नाशिकमध्ये पाण्याअभावी अनेक मोर मृत्युमुखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |



नाशिक : चांदवड तालुक्यातील दहिवद येथे मोठ्या प्रमाणात मोरांचे वास्तव्य असते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याअभावी अनेक मोर मृत्युमुखी पडल्याची घटना दहिवद या गावी घडली आहे. भीषण दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात पशुहानी होत असल्याने हळहळ व्यक्त होत आहेनाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असून १५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. 

 

मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जानेवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईला नागरिक सामोरे जात आहेत. दहिवद व दिघवद या दोन गावांतील हद्दीमध्ये असंख्य मोरांचे वास्तव्य आहे. दहिवद येथील गोई नदीकाठावरील पिरसाई बाबा मंदिर परिसरात मोरांचे वास्तव्य आहे परंतु, उन्हाची तीव्रता व पाण्याच्या टंचाईमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात मोर मृत्युमुखी पडलेले आहेत. 

 

मोरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी दहिवद येथील गणेश निंबाळकर, विशाल जाधव, उत्तम खांदे, बाळासाहेब वाघमोडे, तुकाराम निंबाळकर, दिनेश शिंदे तसेच दिघवद येथील सुनील गांगुर्डे, रेवन गांगुर्डे, प्रताप गांगुर्डे या युवांनी पाण्याच्या कुंड्या परिसरात ठेवल्याने तात्पुरता उपाय केला आहे. वनविभागानेही याची दखल घेतली असून दोन्ही गावांतील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी मोरांचे संवर्धन व्हावे, यादृष्टीने पावले उचलली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@