सिद्धू-पाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2019   
Total Views |



माणूस शिकला आणि जगभरात वावरला म्हणून तो सुसंस्कृत होतो असे नाही तर त्याच्यावर संगतीचाही परिणाम होत असतो. म्हणून तर म्हण आहे ना, ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. ढवळ्या पवळ्याचे माहात्म्य फार. जिवाशिवाची बैलजोडी बेगीनं पुढं जाईल की नाही, ही बात नाही, मात्र ढवळ्या पवळ्या एकमेकांचे वांड गुण एकमेकांना देऊन बाकीच्यांना त्रास देतात, हा अनुभव कृषिप्रधान भारतीय समाजाला नवीन नाही. आपल्याकडच्या म्हणींचाच विषय निघाला तर, ‘आधीच मर्कट त्यात, मद्य प्याला’ ही म्हणही फारच संयुक्तिक आहे बरं. ढवळ्या पवळ्या किंवा आधीच मर्कट या म्हणींची आठवण आली कारण, आपले सिद्धू. सिद्धूंनी स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधले आणि मग काँग्रेसने आणि सिद्धूने स्वतःचे त्यागण्यायोग्य जे काही गुण होते, ते आपसात अतिशय प्रेमाने वाटून घेतले. तसेच मर्कटलीला दारू प्यायल्यावर जशा रंगात येतील, तसा काँग्रेसचा इटली फिरंगी रंग चढल्यावर सिद्धूचे जे काही झाले आहे ते काही दिवसांपासून आपण पाहतोच आहोत. कुणीही उठून सिद्धूला ठोसे थप्पड आणि चपलांचा मारा करू लागले आहेत. हे असे का व्हावे? कारण एकच सिद्धूचे स्वकर्तृत्व. एखाद्याला कमी ठरवताना आपली उंची वाढवावी, हेच जगरहाटीचे प्रामाणिक सूत्र. पण सिद्धू स्वतःची वैचारिक कर्तृत्वाची उंची वाढवण्यापेक्षा समोरच्या मोठ्या रेषेशी छेडछाड करत आहे. यातून काय साध्य होणार आहे? बरं, मोदींची निंदा करून, त्यांच्याबाबत असभ्य भाषा वापरून सिद्धूंची प्रतिमा खरंच लोकनायकाची होणार आहे? काँग्रेसच्या हायकमांडना खुश करण्यासाठी उचलली जीभ लावली टाळ्याला वागणारे दिग्विजय, मणिशंकर अय्यर, शशी थरूर गेला बाजार मल्लिकार्जुन खर्गे, सॅम पित्रोदा यांच्या बरोबरीने फार फार तर आता सिद्धूचे नाव घेतले जाते किंवा घेतले जाईल. पण सिद्धू यांना त्याचे सोयरसुतक नसावे. कारण बदनाम हुआ तो क्या, नाम तो हुआ असेच त्यांचे गणित असावे. सूर्यावर थुंकण्याच्या प्रयत्नात स्वतःचे मुखमंडल रंगले तरी बाकीचे बघणारे बोलतातच ना? “काय मूर्ख आहे हा सूर्यावर थुंकतोय.” हेच ते... बघणारे मूर्ख म्हणाले तरी चालतील पण त्या बघ्यांनी बघितले तरी... ते काय थोडेय? हीच ती सिद्धूची मानसिकता. पूर्वी पंजाबी थाटात त्यांना सिद्धूपाजी म्हणायचो आता त्यांना ‘सिद्धू पाजी’ म्हणतात इतकेच...

 

ठोको ताली!

 

ज्याला पाकिस्तानच्या प्रेमाचे भरते येते, ज्याला देशापेक्षाही स्वतःची प्रतिमा जागतिक स्वरावर चमकवायची आहे, तो तोच नतद्रष्ट आहे. त्याचे नाव घ्यायची गरजच नाही. निवडणुकीच्या धकाधकीत इंदौर येथे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी विदूषकांचा कॉमेडी शो आयोजित केला होता. त्यावेळी तो म्हणाला, “मै चौकीदार को रोकने आया हूँ और मोदी को ठोकने आया हूँ. काँग्रेसने इंग्रजांना देशाबाहेर घालवले होते. आता इंदौरवाले काळ्या इंग्रजांपासून देशाला वाचवतील. नरेंद्र मोदी हे नव्या नवरीसारखे आहेत, जी काम कमी करते पण बांगड्यांचा आवाज जास्त करते.” वगैरे वगैरे... मोदींना काळे इंग्रज म्हणणारा हा इसम रंगवर्णभेदवादी आहे. बाहेरच्या कांतीवरून समोरच्या माणसाला कमी लेखणारी कद्रू वृत्ती त्यात आहे. भारतीयांच्या काळ्या वर्णाला नावे ठेवणाऱ्या या इसमाचे मन कलंकित आहे. तसेच नव्या नवरीने काय आजही, रांधा-वाढा-उष्टी-खरकटी काढा, यातच ऊर्जा वाया घालवायची का, आयुष्य काढायचे? तिला आयुष्यात दुसरे काही कामच नाही का? पण या इसमाच्या मते नव्या नवरीने साजशृंगार करून घरकाम करावे. काम करताना बांगड्याही किणकिणू नयेत. वा... स्त्री आणि पुरुषी लिंगभेद जपणारा अजब नमुना म्हणजे हा इसम. नाटकी हास्य करत शेरो शायरीच्या नावाखाली ट ला फ जोडत अचकट विचकट शेरेबाजी करणारा हा इसम. तो क्रिकेट खेळायचा. मध्यंतरी भाजपचा निष्ठावान नेता होता. त्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये विदुषकी आविर्भाव करत करत तो अचानक विदूषकच झाला. पण ही विदुषकी विशुद्ध नाही. या विदुषकी थाटमाटाला राजकीय स्वार्थाची घाण लागलेली आहे. देश, समाज आणि प्रत्यक्ष स्वतःच्या भूतकाळाशी प्रतारणा करत हा विदूषक केवळ मनोरजंन करणारा विदूषक राहिलेला नाही. तर या विदूषकाच्या अंतरंगात काँग्रेसी तात्या विंचूचा आत्मा घुसला असावा, असे तो सध्या थयथयाट करत आहे. ओम फट् स्वाहा म्हणण्याऐवजी हा विदूषक ‘ठोको ताली’ म्हणतो इतकेच. आतापर्यंत या विदूषकाची ओळख बऱ्यापैकी पटली असेलच. पण त्याला विदूषक म्हणणे विदूषकाचाही अपमान आहे. कारण विदूषकाच्या मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष आकस नसतोच. असो. या इसमाच्या काँग्रेसी सर्कसला आपले चंबूगबाळे आवरण्याची वेळ आली आहे. इस बात पर ‘ठोको ताली...’

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@