फडणवीस समर्थ आहेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |




जिथून आगामी निवडणुकांत फायदा होईल, त्याच ठिकाणी-पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडक गावखेड्यांत पवार जाताना दिसतात. अशावेळी पवारांना राष्ट्रीयच नव्हे, तर ‘राज्य पातळीवरचे नेतृत्व’ म्हणणेही कितपत योग्य, असे विचारावेसे वाटते. म्हणूनच शरद पवारांनी आता राज्याचा विचार करणे सोडून द्यावे, कारण राज्य चालवायला, दुष्काळ निवारण करण्यासाठी फडणवीस समर्थ आहेत.

 

घडाळ्याचे बटण दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले’ सारख्या ‘चिप’ वाक्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवारांना समाजमाध्यमांत वावरणार्‍या प्रत्येकानेच ‘ट्रोल’ होताना पाहिले. राजकारणात हयात खर्ची घालणार्‍या पवारांवर कालपरवाच्या पोरासोरांनीही मनसोक्त टीका-टिप्पणी करत चार शब्द सुनावण्याचा आनंद घेतला. वस्तुतः शरद पवारांसारख्या अनुभवी आणि जुन्याजाणत्या नेत्याची खिल्ली उडवणार्‍या व समाजमाध्यमांत दिवसरात्र फिरणार्‍या विनोदांना पवारांच्या कारकिर्दीची शोकांतिकाच म्हटली पाहिजे. परंतु, पवारांची ही अवस्था अन्य कोणी केली नसून यासाठी ते स्वतः, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आतापर्यंतचे कारनामेच कारणीभूत असल्याचे दिसते. दुसरीकडे इव्हीएमसंदर्भातील वक्तव्यातून जनमानसात गोंधळ माजवल्यानंतर शरद पवार आपल्या मूळ कामाला लागले. ते म्हणजेच विद्यमान राज्य सरकारविरोधात असंतोष भडकावणे! गेल्या साडेचार वर्षांत पवारांनी निरनिराळ्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्याचा, जनतेला सरकारविरोधात उकसविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

कधी जातीच्या मुद्द्यावरून
, कधी पगडीच्या मुद्द्यावरून तर कधी छत्रपती-पेशवे या मुद्द्यावरून. आताही राज्याच्या काही भागांत दुष्काळाच्या आगीत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, जनावरे होरपळत असताना शरद पवारांनी दुष्काळ दौर्‍याची टूम काढली. खरे म्हणजे, शरद पवार आज कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत, त्यामुळे पवारांच्या दौर्‍यातून दुष्काळग्रस्तांच्या हाती काहीही लागण्याची शक्यता नाही. मात्र, दुष्काळाच्या नावाखाली केलेल्या फिरस्तीतून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतांची बेगमी करता येईल, हे पवारांना चांगलेच कळते. अशाच एका दुष्काळदौर्‍यावर असताना शरद पवार म्हणाले की, “राज्यकर्त्यांनी फोनवरून बोलण्यापेक्षा, माहिती घेण्यापेक्षा दुष्काळग्रस्त ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी द्याव्यात.” शरद पवारांच्या या विधानाचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीकडे होता.

मुळात फडणवीसांनी राज्यातल्या दुष्काळग्रस्तांचा उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून गेल्या काही दिवसांत अनेकानेक निर्णय घेतले, हे पवारांना माहिती नसावे. निवडणूक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी करण्यापासून ते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणे, चारा छावण्यांना मंजुरी देणे, जिल्हा प्रशासनाला दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देणे, गावोगावच्या सरपंचांशी ‘मोबाईल ब्रिज’च्या साह्याने संवाद साधत दिलासा देणे, आदींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेलासंकटाच्या या परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा’ विश्वास दिला. अर्थात ही कामे करण्यासाठी निर्णय घेण्याची धमक असावी लागते आणि ती देवेंद्र फडणवीसांमध्ये असल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. म्हणूनच आज राज्य सरकारने कित्येक ठिकाणच्या दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचेही दिसते. पवारांना मात्र मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी झळा सोसणार्‍या प्रत्येक ठिकाणाला भेट द्यावी, असे वाटते.


इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची काम करण्याची शैली पारंपरिकतेपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने एकाचवेळी शेकडो ठिकाणांशी संपर्क करणारी आहे. सोबतच दुष्काळदौरा म्हटला की, ते जिथे जिथे भेटी देतील तिथले पालकमंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणे आणि प्रशासकीय यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या साह्याला हजर राहणे, दौर्‍यावर पैसा खर्च होणे, हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी पाण्याचा वापर करणे, हे आलेच. परिणामी, अशा दौर्‍यांमुळे दुष्काळ निवारणाच्या कामांत अडथळे-विलंब होण्याची शक्यताच अधिक. हे टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्येकच दुष्काळग्रस्त भागाला भेट देण्याऐवजी थेट निवारणाचे उपाय योजण्यालाच प्राधान्य दिले असावे. शिवाय केवळ ‘दौरा, दौरा’ म्हणून तामझाम करण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत सरळ कामाला लागणेच गरजेचे, हे ओळखून फडणवीसांनी दुष्काळी गाव-पाड्यांना भेट दिली नसावी, असे वाटते. स्वतःला ‘पुरोगामी’, ‘तंत्रज्ञानस्नेही’, ‘आधुनिक विचारांचे’ वगैरे म्हणवून घेणार्‍या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची ही भूमिका नक्कीच समजून घेतली पाहिजे. परंतु, शरद पवार हे समजून घेतील असे वाटत नाही, कारण त्यातून त्यांना आपले राजकारण करता येणार नाही! फडणवीस दुष्काळ दौर्‍यावर आल्यास कार्यकर्त्यांकरवी काळे झेंडे दाखविण्याचा, आंदोलन करण्याचा व लोकांचे सरकारविरोधी मत बनविण्याचा बेतही पवारांनी केलेला असावा, जो मुख्यमंत्र्यांनी दुष्काळदौरा न केल्याने धुळीस मिळाल्याचे दिसते. म्हणूनच राज्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी देण्याच्या विधानानंतर शरद पवारांनी दिलेली ‘सरकारचा बंदोबस्त करू,’ छाप प्रतिक्रिया सरकारविरोधी डाव पूर्णत्वास न देण्यातल्या चडफडीतून आल्याचेच द्योतक म्हटले पाहिजे.

शरद पवारांच्या आजच्या दुष्काळदौर्‍याच्या आणि राज्य सरकारवर टीका करण्याच्या वर्तनातून काही प्रश्नही निर्माण होतात. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शरद पवार केंद्रीय कृषिमंत्रीपदी वर्षानुवर्षे राहिले; तसेच राज्य सरकारातही जलसिंचन खाते राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडेच ठेवले होते. आपल्या या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सत्ताकाळात शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांसाठी, दुष्काळमुक्तीसाठी कोणते दीर्घकालीन उपाय योजले वा प्रकल्प उभारले? उलट आज दुष्काळी दौरा करणार्‍या शरद पवारांना तेव्हा महाराष्ट्रात फिरणे हे कमीपणाचे वाटत असे, कारण ते स्वतःला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व मानत होते! म्हणूनच आपल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळातच पवारांनी बीसीसीआय, आयसीसीसारख्या संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आणि आयपीएललाही पाणी पुरवले. राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन खात्याचेच सिंचन करत स्वतःचेच भले करून घेतले. विविध सिंचन प्रकल्पांवर ७२ हजार कोटींचा खर्च करूनही केवळ ०.०१ टक्के इतके सिंचन क्षेत्र वाढविण्याचे जगातले आठवे आश्चर्य राष्ट्रवादी काँग्रेसनेच करून दाखवले. प्रकल्पांच्या किमती वाढवण्यातून, मर्जीतल्या लोकांना कंत्राटे देऊन, प्रशासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून राज्यातली ही सिंचनगंगा राष्ट्रवादीवाल्यांनी आपापल्या शेतातच मुरवली. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे बडे बडे नेते यात गुंतले असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाले. अजित पवारांनी तर पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांना आपल्याकडे निराळेच धरणभरण कौशल्य असल्याचेही सांगितले. आज अशा लोकांचे नेतृत्त्व करणारे शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दुष्काळ, पाणीटंचाई व शेतकरी-चारा प्रश्नावरून टीका करतात, यावरून पवारांचा नाकर्तेपणाही दिसतोच. आपल्या काळात पवारांसारख्या ‘द्रष्ट्या’ माणसाने या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या नाहीत?, हा प्रश्नही त्यामुळे उपस्थित होतो.

उल्लेखनीय म्हणजे, पवारांना संपूर्ण राज्यातल्या दुष्काळग्रस्तांची फार चिंता, काळजी वाटते, असेही नाही. शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांतल्या दौर्‍याकडे लक्षपूर्वक पाहिले की, एक गोष्ट स्पष्ट होते-ते केवळ आपला जनाधार असलेल्या भागातच फिरत आहेत. बीड असो वा सातार्‍यातील तालुके असो, पवारांनी याव्यतिरिक्त विदर्भात-यवतमाळ, चंद्रपूर वगैरे ठिकाणांना भेटी दिल्याचे दिसले नाही. कारण, पवारांना माहिती आहे, या भागांना भेटी देण्याने आपल्याला काहीही राजकीय लाभ होणार नाही. म्हणूनच जिथून आगामी निवडणुकांत फायदा होईल, त्याच ठिकाणी-पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडक गावखेड्यांत पवार जाताना दिसतात. अशावेळी पवारांना राष्ट्रीयच नव्हे, तर ‘राज्य पातळीवरचे नेतृत्व’ म्हणणेही कितपत योग्य, असे विचारावेसे वाटते. म्हणूनच शरद पवारांनी आता राज्याचा विचार करणे सोडून द्यावे, कारण राज्य चालवायला, दुष्काळ निवारण करण्यासाठी फडणवीस समर्थ आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@