टिकटॉकची व्यर्थ टिकटिक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |





जगभरात टिकटॉकने सर्वांना अक्षरशः वेड लावले आणि खासकरुन तरुणांना. पण, आता अगदी वृद्ध नागरिक व लहान मुलंही या टिकटॉकच्या वेडाला बळी पडताना दिसतात. आधुनिक मनोरंजनाचे साधन म्हणून नेटकर्‍यांमध्ये टिकटॉक प्रसिद्ध आहे. मात्र, हल्ला त्याचा चुकीच्या पद्धतीनेच वापर होताना दिसतो. दररोज लाखो लोक यावर प्रसिद्धी मिळावी म्हणून कुठल्याही थराला जाऊन व्हिडिओ अपलोड करतात. तरुण मुलामुलींचे अनेक गमतीदार तसेच काही अंशी अश्लिल व्हिडिओही यात असतात. सध्या महिला आणि लहान मुलांच्या व्हिडिओंचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यात लहान मुलांकडून जबरदस्तीने अनेक कसरती किंवा काहीतरी विचित्र प्रकार करायला भाग पाडून त्यांचा मनोरंजनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. यामुळे साहजिकच लहान मुलांवरही याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. या टिकटॉकमुळे अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून काहींना याचे भयंकर व्यसनच लागले आहे. या सर्वच दुष्परिणामांमुळे न्यायालयाने टिकटॉकवर बंदीचा निर्णयही घेतला होतो, जो नंतर रद्दही करण्यात आला. या टिकटॉक अॅपचा वापर अनेकवेळा अश्लील व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे समाजात याचा दुरुपयोग वाढला आहे. शिवाय काही वेळा गंभीर गुन्हे करतानाचे व्हिडिओसुद्धा थ्रील म्हणून टाकले जातात. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बंगळुरुमध्ये तर चक्क टिकटॉक व्हिडिओ कसे बनवावेत, याचे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. खरे पाहता, मनोरंजनाचा भाग सोडता याचे दुष्परिणामच जास्त असल्याने यांसारख्या अॅपवर वेळीच आवर घालणे महत्त्वाचे आहे. परंतु, भारतासारखी इतकी मोठी बाजारपेठ सहजासहजी हातातून जाऊ न देता अजून नवीन काही आणण्याचा प्रयत्न या चिनी कंपनीकडून केला जात आहे. एका अहवालानुसार, २०१९च्या पहिल्या तिमाहीत टिकटॉक अॅप १८.८ कोटी युजर्सने डाऊनलोड केले. भारतात आगामी काळात २० ते ४० कोटी नवे युजर्स पहिल्यांदा टिकटॉकचा वापर करणार असल्याचा विश्वासही टिकटॉकला वाटतो. तेव्हा, टिकटॉकवेड्या भारतीयांनो वेळीच सावध व्हा, अन्यथा एकदिवस तुमच्या हृदयाची टिकटिक बंद केल्याशिवाय हे अॅप राहणार नाही, हे कुठे तरी मनाच्या कोपर्‍यात लक्षात असू द्या.

 

इमारतींची सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर

 

गेल्या काही दिवसांपासूनच सरकारी इमारतींवरून उड्या मारून आत्महत्या करणार्‍यांची संख्या वाढताना दिसत असून त्यामुळे या सरकारी इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख हवी. मात्र, संबंधित प्रकार बघता, इथला सगळा भोंगळ कारभारच उघडकीस आला आहे. या महत्त्वाच्या इमारतींमध्ये कोणीही, कधीही येऊन जीव देत असेल, तर मग इथल्या सुरक्षाव्यवस्थेचा काय फायदा? सरकारी कार्यालयांत अनेक महत्त्वाची कामे केली जातात. अनेक महत्त्वाची कागदपत्रे इथे असतात, ज्यांची सुरक्षा ही सरकारचीच जबाबदारी आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरुन तर सरकारी इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेचे कसे तीनतेरा उडाले आहेत, त्याची प्रचिती येते. कालच मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरुन एका जीएसटी अधिक्षकाने उडी मारुन आपले जीवन संपविले, तर दोनएक दिवसांपूर्वी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीवरुन एका तरुणाने आत्महत्या केली. म्हणून असे प्रकार दुर्लक्षित करुन चालणार नाही. कारण, दुर्देवाने या इमारतींमध्ये एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास, त्याला कोण जबाबदार असेल? विमानतळासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी असे प्रकार होत असतील, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. या घटनांवरुन आत्महत्या करणारी व्यक्ती इमारतीत्या आता गेलीच कशी? तिथल्या सुरक्षारक्षकांनी याकडे लक्ष का दिले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून यावरून सुरक्षेचा बाजार उठवल्याचे लक्षात येत आहे. ‘कोणीतरी यावे.. टपली मारून जावे..‘अशी परिस्थिती इथे असून उद्या मोठी दुर्घटना झाल्यास याला कोण जबाबदार असेल? की तेव्हासुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्षच केले जाईल का? याचा वेळीच गांर्भीयाने विचार करून सुरक्षाव्यवस्था अत्यंत काटेकोर करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. राज्यातील जनतेचे प्रश्न जिथे सोडवले जातात, खुद्द त्या मंत्रालयातही विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या, मजल्यांवरुन उडी घेऊन आत्महत्येचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे मंत्रालयासकट इतर सर्व सरकारी कार्यालयांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे असून यासाठी नियमावली अधिक कडक करुन सुरक्षा बंदोबस्तात वाढ केलीच पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@