पंकजा मुंडेंचा दुष्काळी दौरा, रखरखत्या उन्हात केले श्रमदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019
Total Views |




बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा करत आहेत. भर उन्हात बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी रखरखत्या उन्हात तळेगाव येथे श्रमदान केल्यानंतर केज तालुक्यातील हिंगणी (बु) येथे वॉटर कॅप स्पर्धेत श्रमदान करून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जनावरांना चारा पाण्याची कमतरता भासू देणार नाही असे नियोजन करण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगितले.

 

परळी तालुक्यातील धारावती तांडा, रेवली तांडा, गोवर्धन, वाका, सिरसाळा आदी तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच परळी तालुक्यातील चारा छावण्यांना भेटी देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याच्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने टॅकर देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर परळी तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची कामे गतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना केल्या.

 

आज परळी येथील दौऱ्यावेळी त्यांनी एवढा महिना आपल्याला सहन करावा लागणार आहे, परंतु बीड जिल्हयाला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी वाॅटरग्रीड प्रकल्प आणि कृष्णा खो-याचे पाणी मिळण्यासाठी ३२ कोटीची योजना आखली आहे, पुढील सात वर्षात संपूर्ण जिल्हयाचा पाणी प्रश्न सुटेल. असे आश्वासन पंकजा मुंडेंनी दिले. भविष्यात सर्वाधिक विमा घेणारा जिल्हा अशा विशेषणाऐवजी उपाय योजना करून सुजलाम् सुफलाम् जिल्हा असे विशेषण आपल्याला मिळवायचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

कालपासून म्हणजे शुक्रवार १० मे पासून पंकजा मुंडे यांचा हा दुष्काळी दौरा सुरु झाला असून आज त्याची सांगता होणार आहे. गेवराईपासून मुंडे यांचा दौरा सुरु झाला त्यावेळी त्यांनी सकाळी ९ वाजता गेवराई शहरातील चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर मादळमोही, तिंतरवणी, खोकरमोहा, तळेगांव, आहेरवडगांव पाली, मांजरसुंबा, चौसाळा व अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा राडी येथे जाऊन पाणी टंचाईची स्थिती जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तर मुंडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत सरकार शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

 

शाहिद जवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबाची घेतली भेट

 
 
 

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाटोदा येथील शेख तौसिफ शेख आरेफ हे जवान शहीद झाले होते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शेख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी राज्य सरकार तौसिफ कुटुंबियांच्या पाठिशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानही या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. "शेख तौसिफ जिल्हयाचे भूमीपुत्र आहेत, त्यांनी नक्षलवाद्यांशी लढताना आपले प्राण दिले, त्यांच्या आई वडिलांना मी भेटले, सरकार त्यांच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही" असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@