूच म्हटले पाहिजे. विशेष म्हणजे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना शिविगाळ करत आणि अंगावर धावून जात अय्यर यांनी आपला उल्लुपणा सिद्ध करुन दाखवला आहे. उल्लुपणा करण्याची ही अय्यर यांची पहिलीच वेळ नाही. तर आपल्या उल्लुपणाची मालिका त्यांनी सादर केली आहे. याआधीही अय्यर यांनी मंत्री असतांना अंदमान येथील सेल्युलर जेलसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकरांची नामपट्टिका काढून फेकली होती. त्यामुळेच भाजपाने गाली गँगचे प्रमुख असा अय्यर यांचा केलेला उल्लेख अचूक आहे.
 
 
 
 
ममता बॅनर्जी असो की मणिशंकर अय्यर हे भाजपावर जेवढे तुटून पडतील, भाजपाची कोंडी करण्याचे जेवढे प्रयत्न करतील, तेवढा भाजपाचा फायदा होणार आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात ममता बॅनर्जी आणि मणिशंकर अय्यरच जाऊन पडणार आहेत. मणिशंकर अय्यर यांच्याजवळ आता गमावण्यासारखे फारसे काही नसले तरी ममता बॅनर्जी यांच्याजवळ बरेच काही आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांच्या वाटेने ममता बॅनर्जी यांनी जाऊ नये. आपल्या आक्रमक नाही तर आक्रस्ताळ्या वागणुकीने ममता बॅनर्जी यांनी स्वत:चे मोठे नुकसान करुन घेतले आहे. आपल्या हाताने आपल्या पायावर कुर्हाड पाडून घेतली आहे. भाजपाचे नुकसान करण्याच्या नादात आपण आपले किती मोठे राजकीय नुकसान करून घेतले याची जाणिव ममता बॅनर्जी यांना 23 मेची मतमोजणी आटोपल्यावर होणार आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असणार आहे. कारण तोपर्यंत पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांना ईव्हीएममधून त्यांची जागा दाखवलेली असेल.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@