पाकिस्तान आला ताळ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2019
Total Views |


 


लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा भारतात सत्तेवर येतील, हे दिसतेच आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले आणि पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर ते त्या देशाला फार मोठ्या संकटाच्या खाईत लोटेल, हे सत्यच! पाकिस्तानने आता भारतासमोर ठेवलेल्या चर्चेच्या प्रस्तावामागे हेही एक कारण आहे.


जागतिक नाणेनिधीपुढे हात पसरून, कटोरा घेऊन आर्थिक मदतीची याचना करणाऱ्या पाकिस्तानला अजूनही कर्ज मिळालेले नाही; कर्ज मिळेल की नाही, याची कुठलीही शाश्वती नाही. सोबतच कंगालीच्या भीषण झळा भोगणाऱ्या पाकिस्तानात दूध, कांदा, टोमॅटो आदी जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जनतेला आताच्या बिकट परिस्थितीत धीर धरण्याचे आवाहन तर केले आहेच, परंतु, तिथली जनता ते कितपत ऐकेल याची कोणतीही खात्री नाही. कारण क्रिकेटमध्ये भारताकडून पराभूत झाल्यास टीव्ही फोडून राग व्यक्त करणाऱ्या पाकिस्तान्यांचा खायला महाग झाल्यावरूनही राग उफाळून येऊ शकतो. अशाप्रकारे चहूबाजूंनी रसातळाला जाणाऱ्या, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला गेल्या दोन दिवसांत मात्र शहाणपण सुचल्याचे दिसते. नियंत्रण रेषेवरील तणाव संपवून पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेला चर्चेचा प्रस्ताव तो देश ताळ्यावर आल्याचेच निदर्शक आहे. पण हे कसे घडले? पाकिस्तानच्या या गुडघे टेकण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा अधिक भारतीय सैनिकांचा जीव गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली तर देशातल्याच पाकधार्जिण्यांनी इमरान खान यांना एक संधी द्या, अशीही मागणी केली. परंतु, आपल्या शूर सैनिकांच्या हौतात्म्याचा बदला घेण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधानांनी सैन्यदलांना प्रत्युत्तरासाठी खुली सूट दिली. परिणामी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला व जिहाद्यांना थेट घरात घुसून मारले. तद्नंतर तंतरलेल्या पाकिस्तानला नेमके काय करावे हेही समजेना, म्हणूनच कधी भारताने हल्ला केल्याचे तर कधी हल्ला केलाच नसल्याचे सीमेपलीकडून सांगितले गेले. भारतातही हवाई दलाच्या शौर्यावर, कामगिरीवर संशय घेण्याचा करंटेपणा विरोधकांनी केलाच. पुढे मात्र भारताने एअर स्ट्राईक करून थांबण्याऐवजी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठीही प्रयत्न चालवले. चीनच्या पाठिंब्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून बचावलेल्या मसूदला भारतासह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशियानेही घेरले. परिणामी चीनने आपला विरोध बाजूला ठेवून मसूद अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करतेवेळी कोणतीही आडकाठी आणली नाही. एअर स्ट्राईक करण्यातून भारताचा सैन्य कारवाईत तर मसूद अझहर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित होण्यातून भारताचा मुत्सद्देगिरीत विजय झाला, ही गोष्ट इथे महत्त्वाची. अर्थात या सर्वात भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा सिंहाचा वाटा आहे.

 

पंतप्रधानपदी आल्यापासून नरेंद्र मोदींनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पाच वर्षांपूर्वी आपल्या शपथविधीला पाकिस्तानसह सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावण्यापासून ते वाट वाकडी करून पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्यापर्यंत मोदींनी स्वतहून पुढाकार घेतला. मोदींच्या या दोन कृतींमुळे भारत शांततेसाठी आग्रही असल्याचा संदेश सर्व जगात गेला तर त्यानंतरच्या दहशतवादी हल्ल्यांतून पाकिस्तानलाच शांतता नको, हे सर्वमान्य झाले. सोबतच भारताने इस्रायल व पॅलेस्टाईनसह आखाती देशांशीही उत्तम संबंध प्रस्थापित केले. पाकिस्तानला दरवेळी मदत करणाऱ्या सौदी अरेबियाशीही भारताचे सूत जुळले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत सौदीचे राजपुत्र पाकिस्तान दौऱ्यावर होते. पाकिस्ताननंतर ते भारतात येणार होते परंतु, दोन्ही देशांतील तणाव पाहता मोहम्मद बिन सलमान थेट पाकिस्तानातून भारतात न येता मायदेशी जाऊन नंतर भारतात आले. पुढे ५६ इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनच्या परिषदेत भारताला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. पाकिस्तानने भारताच्या उपस्थितीमुळे परिषदेवर बहिष्कार टाकण्याचे ठरवूनही इस्लामिक देशांनी त्याकडे लक्ष दिले नाही. रुढीवादी असलेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेत एका स्त्रीने म्हणजेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अन्य मुद्द्यांसह भारताची दहशतवादविषयक भूमिका मोठ्या ताकदीने विशद केली. इथूनच इस्लामिक देशांनीही पाकिस्तानला बाजूला सारल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय राजकारणात केवळ धर्माचा विचार न करता आपल्या गरजांचा, आर्थिक हितसंबंधांचा, व्यापाराचा विचार करूनच इस्लामिक देशांनी पाकिस्तानऐवजी भारताला झुकते माप दिल्याचे इथे दिसते. सोबतच दहशतवाद आणि आर्थिक संबंधांवर नजर ठेवणाऱ्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करावा, म्हणूनही भारताकडून जोर लावला जात आहे. भारताच्या या प्रयत्नांना यश आल्यास आतापर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देशातील गरिबी, आरोग्य वगैरे प्रश्नांच्या आडून पैसा लाटणाऱ्या व तो पैसा दहशतवाद्यांना पुरवणाऱ्या पाकिस्तानपुढे मोठी समस्या निर्माण होईल, पैसा उभा करणे अवघड होईल. चीनलादेखील अशा देशाशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे जिकिरीचे ठरेल. अमेरिकेने तर आधीच पाकिस्तानला मदत देणार नसल्याचे व तो निधी मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी लावणार असल्याचे जाहीर केले आहे. देशांतर्गत पातळीवरही भारताने,“दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे रक्त आणि पाणी एकाचवेळी प्रवाहित होऊ शकणार नाही,” असे म्हटले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्याचाही इशारा दिला. अशाप्रकारे सर्वच बाजूंनी भारताने पाकिस्तानची पुरेपूर नाकेबंदी केल्याचे चित्र जागतिक पटलावर तयार झाल्याचे स्पष्ट होते. परिणामी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवण्याव्यतिरिक्त पाकिस्तानकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा भारतात सत्तेवर येतील, हे दिसतेच आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले आणि पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर ते त्या देशाला फार मोठ्या संकटाच्या खाईत लोटेल, हे सत्यच! पाकिस्तानने आता भारतासमोर ठेवलेल्या चर्चेच्या प्रस्तावामागे हेही एक कारण आहे.

 

एकीकडे पाकिस्तानने भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवलेला असतानाच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले. अपाचे हे जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ हेलिकॉप्टर असून भारत अमेरिकेकडून अशी २२ हेलिकॉप्टर्स खरेदी करत आहे. रॉकेट, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवर हल्ला करण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर सक्षम आहे. अल-कायदाचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात अपाच्या हेलिकॉप्टरनेच महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणूनच ‘लादेन किलर’ नावानेही अपाचेला ओळखले जाते. भारत ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात करणार आहे. अपाचे हेलिकॉप्टरचे भारतीय हवाई दलातील आगमन पाकिस्तानला धडकी भरवणारे असल्याचे त्या देशाच्या बदललेल्या पवित्र्यावरून दिसून येते. परंतु, भारताने केवळ अपाचेच नव्हे तर आणखीही घातक शस्त्रास्त्रे आपल्या सैन्यदलांच्या ताफ्यात सामील करण्याचा धडाका लावला, हे गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळाले. राफेल लढाऊ विमाने, भीष्म रणगाडे, एस-४०० ही विमानभेदी क्षेपणास्त्र प्रणाली, कामोव्ह-३१ हेलिकॉप्टर, आयएनएस वेला यांसह अनेकानेक हत्यारे भारताने खरेदी केली वा खरेदी करार केले वा देशांतर्गत निर्मिती केली. या सगळ्यातूनच दक्षिण आशियात भारताची एक सामर्थ्यवान देश म्हणून ओळख अधोरेखित केली गेली. चीनच्या वेगवेगळ्या कारवाया आणि पाकिस्तानला पंखाखाली घेण्याच्या वृत्तीवेळी हे होणे गरजेचे होते. पाकिस्तानने आताचा समोर ठेवलेला चर्चेचा प्रस्ताव भारताच्या वाढत्या सैनिकी बळाच्या अंगानेही पाहायला हवा. शांततेसाठी शस्त्रेच नको म्हणताना पाकिस्तान कुरापती काढत असे, पण आज भारत शस्त्रसंपन्न होत असल्याचे पाहून तो देश सरळ होत असल्याचे दिसते. इथे बलवान देशच शांतता प्रस्थापित करू शकतो, या तत्त्वाचा प्रत्यय येतो, असे म्हणूनच म्हणावेसे वाटते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@