भिकार्यांच्या विश्वात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019   
Total Views |

गाडी फलाटाला लागताच आतली माणसं भराभरा खाली उरतली. निदान तासभर तरी गाडीचा मुक्काम इथनं हलणार नव्हता. वेळ सकाळची. नाश्ता, चहा पटापट आटोपून घ्यावा, अशा बेताने गाडीतील प्रवाशांची गर्दी फलाटावर अवतरली होती. मिळेल त्या दुकानाभोवती माणसं जमली होती. वाफाळलेले पोहे, कढईतल्या तापलेल्या तेलातून नुकतेच तळून काढलेले बटाटेवडे... कुणी मागणी करण्याचीच देर की, दुकानदार भराभरा हात चालवत प्लेटस् तयार करून त्यांच्या पुढ्यात ठेवायचा. तेवढ्या गर्दीतही कुणाकडून किती पैसे घ्यायचेत, याची न चुकणारी गणितं एव्हाना त्याच्या मनात तयार झालेली असायची. ग्राहक तिथनं बाहेर पडायच्या आत बिलाचा आकडा तोंडी सांगून पैसे पेटीत गेलेलेही असायचे.
 
जराशा सवडीत असलेले दोन सहप्रवाशी आपापल्या प्लेटस् हातात धरून थोडेसे बाजूला उभे राहून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले होते, तोच कोवळ्या वयाची दोन पोरं जवळ येऊन उभी राहिली. काळीकुळी. घाणेरडी. केस विसकटलेली. गेल्या कित्येक दिवसांत आंघोळ केलेली नसावी बहुधा. हातातल्या प्लेटस्मधील पदार्थ तोंडात टाकण्यासाठी म्हणून चमच्याच घेत नाही तोच, त्या केविलवाण्या, आशाळभूत नजरांशी सामना झालेला. त्यांना पैसे द्यावेत? छे नकोच! जरा वेगळ्या पद्धतीनं जाऊ या! भूक लागलीय्? काही खाणार? असे विचारून, त्यांना नाश्ता देण्यासाठी म्हणून दुकानदाराला इशारा केला. पहिले तर तो कुत्सितपणे हसला. त्याच्यासाठी हा नेहमीचाच प्रकार असावा बहुधा. आणि यांच्यासारख्या ‘दानशूर’ माणसांना सहज मूर्ख बनविणारी ती भिकारडी पोरंही त्याला चांगलीच ठाऊक असावीत बहुतेक. पण गुमानपणे त्यानं, त्याच वेगानं प्लेटस् तयार केल्या अन् त्या पोरांच्या हातात ठेवल्या. पैसे हमखास मिळणार असल्याची शाश्वती असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. तसंही त्याच्या बाचं काहीच जाणार नव्हतं. उलट, दोन प्लेटस् अनायासेच विकल्या गेल्या होत्या. इकडे, नाश्त्याच्या प्लेटस् या पोरांच्या हाती पडताच, कुठून कुणास ठाऊक, पण पुन्हा काही पोरं सभोवताल येऊन उभी राहिली. तसलीच. त्याच वयाची. अवतारही तसाच काहीसा. त्याच केविलवाण्या नजरा... तेच आशाळभूत चेहरे... त्यांच्यासाठीही नाश्त्याची आर्डर द्यावी म्हणून दुकानदाराकडे वळलं, तर आता त्याच्या चेहर्यावरील मगाचा कुत्सितपणा जाऊन व्यवहारी बाणा झळकत होता.
 
‘‘जाने दो ना साब! रोजका है इनका. एक को खिलाओगे तो दस जमा होंगे. कितनो को खिलाओगे आप?’’ प्रवासी काय, कधीतरी उतरतात या फलाटावर. तो तर गेली कित्येक वर्षं इथेच होता. त्याच्यासाठी सरावाचा भाग झाला होता हा. लोकांच्या हातातल्या पदार्थांकडे टकमक बघणारी, मोठ्या आशेनं त्यांच्यासमोर हात पसरवणारी ही पोरं... कधी हिडिसफिडिस करून दूर हाकलली जाणारी, तर कधी कुणाच्या दयेला पात्र ठरलेली... दुकानदाराला कशाचंच कौतुक नव्हतं. त्या घाणेरड्या पोरांची ब्याद शिव्यांची लाखोली वाहून दूर लोटणार्यांचा राग नाही, की दहा-वीस रुपयांचे खाद्यपदार्थ त्यांच्या पदरात टाकून लाखो रुपयांच्या किमतीचे पुण्य कमावल्याच्या ऐटीत तिथनं बाहेर पडणार्यांचा हेवाही नाही. दोघांचेही वास्तव्य काही क्षणांपुरतेच तिथे असल्याचं आणि शेवटी आपण आणि ही भिकारडी पोरं मात्र इथेच असणार असल्याच्या वास्तवाचं भान तेवढं त्याच्या चेहर्यावर उमटलेलं...
 
माणसं, हिडिसफिडिस करून, शिव्याशाप देऊन त्यांना दूर लोटणारी असोत, की पाच-पन्नास रुपये खर्च करून त्यांच्या जिवावर पुण्य कमावल्याच्या गुर्मीत जगणारी... बहुधा त्या दुकानदाराचे कुत्सितपणे हसणे म्हणजे या गुर्मीला दाखवलेल्या वाकुल्या असाव्यात. कदाचित, त्याच्यालेखी तद्दन फालतूपणा ठरलेल्या भाबडेपणावर उमटलेली ती प्रतिक्रिया असेल. त्या भिकारड्या पोरांनी कथित शहाण्यांना घातलेला गंडा, त्याच्या मनात विजयी भाव जागवत असेल? किंवा अशी नवनव्या चेहर्यांतून डोकावणारी ‘मूर्ख’ माणसं रोजच बघत असल्याने त्याच्या भावनाच मेल्या असतील? कुठून आले असेल हे कोडगेपण? स्वानुभवातून? आज पोटभर खाऊ घातलं तरी ही समस्या अन् ते भिकारी उद्या पुन्हा आ वासून उभे राहणारच असल्याच्या निराशेतून? की आपल्याला याच परिस्थितीचा सामना रोज करायचा आहे, या धगधगत्या वास्तवातून? मग शहाणं कोण? हे झेंगटच नको म्हणून पहिल्याच टप्प्यात ते दूर लोटणारी अन् त्यांच्या कसल्याच वागण्याचा स्वत:वर परिणाम होऊ न देता मोजलेल्या पैशातून स्वत: नाश्ता करून निर्विकारपणे तिथनं ज्यांना सहजपणे बाहेर पडता आलं, ती माणसं? की असं कुणाला बघितलं की, सहज मनात परोपकराची भावना जागलेली निरागस माणसं? की, मनाच्या कुठल्याशा कप्प्यात साठलेल्या पाप-पुण्याच्या कल्पनेतून पदरचे पाच-पन्नास रुपये खर्च करून पुण्य कमवायला निघालेली माणसं? की, या सर्वांच्या सोबतीने राहूनही सगळ्यांकडे तटस्थपणे बघण्याचा व्यवहारी बाणा कमावून तरबेज झालेला तो दुकानदार?
 
तो, या गोरगरिबांच्या समस्या अशा दहा-वीस रुपयांनी तोलणार्यांना कुत्सितपणे हसतो याचा अर्थ, त्यांच्यावर फुकटची दादागिरी करणार्यांबाबत त्याच्या मनात फार आदर असतो असे नाही. त्यांचे असे फटकून वागणेही त्याला तितकेच सलते. पण, तो स्वत:च परिस्थितीपुढे इतका हतबल असतो की, कुणाकडेतरी दुर्लक्ष करणे वा कुणाचे वागणे हसण्यावारी नेणे, यापलीकडे काही करणे त्याच्याही हातात नसते. शिवाय ही पोरं आयुष्यभर ‘अशीच’ जगणार असल्याच्या निराशाजनक निष्कर्षाप्रतही तो आलेला असतो एव्हाना. या लेकरांना पुढे करून स्वत:ची पोटं भरणारे मायबापही त्याला ठाऊक असतात अन् आपल्या ठेल्याभोवती जमलेल्या ग्राहकांपुढे स्वत:च्या लाचारीचे प्रदर्शन मांडून त्यांच्या खिशातून चार पैसे उकळण्याची किमया अनुभवातून साध्य केलेली ही पोरं भविष्यात कधीतरी स्वाभिमानानं जीवन जगतील, जगू शकतील, निदान त्या दिशेनं प्रयत्न करतील, ही आशाही त्यानं सोडून दिलेली असते केव्हाच. एरवी यातल्या चार-दोन जिवांना दिवसभरात दोन घास खाऊ घालण्याची इच्छा त्याच्या मनात कधी डोकावतच नाही, असे नाही. त्याची तशी दानतही नक्कीच असते. पण, मुळातच ही समस्या आपले आकलन आणि आवाक्याबाहेरची असल्याच्या विश्वासावर तो ठाम असतो. शिवाय, त्याच्यासाठी रोजचाच तमाशा असतो हा. म्हणूनच की काय, पण ती समस्या सोडवण्यासाठीची दोन पावलंही तो पुढे टाकत नाही. अन्यथा कुणाचेही हृदय द्रवेल असा तो अवतार, मदतीसाठी साद घालणारी ती आर्जवी नजर, हृदय पिळवटून टाकणारी ती दैनावस्था... याही स्थितीत तटस्थपणे वागू शकणारा तो दुकानदार. त्याचे वागणे केवळ त्याच्या व्यापारी वृत्तीत तोलता येईल?
 
खरंतर या एकाच दृश्याकडे खूप वेगवेगळ्या तर्हेनं बघणारे लोक आहेत समाजात. स्वत:च्या पद्धतीने त्याचे आकलन करणारी माणसंही शेकड्यानं आहेत. नेहमीचीच असल्याने कुणाला त्या समस्येच्या वाटेनेच जायचे नसते, तर कुणाला याही परिस्थितीत पुण्य कमावण्याच्या वेडाने झपाटलेले. कुणी माणुसकीच्या भावनेने ओतप्रोत भरले म्हणून मदतीसाठी सरसावलेले. मदत करून निघून गेलेले... समस्या मात्र जागच्या जागीच. कुणीतरी ‘अशा’ मुलांसाठी प्लॅटफॉर्मवरची शाळा चालवीत असल्याची बातमी कौतुकाचा विषय ठरते या समाजासाठी. बाकी, त्यांचे विश्व त्यांचेच असते. जगण्याची विवंचना पाचवीला पुजलेली. चेहर्यावरच्या लाचारीचा भाव घरातल्या अठरा विश्वे दारिद्र्यातून उमटलेला असतो. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी कमाईचा हा एकमेव, सोपा मार्ग नजरेसमोर असतो. लोक भावनेच्या भरात वाहून जातात, हे अनुभवाने ठाऊक झाले असल्याने, त्याच भावनांचा बाजार मांडण्याचा प्रयत्न होतो. आपल्या जिवावर पुण्य कमावण्याची संधी बहाल करायला मग हीच लेकरं विचित्र अवतार लेवून सरसावतात. आपले रूप जेवढे ओंगळवाणे तेवढी कमाई जास्त, हे त्यांनी जाणलेले असते. लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठीच कोवळ्या वयाचं रडकं मूल कुणाच्यातरी कडेवर येते. कारण, त्यामुळे खिशात पडणारा भिकेचा आकडा वाढणार असतो. खरंतर हाही सरळ सरळ भावनांचा व्यापारच असतो. ‘त्या’ दुकानदाराला हे सारं ठाऊक असते म्हणून तो कशालाच बधत नाही, एवढंच. लोकांनी चोखाळलेल्या मार्गानेही ही समस्या निकाली निघणार नसल्याचीही खात्री असतेच मनात त्याच्या...
@@AUTHORINFO_V1@@