दोन घोट पाण्यासाठी दोन किमीची चढाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019
Total Views |



गांगणवाडी पाणीयोजना संशयाच्या भोवऱ्यात


शहापूर (प्रशांत गडगे) : शहापूर तालुक्यातील पूर्वेकडील शेवटची ग्रामपंचायत असलेल्या सावरोली (सो.) ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील नामपाडा या उंच पठारावरील वनवासी भगिनींचा पाण्यासाठी जीवाशी खेळ सुरू असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. सुमारे दोन किलोमीटरची दरड चढून-उतरून व सहा किलोमीटरची पायपीट करून शाई नदीपात्रात खोदलेल्या डवऱ्यातून पाणी आणण्याची कसरत येथील नागरिकांना करावी लागत आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच संपूर्ण सावरोलीग्रामपंचायतीसाठी मंजूर पाणीयोजनेच्या जलवाहिन्या गांगणवाडीपर्यंत पोहोचल्याच नसल्याने या योजनेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

 

२ हजार, १०२ इतकी लोकसंख्या असलेल्या सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीत सावरोलीसह खरपत - एक, खरपत - दोन, नामपाडा, बेलकडी, हिरव्याचीवाडी, गांगणवाडी या सहा वनवासी पाड्यांचा समावेश आहे. या ग्रुपग्रामपंचायतीसाठी आघाडी सरकारच्या काळात शहापूरचे तत्कालीन आ. म. ना. बरोरा, गोटीराम पवार, गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांच्या निधीतून सुमारे ३५ लाखांची नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. सध्या या योजनेतून खरपत, सावरोली,नामपाडा, बेलकडी येथे पाणीपुरवठा केला जात आहे. नामपाडा येथे एका विहिरीत योजनेचेपाणी सोडले जाते. दर दोन दिवसांनी सोडले जाणारे हे पाणी भरण्यासाठी महिलांची तुडूंब गर्दी होत असल्याने हे पाणी अवघ्या काही तासांतच संपून जाते. तसेच याच्या विहिरीला भूमिगत गळती असल्याने पाण्याचा साठा राहत नाही. त्यामुळे हे पाणी संपल्यावर गावातील महिलांना तीन किमी खाली शाई नदीच्या पात्रात खोदलेल्या डवऱ्यातून पाणी आणावे लागते.

 

विशेष म्हणजे, डोक्यावर दूड घेऊन दोन किलोमीटरची तीव्र चढण चढण्याचे दिव्य या वनवासीनागरिकांना करावे लागत आहे. दिवसातून दोनदा प्रत्येकी सहा किमीची पायपीट करून पाणी आणणाऱ्या महिलांचा पाण्यासाठी जणू जीवाशीच खेळ सुरू आहे. हा त्रास वाचवण्यासाठी काही कुटुंबे एका खाजगी टँकरमधून ७० रुपये पिंप या दराने पाणी विकत घेत असल्याची माहिती राघी शंकर भगत या वनवासी महिलेने दिली. दरम्यान, सावरोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एन. व्ही. वाघमोडे यांच्याशी संपर्क केला असता नामपाड्यासाठी दररोज पाणी सोडले जात असल्याची व कोणी विकतचे पाणी घेत असल्यास ते बांधकामासाठी घेत असावेत, अशी माहिती त्यांनी दिली.

 

नानी नदीच्या काठावर वसलेल्या हिरव्याचीवाडी व गांगणवाडी या पाड्यांच्या पाणीप्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. सध्या गांगणवाडीतील विहीर आटल्याने येथील वनवासी कानडी ग्रामपंचायत क्षेत्रातीलवडाचीवाडी येथून एका संस्थेच्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी भरत असले तरी, स्वच्छतेकरिता लागणाऱ्या पाण्यासाठी दोन किमीवर असलेल्या कुतरकुंड डोहावरच जावे लागत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राम गांगड यांनी दिली. हिरव्याचीवाडी येथील नागरिक याच डोहातून पाणी आणत असून या दोन्ही पाड्यांना टँकर का पुरवला जात नाही, असा सवाल वनवासी बांधव विचारत आहेत. या दोन्ही पाड्यांसाठीही मूळच्या पाणीयोजनेत तरतूद असताना पोटठेकेदाराने योजना अपूर्ण ठेवल्याचा व टाकलेल्या जलवाहिन्याही काढून नेल्याचा आरोप येथील वनवासींनी केला आहे. सदरच्या दोन्ही वाड्यांसाठीही नळयोजना राबवण्याची मागणी वनवासी कार्यकर्ते बळीराम गांगड यांनी केली आहे.

 

"माझी हयात गेली, पण पाण्याचे हाल काही फिटले नाहीत. तरुण पोरी दुडी घेऊन दरड चढतात, माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईने काय करायचे?"

 

- जानकीबाई रा. निरगुडा, स्थानिक महिला-नामपाडा

 

"नामपाड्यासाठी पाणी साठवण्याची योग्य व्यवस्था झाल्यास बायकांना दरड उतरून शाई नदीवर जाण्याची गरज भासणार नाही."

 

- निखिल मोंडूळा, सदस्य-सावरोली ग्रामपंचायत

 

"नामपाडा-कुतरकुंड धरणाचेकाम मार्गी लागल्यास सावरोली, दलित वस्ती, हिरव्याचीवाडी, गांगणवाडी, बेलकडी यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो. सध्या अस्तित्वात असलेली योजना काही बदल केल्यास नामपाडा व खरपतसाठी योग्य आहे."

 

- जितेंद्र दवणे, युवासेना पदाधिकारी-सावरोली

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@