वास्तववादी दर्शन रंगमंचावर मांडणारे लेखक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2019   
Total Views |


 


मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यलेखक वामन तावडे हे मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेले. वामन तावडे यांच्या स्मृतीस वंदून त्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवासावर एक नजर टाकूया...


मराठीमध्ये नाट्यपरंपरा तशी जुनीच. स्वातंत्र्योत्तर काळानंतर मराठी नाट्यक्षेत्राने खरी कात टाकण्यास सुरुवात केली. या काळात अनेक नाटकांनी आपला लहेजा बदलला. एकेकाळी मराठीमध्ये ऐतिहासिक, पौराणिक आणि साचेबंद विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांनी काळ गाजवलेला असताना साधारण १९५०-६०च्या दशकांत अनेक नव्या विषयावर भाष्य करणाऱ्या नाटकांची निर्मिती होऊ लागली. राजांच्या महालाच्या देखाव्यांपेक्षा सामान्य घरातील भिंतींनी नाटकामध्ये जागा घेतली. राजदरबाराची जागा गावातील चावडीने घेतली. राजाच्या शृंगाररसाने भरलेल्या शब्दांची जागा ही सामान्य घराघरात वापरल्या जाणाऱ्या भाषेने घेतली. १९५०च्या दशकानंतर अनेक सामाजिक बांधिलकी जपणारी नाटके लोकांच्या पसंतीस पडू लागली. नाटकांचा प्रयोग समाज परिवर्तनासाठी चांगली संधी घेऊन आला. १९६० ते १९८० या दोन दशकांच्या कालखंडात नाटक आणि रंगभूमीने वेगळे वळण घेतले होते. वेगवेगळ्या नाटककारांच्या नवनवीन नाट्यकृतींनी समाजातील अनेक प्रश्न लोकांसमोर मांडले. अशामध्ये १९७५ नंतर वास्तववादी नाटक लिहिणारी जी पिढी रंगभूमीवर आली त्यातील वामन तावडे हे महत्त्वाचे शिलेदार होते. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर यांच्यानंतर वामन तावडे यांच्या वास्तववादी लिखाणाने नाट्यरसिकांच्या मनात घर केले.

 

वामन तावडे यांचा जन्म २९ ऑक्टोबर, १९५० रोजी चेंबूरमध्ये लेबर कॅम्प येथे झाला. एका सामान्य घरात जन्मलेल्या तावडेंचे बालपण हे चेंबूरमध्येच गेले. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये आणि त्यानंतरचे शिक्षण चेंबूर हायस्कूलमध्ये झाले. चेंबूर परिसरात त्यावेळेस अनेक मनोरंजनाचे खेळ जसे की, कोकणातून 'नमन' हे खेळ येत असत. त्याची ओढ त्यांना लहानपणापासून होती. हीच अभिरुची त्यांना रंगमंचाकडे घेऊन गेली. हायस्कूलमध्ये असताना तावडेंनी छोट्या-छोट्या एकांकिका, नाटुकल्यांसाठी बॅकस्टेजचा अनुभव घेतला. पु. ल. देशपांडे यांची बहीण मीरा दाभोलकर यांच्या यशोमंदिर या नाट्यसंस्थेसाठी वामन तावडे यांनी बॅकस्टेज केले. येथेच योगायोगाने त्यांच्या नाट्यलेखनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांच्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या 'फकिरा' नाटकाचा प्रभाव होता. त्यासारखेच 'आशीर्वाद' नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्या नाटकाचा मुहूर्तही केला. परंतु, स्वतःच्या नाटकाचे आत्मपरीक्षण करून त्यांनी लिहिलेले नाटक फाडून टाकले. यामध्ये त्यांची चिकित्सक आणि आत्मपरीक्षक वृत्ती त्यांना पुढे खूप उपयोगी पडली. 'स्टॅण्डर्ड अल्कली' या कंपनीमध्ये ते नोकरी करत होते. परंतु, नंतर तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत 'सुतक' नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी 'छिन्न' हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठीघेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला.

 

वामन तावडे यांच्या 'छिन्न' या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली. १९७८ मध्ये नाशिक केंद्रातून हे नाटक पहिले आले. पुढे हे नाटक आयएनटीने करण्याचे ठरवले आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवास चालू झाला. त्याकाळी स्मिता पाटील हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीत गाजत होते. तरीही वेळ देऊन त्यांनी हे नाटक स्वीकारले. या नाटकामध्ये सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, सुशील गोलतकर, आशालता, दिलीप कुलकर्णी यांनी अभिनय केला. पुढे या नाटकाचे १०० प्रयोग झाले, तर गुजरातीमध्ये याचे ५०० प्रयोग झाले. वास्तववादी विषय आणि त्याची मांडणी यामुळे प्रेक्षकांची नस पकडण्यात त्यांना यश मिळाले. पुढे तावडे यांनी कामगारांच्या आयुष्यावर आधारित पहिली एकांकिका लिहिली. 'दी कन्स्ट्रक्शन' या नाटकाने अनेक एकांकिका स्पर्धेत पारितोषिके मिळवली. ही एकांकिका पुढे हिंदी, गुजराती, कानडी भाषांमध्ये सादर झाली. अश्विनी एकबोटे यांनी अभिनय केलेल्या 'चौकोन' या वेगळ्या विषयावरील नाटकाचे लेखनदेखील वामन तावडेंनी केले आहे. या नाटकानेही प्रेक्षक तसेच परीक्षकांची मने जिंकली. पुढे त्यांनी 'मी घोडा हुसेनच्या चित्रातला' आणि 'पीदी' या एकांकिका लिहिल्या. 'रायाची रापी' ही वामन तावडेंनी लिहिलेली एकांकिका त्याकाळी खूप गाजली. या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कारदेखील मिळाला. त्यांनी 'आक्रंदन,' 'इमला,' 'यमुना,' 'अआइ,' 'चौकोन,' 'माऊली,' 'तुम्ही आम्ही,' 'जिप्सी,' 'नादखुळ्या,' 'वंदे मातरम' या एकांकिका लिहिल्या. या सर्व एकांकिकांना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली होती. याशिवाय त्यांनी महेंद्र तेरेदेसाईंबरोबर 'लक्ष्मण झुला' नावाची टेलिफिल्मदेखील केली. वामन तावडे यांनी सातत्याने वेगवेगळे विषय घेऊन त्यातून सामाजिक प्रश्न मांडले. त्यांची नाटके मानवी नातेसंबंधामधील लैंगिकतेचा भाग याभोवतीही गुंफलेली होती. ते गंभीर प्रकृतीचे नाटककार होते. कामगारवर्गामधून पुढे आल्याने त्यांना या वर्गातील प्रश्नांची जाणीव होती. अशा नटवर्याच्या एक्झिटने नाट्यक्षेत्रातील एक मार्गदर्शक हरवला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@