विश्व संवाद केंद्राचे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |


 


मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा दरवर्षी ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पत्रकारिता आणि अन्य माध्यम क्षेत्रांशी संबंधित सात व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.

 

दै. ‘कृषिवल’चे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने तर दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर आणि दै. ‘लोकसत्ता’चे मुख्य उपसंपादक पंकज भोसले यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल तसेच महिला पत्रकार पुरस्कारासाठी ‘टीव्ही ९’ मराठीच्या संपादक, वृत्तनिवेदिका निखिला म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया या श्रेणीतील पुरस्कारासाठी ‘झी २४ तास’चे वरिष्ठ राजकीय संवाददाता अमित जोशी यांची, तर सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार या पुरस्कारासाठी दै. ‘मुंबई मिरर’चे छायाचित्रकार सचिन हरळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया व ब्लॉगिंग विभागातील पुरस्कारासाठी स्तंभलेखक व ब्लॉगर सोमेश कोलगे यांची निवड करण्यात आली आहे.



 

सन्मानचिन्ह, मानधन, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. देवर्षी नारद जयंती कार्यक्रम आणि पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार व ‘थिंक महाराष्ट्र’ चे संपादक दिनकर गांगल भूषविणार असून प्रमुख अतिथी या नात्याने ‘झी २४ तास’, ‘झी मराठी दिशा’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार, दि. १८ मे रोजी सायं. ६:०० वा. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बोर्डरूममध्ये संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पत्रलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या पत्रलेखकांच्या पत्रांचा अंतर्भाव असलेल्या ‘पत्रसामर्थ्य’ विशेषांक २०१९चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘देवर्षी नारद पुरस्कार’ समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, दिलीप चावरे आणि किरण शेलार यांच्या निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@