युवकांचा कृषीथॉनतर्फे होणार सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |



नाशिक : दर वर्षी नाशिक येथे कृषीथॉन हे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविणाऱ्या 'ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन'तर्फे कृषी क्षेत्रास प्रोत्साहित करणाऱ्या युवकांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे. पुरस्कारार्थी निश्चित झाल्यावर नाशिक येथे होणाऱ्या कृषीथॉन आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या १४ व्या आवृत्तीमध्ये मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी दिली. कृषी व कृषी संबंधित क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील निवडक लोकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

कृषी, कृषी संशोधन व कृषी उद्योग या क्षेत्रात प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट), प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट), प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार व प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार अशा चार गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. युवा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरे जाताना तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अशा युवकांचा व महिलांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा आणि त्यांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाची योग्य दखल घेतली जावी, या हेतूने ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कारसमारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याचे न्याहारकर यांनी सांगितले.

 

२१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनातील 'कृषीथॉन युवा' सन्मान पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची मुदत १ ऑक्टोबर असून, अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. आपले प्रस्ताव संपूर्ण नाव, पत्ता आणि आपण राबविलेल्या शेतीतील अथवा कृषी उद्योग व संशोधन क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती छायाचित्रे व वृत्तपत्रातील कात्रणे आदींसह आपले नामांकन अर्ज ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया हाऊस, वृंदावन लॉन्स समोर, आनंदी नगर, आनंदवल्ली, गंगापूर रोड नाशिक - ४२२०१३ या पत्त्यावर जमा करावेत किंवा [email protected] या ई-मेल वर पाठवावेत. अधिक माहितीकरिता भरत निकम - ७७२००३०१४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@