इतकी चिंता नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |


 


नेते आले आणि गेले. मात्र, भारत आपला प्रवास करीतच राहिला. भारताच्या जनमानसाच्या लोकशाहीविषयक जाणिवांविषयी आज शंका व्यक्त केली गेलेली नाही. ती जुनीच पद्धत आहे.


आता मोदी ‘विभाजित’ देशाचे नेते कसे झाले आहेत, याचे विश्लेषण करणारा लेख ‘जगप्रसिद्ध मासिक’ असा लौकिक कमावलेल्या ‘टाइम’ मासिकाने प्रकाशित केला आहे. राज ठाकरेंसारख्या राजकीय सरोगसी करणाऱ्या नेत्यांच्या साहाय्याने निवडणुकी लढविणाऱ्यांना हा लेख म्हणजे ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीनुसार समाधानाचे प्रतीक झाला आहे. पर्यायाने पत्रकारितेत फारसे परिचित नसलेले या लेखाचे लेखक रातोरात भारतातल्या मोदीविरोधकांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर येणे, हे खरोखरच प्रतिष्ठेचे मानले जाते. ‘टाइम’ची ही तऱ्हा मानून जगभरातली अनेक साप्ताहिके व मासिके ‘टाइम’ची पद्धत अवलंबित असतात. मोदी ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर पहिल्यांदा आलेले नाहीत. किंबहुना, ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर आलेले ते पहिले भारतीय पंतप्रधानही नाहीत. लेखाचे लेखक आतिष तासीर यांनी अनेक जुनेच राग पुन्हा आळवत आपला लेख लिहिला आहे. गुजरात वगैरे वगैरे. आधुनिक जग हे लोकशाही मूल्यांच्या आधारावर चालत असल्याने, त्यांनी जे केले त्यात काही वावगे नाही. वडील पाकिस्तानी व आई भारतीय असलेल्या आतिष यांचे नागरिकत्व सध्या ब्रिटिश आहे. त्यांचे वडील पाकिस्तानी असल्याने त्यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित होण्याचे कारण नाही.

 

इंग्रजी साहित्यात आणि पत्रकारितेत त्यांचे नाव बऱ्यापैकी आदराने घेतले जाते. शिवाय आतिष यांच्यासारख्यांना जे वाटते, त्यापेक्षा या देशात काय घडते आहे, ते अधिक महत्त्वाचे आणि वास्तवाला धरून आहे. या देशातील लोकशाहीविषयी त्यांना वाटत असलेला कळवळा खरा मानला तरी त्यांचे आकलन मात्र त्यांनीच पुन्हा विचार करावा असेच आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश. भारताच्या खालोखाल अनेक देश असे आहेत, ज्यांच्याकडे लोकशाही प्रक्रिया राबविण्याचे अनेक प्रयोग आताही सुरूच आहेत. अनेक ठिकाणी निवडणुका लढविल्या जातात, त्या केवळ नावादाखल. भारतातील लोकशाही वाचेल की नाही, यावर शंका व्यक्त करणारे ते पहिले नाहीत. ‘ब्रिटिश साम्राज्याचा सिंह’ म्हणून ज्यांनी लौकीक कमावला त्या चर्चिलनासुद्धा कोणे एकेकाळी या भीतीने पछाडले होते. फरक एवढाच की, यात चिंतेऐवजी तुच्छताच अधिक होती. नियतीचा काव्यगत न्याय असा की, ज्यावेळी आतिष हा लेख लिहीत असतात, त्याचवेळी सध्या अमेरिकेच्या दयाबुद्धीवर टिकून असलेला ब्रिटन ‘ब्रेक्झिट’मुळे बेजार झालेला असतो. या उलट भारतीय जनमानस मोठ्या आनंदाने या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. ज्याला या मंडळींनी कोणे एकेकाळी ‘अशिक्षित’ म्हणून हिणविले, त्यांनी या देशात भल्याभल्यांना आपली जागा दाखविली. इंदिरा गांधी हे तर त्याचे जिवंत उदाहरण. जॉर्ज फर्नांडिस देशभर फिरत राहिले, परंतु त्यांनी त्यांची मुळे कुठेच रूजविली नाही.

 

भल्याभल्यांना प्रेमात पाडायला लावणाऱ्या नेत्याला लोकांनी मुंबईत ज्या प्रकारे निवडून दिले आणि नंतर पुन्हा घरचा रस्ता दाखवला, ही सगळी प्रक्रिया स्वत:च्या राजकीय विश्लेषण क्षमतेला शंभरपैकी शंभर गुण देणाऱ्यांना अचंबित करणारी होती. राजकीय पक्ष आले गेले. आभाळाइतके मोठे नेतेही भारतीय लोकशाहीने पाहिले आहेत आणि त्यांची लघुत्तम रूपेही अनुभवली. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारताकडे आज जगाच्या नकाशावर ‘एक उगवते राष्ट्र’ म्हणूनच पाहिले जात आहे. रोजगाराच्या संधी, आर्थिक बाबी या सगळ्याच दृष्टीने भारत एक मोठी सत्ता म्हणून उभा राहिला असल्याचे आपल्याला दिसते. इतक्या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक असलेले रोजगार, अर्थकारण याबाबत आपली स्थिती मतमतांतरासोबतच वृद्धिंगतच होत राहिली आहे. समाजवाद, डाव्यांचा प्रभाव, भांडवलशाहीची मुसंडी ही सगळी स्थित्यंतरे मोदींनी पाहिली. जगभरात सगळीकडे या सगळ्यांच्या अतिरेकाने राष्ट्रे कोलमडली. भारत मात्र आपला प्रवास करीत पुढेच चालला आहे. भांडवलवादाचा फुगा फुटून गुणात्मक आणि सातत्याने वृद्धिंगत होणारी अशी एक बाजारव्यवस्था भारतात उदयास येत आहे, ज्याची फळे समाजातल्या सर्वच वर्गाला चाखायला मिळतील. एकेकाळी आपल्या देशात काही मूठभर व्यावसायिकांचेच प्राबल्य होते. इतक्या मोठ्या प्रवासानंतर आज लाखो उद्योजक आपला व्यवसाय वृद्धिंगत करीत आहेत.

 

हे सगळे घडत असताना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जे घडले, त्यासाठी तासिर यांनी मोदींना श्रेय द्यायला हवे होते. दिल्लीतल्या लब्धप्रतिष्ठांच्या ओल्या पार्ट्या आणि त्यात मिळणारी सरकारी कंत्राटे आता पोर्टलवरच मिळू लागली आहेत. हा नवा भारत एका मोठ्या प्रवासानंतर आला आहे. तासीर यांना मानणारा जो कोणी वर्ग भारतात आहे, त्यांच्या दृष्टीने मोदी हे खलनायक आहेत आणि त्यांनी देश विभागल्याचे सांगणारे तासीर हे काही पहिले नाहीत. मोदींनी खरोखरच हा देश विभागला. नुसता विभागला नाही तर त्याचे दोन भागांत विभाजन केले. या दोन्हींच्या मध्ये ते आज ठामपणे उभे आहेत. त्यातला पहिला आहे भारतकेंद्रित विचार करणाऱ्यांचा आणि दुसरा आहे, केवळ स्वत:चे आणि स्वत:च्या विचारसरणीच्या लोकांचे हितसंबंध जपणाऱ्यांचा. लोकांसाठी राबविली जाणारी धोरणेही आज विचार करायला लावणारी आहेत. पूर्वी एका परिवाराच्या हितासाठी लोकानुनयाचे निर्णय घेतले जात होते. आता त्याचे विकेंद्रीकरण पाहायला मिळते. अमेरिकेत ‘लेहमन ब्रदर्स’ लडखडली तेव्हा काय झाले होते? लंडनमध्ये सध्या काय सुरू आहे? या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारत आपल्या प्रवासावर ठाम आहे. त्यामुळे तासीरसारख्या मंडळींनी आपला मुद्दा मांडण्यासाठी काही नवी उदाहरणे सादर करावी. भारतीय लोकशाही तिची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@