श्रीकृष्णाची युद्धयुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2019
Total Views |




युद्धाचा पंधरावा दिवस उजाडला. द्रोण भयंकर क्रुद्ध झाले होते. कारण, दुर्योधनाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ते पांडवांना पाठीशी घालतात, असा दोषारोप लावला होता. ते त्यामुळे भडकलेल्या आगीसारखे दिसत होते. त्यांनी पांचाळांना निष्प्रभ केले. द्रुपदाचे तीन नातू ठार मारले. भाले फेकून द्रुपद आणि विराट या दोन्ही महान योद्ध्यांना ठार मारले. धृष्टद्युम्न हे पाहून खूप संतापला आणि त्याने प्रतिज्ञाच केली की,"मी द्रोणांना आज यमसदनी पाठवणार." त्याला मदत करण्यास भीम आणि अर्जुन पुढे आले.

 

द्रोण आणि अर्जुन यांच्यात प्रेक्षणीय असे द्वंद्वयुद्ध झाले. दोघेही विविध अस्त्रांचा वापर करत होते. शेवटी द्रोणांनी ब्रह्मास्त्र हाती घेतले आणि पांडवसैन्यात घबराट झाली. सर्व पंचमहाभूते कापत होती, पृथ्वी दोलायमान झाली, आकाशात काळोख पसरला. द्रोणांनी ब्रह्मास्त्र सोडले आणि आश्चर्य म्हणजे अर्जुनाने उत्तर म्हणून तेच अस्त्र सोडले. त्या दोन्ही अस्त्रांनी एकमेकांचा नाश केला. दुर्योधन आणि सात्यकी गुरुबंधू व समकक्ष. ते दोघेही आज एकमेकांविरुद्ध लढत होते. लढता लढता दोघेही बालपणीच्या आठवणी सांगत होते. खूप निकराचे युद्ध झाले. शेवटी सात्यकीने दुर्योधनाला हरवले आणि तो उद्विग्न अवस्थेत निघून गेला.

 

द्रोणांचा क्रुद्ध अवतार पाहून कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, "आज हा माणूस हरेल असे वाटत नाही. ते आपणहून शस्त्रे खाली ठेवतील, अशी परिस्थिती युक्तीने निर्माण केली पाहिजे. आपला प्रिय पुत्र अश्वत्थामा मारला गेला, असे त्यांना सांगितले तरच ते शस्त्रे खाली ठेवतील." पण, अर्जुनाला ही सूचना आवडली नाही. युधिष्ठिराने पण ती बर्‍याच कालावधीनंतर मान्य केली. मग भीम पुढे सरसावला, "त्याने कौरवांचा 'अश्वत्थामा' नावाचा गजराज मारला आणि द्रोणांच्या जवळ जाऊन अत्यंत दु:खाने भारावलेल्या आवाजात त्यांना सांगितले की, "अश्वत्थामा मारला गेला." हे ऐकून द्रोण खूपच अस्वस्थ झाले. काही क्षण तर त्यांची शुद्धच हरपली. पण, भानावर आल्यावर ते विचार करू लागले की,"माझ्या शूर पुत्राचा वध कोण करू शकेल?" त्यांचा भीमाच्या वक्तव्यावर विश्वास बसेना. मग ते तो विचार सोडून धृष्टद्युम्नशी लढू लागले. त्यांच्या क्रोधाने परिसीमा गाठली आणि त्यांनी ब्रह्मास्त्राला आवाहन केले आणि युद्धाचे सर्व नीतिनियम सोडून ते अस्त्र पांचाल व सोमक यांच्या सैन्यावर सोडले. त्यामुळे हाहाकार उडाला.

 

अमानुष नरसंहार झाला. त्यांचे हे कृत्य पाहून आकाशातील ऋषी धरेवर आले. त्यामध्ये द्रोणाचे वडील भारद्वाज होते. हे ऋषी सर्वसामान्य व्यक्तींना दिसत नव्हते. ते द्रोणांना म्हणाले, "द्रोणा, तुझे हे कृत्य सत्धर्माला धरून नाही. स्वत:ला सावर आणि आता तुझ्या मृत्यूची वेळ समीप आली आहे. आमच्याकडे पाहा आणि तुझी शस्त्रे खाली ठेव. तू प्रत्यक्ष वेदांचा प्रभू आहेस, तेव्हा आमच्याकडे पाहिल्यावर अशा निर्दय कामात गुंतू नकोस. तुझ्या नयनांवर अज्ञानाचा पडदा आहे, तो काढून टाक. तू असं ब्रह्मास्त्र त्या निरपराध जीवांवर वापरणे चांगले नाही. ही तुझी चूक आहे. त्यामुळे तुझी शस्त्रे खाली ठेव."

 

त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांना पुन्हा भीमाचे बोलणे आठवले व ते परत अस्वस्थ झाले. त्यांचा वध करण्यासाठी ज्याने या पृथ्वीवर जन्म घेतला तो धृष्टद्युम्न त्यांना समोर दिसला आणि त्यांनी युधिष्ठिराला विचारलं, "वत्सा, मला खरे सांग माझा पुत्र अश्वत्थामा युद्धात ठार झाला, हे खरे आहे का?" सर्व पृथ्वीचे राज्य जरी देऊ केले तरी युधिष्ठिर असत्य बोलणार नाही हे त्यांना माहीत होते. हा क्षण येणार हे फक्त कृष्णानेच अगोदर जाणले. त्याने युधिष्ठिराला आधीच सांगितले, "द्रोण जर अर्धा दिवस असे लढत राहिले, तर तुझ्या सैन्यातील एकही माणूस शिल्लक राहणार नाही. तेव्हा तुला असत्याचा आधार घेणे भाग आहे. तुझे सैन्य वाचविण्यासाठी तू असत्य बोललास, तर ते असत्य ठरणार नाही. हे पाप तुला लागणार नाही, अशी मी खात्री देतो." म्हणून युधिष्ठिराने भीमाला तसे करण्यास सांगितले.

 

भीमाने मालव राजाच्या ताब्यात असलेला 'अश्वत्थामा' नावाचा हत्ती ठार केला आणि बतावणी केली की, "अश्वत्थामा मारला गेला." भीम पण युधिष्ठिराला म्हणाला, "कृष्ण काय म्हणतो तेच तू ऐक आणि द्रोणांना सांग की, हो! अश्वत्थामा मारला गेला, हे खरे आहे." तुझ्यावर त्यांचा नक्कीच विश्वास बसेल. कारण, तुझ्याविषयी त्यांना खूप आदर आहे. युधिष्ठिराने होकार दिला आणि द्रोणांना म्हणाला, "अश्वत्थामा मृत आहे." नंतर थोडे थांबून तो हळू आवाजात बोलला, "अश्वत्थामा नावाचा हत्ती". असे म्हणतात की, धर्मराज युधिष्ठिराच्या अविचल धर्मनिष्ठेमुळे त्याचा रथ जमिनीच्या वर चार अंगुळे चालत असे. पण, आताचे हे खोटे बोल ऐकून त्याचा रथ जमिनीवर आला. आज युधिष्ठिर एका सामान्य माणसासारखा वागला.

 

युधिष्ठिराचे पहिले शब्दच द्रोणांच्या कानांपर्यंत पोहोचले. पुढचे शब्द त्यांनी ऐकलेच नाही आणि त्यांचा युद्धातील रस पार निघून गेला. ते बेशुद्ध पडले. पुन्हा शुद्धीवर आले खरे; पण आता युद्धात त्यांचे मन अजिबात लागत नव्हते. इतक्यात धृष्टद्युम्न त्यांच्याजवळ आला व त्याने एक तीक्ष्ण बाण त्यांच्यावर सोडला. त्याचा प्रतिकार ते पूर्वीइतक्या ताकदीने करू शकत नव्हते. आपली ही क्षीण अवस्था पाहून ते संतापले आणि त्वेषाने त्यांनी अधिक बळकट असे अंगिरस ऋषींनी दिलेले धनुष्य हाती घेऊन लढायला सुरुवात केली. त्यांनी धृष्टद्युम्नचा रथ तोडला, धनुष्य मोडले, घोडे मारून टाकले. तो हाती तलवार घेऊन द्रोणांकडे झेपावला. पण, द्रोणांनी त्याची तलवारसुद्धा बाण सोडून मोडून टाकली. चिलखतही मोडले. तो असाहाय्य अवस्थेत असताना द्रोणांनी 'वैतास्मिक' नावाचे बाण त्याच्यावर सोडले. हे बाण अगदी जवळ आलेल्या शत्रूवर वापरले जातात. त्यांचा सामना कसा करायचा, हे कृप, अर्जुन, राधेय, द्रोण, कृष्ण, प्रद्युम्न आणि सात्यकी या मोजक्याच योद्ध्यांना माहिती होते. आता धृष्टद्युम्न ठार होईल, असे द्रोणांना वाटले. इतक्यात हे सर्व पाहत असलेला सात्यकी पुढे आला आणि त्याने द्रोणांचे हे 'वैतास्मिक' बाण रोखून धृष्टद्युम्नचा जीव वाचविला. हे पाहून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांना खूप आनंद झाला.

 

- सुरेश कुळकर्णी 

[email protected]

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@