फुटका 'मणी' अवतरला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |



नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, अशी भाकिते करणार्‍या मणिशंकर अय्यरसारख्यांची यामुळे जशी गोची झाली, तसेच त्यांचे मानसिक संतुलनही ढळत गेले. गेल्या पाच वर्षांतील मणिशंकर अय्यर वा तशा विचारांच्या लोकांची वक्तव्ये तपासून पाहिली की त्याची खात्री पटते.

 

तुम्हाला आठवते, २०१७ मध्ये मी मोदींबद्दल काय म्हणालो होतो? माझी भविष्यवाणी खरी ठरली की नाही?” - इति मणिशंकर अय्यर! सतराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि अनेकांना सोळाव्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींविरोधात बेताल बडबड करणार्‍या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची आठवण आली. कारण, “नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही. परंतु, ते काँग्रेस कार्यालयाबाहेर येऊन चहा विकू शकतात. आम्ही मोदींना चहाच्या टपरीसाठी जागा देऊ,” असे विधान अय्यर यांनी पाच वर्षांपूर्वी केले होते. तद्नंतरचा सगळाच प्रचार नरेंद्र मोदी आणि भाजपने 'चहावाला' या एका शब्दाभोवती फिरवत ठिकठिकाणी 'चाय पे चर्चा'सारखे कार्यक्रम हाती घेतले. परिणामी, मोदींची विकासपुरुषाइतकीच चहावाल्याची प्रतिमाही देशभरातील जनतेला प्रचंड भावली. मोदी आपल्यासारखाच सामान्य माणूस आहे, म्हणूनच आपल्याला दैनंदिन आयुष्य जगताना भेडसावणारे प्रश्न तो नक्कीच सोडवू शकतो, गांधी घराण्यासारखा वर्षानुवर्षे सत्ता भोगताना हस्तीदंती मनोर्‍यात राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग तो करणार नाही, असा विश्वास जनतेत निर्माण झाला. पुढे मतदान पार पडले, भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि मोदींचा पंतप्रधानपदी शपथविधी झाला, हा घटनाक्रम तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु, मोदी पंतप्रधान होणार नाही, अशी भाकिते करणार्‍या मणिशंकर अय्यरसारख्यांची यामुळे जशी गोची झाली, तसेच त्यांचे मानसिक संतुलनही ढळत गेले. गेल्या पाच वर्षांतील मणिशंकर अय्यर वा तशा विचारांच्या लोकांची वक्तव्ये तपासून पाहिली की त्याची खात्री पटते.

 

२०१७ मधल्या एका लेखात मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख 'नीच आदमी' असा केला होता. आताही लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच मणिशंकर अय्यर यांनी, आपण अजूनही 'नीच आदमी' विधानावर ठाम असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आपण मोदींबद्दल केलेले 'नीच आदमी' हे विधान सत्यात उतरल्याचेही ते म्हणाले. खरे म्हणजे यंदा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासूनच मणिशंकर अय्यर कुठे गायब झाले, मणिशंकर अय्यर कधी येतील, मणिशंकर अय्यर काय बोलतील, असा सवाल कित्येकांकडून विचारण्यात येत होता. मतदानाचे सहा टप्पे होऊनही ते आले नाही, तेव्हा मणिशंकर अय्यर यांच्या एकाएकी अदृश्य होण्यावरून अनेक शंका-कुशंकांनीही जन्म घेतला. भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवेळी मणिशंकर अय्यर तिथे उपस्थित होते आणि तिथेच त्यांचे काही बरेवाईट झाले, अशा वावड्याही उठल्या. परंतु, या सगळ्याच व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठांतून पसरलेल्या अफवा होत्या; त्याचीच ग्वाही आता खुद्द मणिशंकर अय्यर यांनी माध्यमांसमोर येऊन दिली, हे बरेच झाले. वस्तुतः मणिशंकर अय्यर यांनी केलेले 'नीच आदमी' हे विधान त्यांचे नसून काँग्रेसी मानसिकता निदर्शक आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी आल्यापासून मोदींविरोधात काँग्रेसने बदनामीची मोहीम उघडली. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधींनी 'मौत का सौदागर' म्हणत नरेंद्र मोदींविरोधात विखार पसरवला. गेल्या २० वर्षांत 'गंदी नाली का कीडा', 'पागल कुत्ता', 'भस्मासूर', 'दहशतवादी', 'गंगू तेली', 'बंदर', 'व्हायरस', 'हिटलर', 'उंदीर', 'नालायक', 'नमकहराम', 'खून का दलाल', 'गधा', 'नामर्द', 'निकम्मा', '*तिया', 'चोर', 'औरंगजेब', 'तुघलक' यांसारख्या अतिशय अवमानकारक शिव्या काँग्रेसी नेत्यांनी मोदींसाठी वापरल्या. काँग्रेसकडे मोदींचा सामना करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यानेच त्या पक्षाचे नेते अशाप्रकारे तोल सुटल्यासारखी विधाने करत असल्याचे यातून पाहायला मिळाले.

 

नरेंद्र मोदींसारखा तळागाळातील माणूस देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचे दुःखही काँग्रेस या शब्दांतून व्यक्त करत असते. आपल्या बापजाद्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून देशातील सत्तेचा मुकुट सदासर्वकाळ आपल्याच डोक्यावर असावा, असे गांधी परिवाराला नेहमीच वाटत आले. परंतु, मोदी सत्तेवर आल्याने गांधी परिवाराचे हे स्वप्न भंगले. परिणामी, आपल्या मालकाची ही इच्छा पूर्ण न झाल्याने चवताळलेले काँग्रेसी एकामागोमाग एक नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करत राहिले. काँग्रेसश्रेष्ठींनाही अशा वाक्यांतून जनतेत नरेंद्र मोदींविरोधी लाट निर्माण होईल व आपण पुन्हा सत्तेवर येऊ, अशी सुखद आशा निर्माण झाली. परंतु, काँग्रेसी गुलामांनी केलेल्या वक्तव्यांतून लाट तर सोडाच, झुळूकही निर्माण झाली नाही. उलट देशभरातल्या लोकांमध्ये निराळाच संदेश गेला. अहंकारी आणि दुसर्‍याला कमी लेखण्याच्या नादात काँग्रेसचीच प्रकृती तोळामासा झाली. अर्थात, हे बरेच म्हटले पाहिजे. कारण, इतरांना दर्जाहीन ठरविणारा पक्ष ताकदवान होऊन जनतेचा तरी काय लाभ होणार म्हणा? आताचे मणिशंकर अय्यर यांचे नरेंद्र मोदींबद्दलच्या विधानावर ठाम आहे, असे म्हणणे काँग्रेसला आणखी रसातळाला नेणार हे नक्कीच, पण यावरून समाजमाध्यमांत जोक्स, मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्यांच्या बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला असतानाच मणिशंकर अय्यर परतले. त्यामुळे पित्रोदांचा बाजार उठला, इथपासून ते पित्रोदा म्हणजेच अय्यर आणि अय्यर म्हणजेच पित्रोदा, असेही म्हटले गेले.

 

दुसरीकडे मणिशंकर अय्यर यांनी स्वतः याआधीही आपली मोदी, भाजप व संघद्वेषी गरळ वेळोवेळी बाहेर काढली. २०१३ साली जोकर, साप, विंचू असे म्हणाले होते. २०१५ साली तर मणिशंकर अय्यर यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींना हटवणे गरजेचे असल्याचे म्हटले. २०१७ मध्ये बंदूक हाती घेणारे काश्मिरी युवक चुकीचे नसून भाजपचे लोकच त्यांना असे करण्यासाठी मजबूर करत असल्याचे म्हटले. अशा प्रत्येक विधानातून मणिशंकर अय्यर यांनी आपले फुटकेपण अधिकच ठळकपणे जगासमोर आणले. संपुआ सरकारच्या काळात अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती उखडून फेकण्याचे संतापजनक कृत्य याच अय्यरांनी केले होते. देशातील बहुसंख्यांना मान्य असलेल्या विचारसरणीचा आतापर्यंत द्वेष केला, त्यांना संपविण्याच्या उचापत्या केल्या, तरी ही विचारसरणी कशी वाढते? हा प्रश्न काँग्रेसमधल्या अय्यरी शहाण्यांना पडत असतो. राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी आणि विकासाभिमुख विचारांना रोखण्याचे कोणतेही उपाय नसल्याने मग ही मंडळी ताळतंत्र सोडून जीभ चालवत सुटतात. पण यातून त्यांचाच घात होणार, हे नक्की. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज प्रत्येक ठिकाणी, आम्ही प्रेमाचे राजकारण करतो, असे म्हणताना दिसतात, जे अजिबात सत्य नाही. कारण, मणिशंकर अय्यर यांच्या विधानांवरून काँग्रेसचे प्रेमाचे राजकारण एखाद्याला 'नीच आदमी' म्हणून हिणवणारे असल्याचेच स्पष्ट होते आणि अशा लोकांना धडा शिकवायला भारतीय मतदार तयारच आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@