समाज परिवर्तनाची चिंता कोणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019   
Total Views |



हे जे गढूळ वातावरण झालेले आहे, ते स्वच्छ कसे होणार आणि केव्हा होणार? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. राजकारण मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे हे खरे. राजसत्तादेखील अतिशय महत्त्वाची असते, हेदेखील खरे. तेवढेच हेदेखील खरे की, राजकारण समाजाची विभागणी करते. समाजात कलह निर्माण करते. समाजात ईर्ष्या, द्वेष, भांडणे निर्माण करते. राजसत्ता उपभोगण्यासाठी चांगली असते. परंतु, राजसत्तेचा गुणधर्म ‘अरेरावी,’ ‘दादागिरी,’ ‘मी म्हणतो तेच खरे,’ हा असतो. ‘नम्र राजसत्ता’ ही फक्त राज्यशास्त्राच्या पुस्तकातच असते. लोकशाही राजवटीदेखील नम्र असतात, असे म्हणणे विनोद ठरेल.


लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातील सर्वच राजकीय नेत्यांच्या भाषणांमुळे सामाजिक वातावरण अतिशय कलुषित झालेले आहे. एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धा सर्वांमध्ये लागलेली आहे. पक्षीय भूमिका घेऊन विचार केला, तर आपल्याच नेत्याचे म्हणणे खरे आहे आणि तो जे काही बोलतो, ते सत्य आहे, अशी भूमिका घेतली जाते. सगळे विरोधक खोटारडे आहेत, असे एकमेकांचे विरोधक एकमेकांवर आरोप करतात. खरे कोणते आणि खोटे कोणते, याचा निर्णय कसा करायचा? यावरून इसापची एक कथा आठवली. एक माणूस वाळवंटात काही तरी शोधत होता. एका वाटसरूने त्याला विचारले,“तू कोण आहेस?” तो माणूस म्हणतो, “माझे नाव सत्य आहे.” तो माणूस म्हणतो, “मग तुम्ही शहर सोडून या वाळवंटात का आलात?” तो माणूस म्हणतो, “आता काळ बदलला आहे, पूर्वी काहीच लोक खोट बोलत असत. पण, आता सगळीच लोक खोटं बोलण्यात पटाईत झाली आहेत. म्हणून शहर सोडून इथे आलो.” त्या माणसाप्रमाणे आपण वाळवंटात जाऊ शकत नाही, आपल्याला आपल्या घरीच राहावे लागते आणि प्रचाराची रणधुमाळी पाहावी लागते. हे जे गढूळ वातावरण झालेले आहे, ते स्वच्छ कसे होणार आणि केव्हा होणार? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. राजकारण मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे हे खरे. राजसत्तादेखील अतिशय महत्त्वाची असते, हेदेखील खरे. तेवढेच हेदेखील खरे की, राजकारण समाजाची विभागणी करते. समाजात कलह निर्माण करते. समाजात ईर्ष्या, द्वेष, भांडणे निर्माण करते. राजसत्ता उपभोगण्यासाठी चांगली असते. परंतु, राजसत्तेचा गुणधर्म ‘अरेरावी,’ ‘दादागिरी,’ ‘मी म्हणतो तेच खरे,’ हा असतो. ‘नम्र राजसत्ता’ ही फक्त राज्यशास्त्राच्या पुस्तकातच असते. लोकशाही राजवटीदेखील नम्र असतात, असे म्हणणे विनोद ठरेल. म्हणून राजकारणात रस घेत असताना एक शाश्वत सत्य आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, राजकारण हे समाजजीवनाचे एकमेव अंग होऊ शकत नाही. समाजजीवन अनेक अंगी असते. सांस्कृतिक, कलात्मक, धार्मिक, संगीत, नाटक, चित्रपट, अशा विविध अंगाने समाजजीवन चालू असते.

 

आपल्या देशाची परंपरा अशी आहे की, आपण इतिहास काळात कधीही राजकारणी नव्हतो, सत्ताकारणी नव्हतो, म्हणजे आपले समाजजीवन सत्ताकेंद्रित किंवा राजकारणकेंद्रित कधीच नव्हते. राजे येत, राज्य करीत, राजघराणी उभी राहत आणि लयाला जात. गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला, तर या काळात किती हजार राजे झाले असतील आणि किती‘शे’ राजघराणी झाली असतील, याची मोजदाद करता येत नाही. एवढ्या वर्षांतील काही मोजके राजे सोडले, तर कोणाचे नावही आपल्याला माहीत नसते. या राजघराण्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव अतिशय अल्प असतो. अशा अर्थाने आपण राजकारणी नाही. अमेरिका आणि युरोपातील देश यांचा इतिहास आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हे सर्व समाज शासनावलंबी समाज आहेत, शासनकेंद्रित समाज आहेत. इंग्लड आणि फ्रान्सच्या राजघराण्याचा इतिहास १२००-१५०० वर्षे मागे जातो. या राजघराण्यात किती राजे झाले, त्याचा इतिहास जतन केलेला असतो. आपण राजे-महाराजांना फार किंमत देत नाही, पण सर्वसंग परित्याग करणाऱ्या, भगवी वस्त्रे घालणाऱ्या साधू-संतांना, श्रमण, भिख्खू यांना आपण भजतो, नमन करतो. त्यांच्या प्रतिमा घरी ठेवतो, त्यांच्या ग्रंथांचे पारायण करतो, त्यांच्या स्मृतिस्थळांना श्रद्धेने भेट देण्यासाठी जातो. पर्यटन करण्यासाठी जात नाही. त्यांचे स्थान असे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असते. समाजामध्ये सद्गुणांची वाढ आणि दुर्गणांना प्रतिबंध हीच एका अर्थाने, सत्ताहीन, धनहीन माणसे करीत असतात आणि आपल्या देशाचे वैशिष्ट्य असे की, अशी थोर मंडळी प्रत्येक शतकात देशातील प्रत्येक राज्यात जन्म घेतात. त्या-त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे ते धर्माचा अर्थ समाजाला सांगतात, स्वत: त्याप्रमाणे जगतात. यामुळे समाजात भांडण-तंटे आणि खून-खराबा याला खूप मर्यादा पडतात.

 

निवडणुकांचे निकाल ठरल्याप्रमाणे लागतील. जो विजयी होईल, तो सत्तेवर येईल आणि साधारणत: पाच वर्षे तो सत्तेवर राहील. राजसत्तेच्या माध्यमातून जे काही करता येण्यासारखे असते तो ते करील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणीही कितीही बहुमताने निवडून आला तरीही तो समाजामध्ये नैतिक परिवर्तन करू शकत नाही. समाजाला सद्गुणांच्या आधारे संघटित करण्याचे काम तो करू शकत नाही. समाजात मूल्यांची प्रतिष्ठापना तो करू शकत नाही. याचे कारण असे की, आपला समाज यासाठी राजकीय सत्तेवर बसलेल्या नेत्यांना कधीही आदर्श मानीत नाही. सत्ता परिवर्तन झाले किंवा सत्ता टिकवून ठेवली की, समाज परिवर्तन होणार, असे मानणे हा एक भ्रम आहे. भौतिक साधनांची उपलब्धता सत्ता करून देते. रेल्वे, मेट्रो, रस्ते, आरोग्य सेवा, रोजगार इ. सगळे विषय भौतिक असतात. भौतिक साधनांची रेलचेल झाली की, रोजचे जीवन सुखकर होते खरे, पण ते भौतिक अंगाने होते. समाज परिवर्तनाचा विचार हा भौतिकतेच्या पलीकडे जाणारा विचार आहे. जातीश्रेष्ठतेचा अहंकार बाळगणे, हा सामाजिक रोग आहे. दुसरा सामाजिक रोग हा अस्पृश्यतेचे पालन करणे आहे. तिसरा सामाजिक रोग हा स्त्रीजातीवर अन्याय करण्याचा आहे. चौथा सामाजिक रोग हा पर्यावरणाचा नाश करण्याचा आहे आणि हे सर्व रोग समाजाच्या मानसिकतेशी संबंधित आहेत, समाजाच्या मनपरिवर्तनाशी संबंधित आहेत. जगातील कोणतीही आणि कितीही प्रबळ सत्ता कसलेही मनपरिवर्तन करू शकत नाही. सत्तेकडे दंड करण्याची शक्ती असते, शासन करण्याची शक्ती असते. दंडाचे किंवा शासनाचे भय उत्पन्न करता येते. या भयामुळे प्रवृत्ती दबून राहतात, कोंडून राहतात आणि त्यांना वाट मिळाली की त्या प्रचंड शक्तीनिशी बाहेर येतात.

 

निवडणुकांच्या प्रचारामध्येआम्ही किती चांगले आणि तुम्ही किती वाईट’ यावरच फक्त बोलले जाते. निवडणूक झाल्यानंतर सत्तेवर जे गेले, ते म्हणू लागतात की, ‘आम्ही किती चांगले काम करीत आहोत’ आणि सत्तेच्या बाहेरील लोक म्हणू लागतात की, ‘तुम्ही किती वाईट काम करीत आहात.’ सत्तेवर असलेले आणि सत्तेबाहेर असलेले कोणीही समाजाच्या मूल्यपरिवर्तनाचा विषय बोलत नाहीत. मूल्यांची ताकद अफाट असते. समाज किंवा देश सैन्यबळाने, वायुदलाने, नौदलाने, रणगाड्यांनी, आर्थिक भरभराटीने महान होत नाही. आपल्याला महान व्हायचे आहे आणि त्यासाठी समाजामध्ये सद्गुणांची वृद्धी कशी होईल, याचाच विचार केला पाहिजे. एक नीतिमान माणूस किती अफाट काम करू शकतो, याची जगाच्या इतिहासात खूप उदाहरणे आहेत. महात्मा गांधीचे उदाहरण आहे, नेल्सन मंडेलाचे उदाहरण आहे तसेच, अब्राहम लिंकनचे उदाहरण आहे.अब्राहम लिंकन हे आर्थिक बाजूने गरीब होते, जेमतेम दोन वर्षे ते शाळेत गेले. परमेश्वराने त्यांना अतिशय कुरूप रूप दिले. पण, या सर्वांवर मात करणारे जबरदस्त चारित्र्यबळ दिले. तीच त्यांची सुंदरता ठरली आणि तीच त्यांची शक्ती झाली. अमेरिका दुंभगण्याच्या काळात हा एक माणूस, स्वत:च्या चारित्र्यबळावर दोन्ही हातांनी फुटीचा झंझावात रोखण्यात यशस्वी झाला. परिणाम असा झाला की, त्यांच्या बलिदानाने आजची महासत्ता अमेरिका उभी राहिली. राजकारण तेथेही होते, राजकारण इंग्लडमध्येही होते. निवडणुका तेथेही होतात, प्रचाराची हीन पातळी तेथेही गाठली जाते. पण, सामान्य माणूस आपल्या जीवननिष्ठांशी तडजोड करीत नाही. तो समाजनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ राहतो. आपल्यालाही निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर पक्षानंतर ‘समाज प्रथम,’ ‘देश प्रथम’ या भूमिकेवर आले पाहिजे, तरच प्रचाराने निर्माण झालेल्या प्रदूषणावर आपल्याला मात करता येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@