उ. कोरियाला रशियाची फूस?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019   
Total Views |



किम नुकतेच रशिया भेटीवरून परतले होते आणि शिवाय रशियाकडूनच आयात केलेल्या ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्राची ही चाचणी असावी, असा एक कयासही पुढे आला आहे.


‘महासत्ता’ म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेचे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही हितसंबंध दडलेले असतातच. कधी वैयक्तिक स्वार्थापोटी, तर कधी जागतिक शांततेसाठी या महासत्तेची कुठे ना कुठे ढवळाढवळ सुरूच असते. मग ती अफगाणिस्तानातील तालिबान्यांशी चर्चा असेल, जेरुसलेमला थेट इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता असेल किंवा व्हेनेझुएलामध्ये थेट विरोधी पक्षाच्या प्रमुखालाच राष्ट्रप्रमुख घोषित करणे असेल; अमेरिकेची ही जागतिक अरेरावीची खोड ट्रम्प यांच्या काळातही मोडलेली नाही. कारण, जसा अलिप्ततावाद हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा आत्मा म्हणता येईल, त्याचप्रकारे हस्तक्षेपवाद हा पूर्वीपासूनच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजनीतीचा अविभाज्य घटक राहिला. खरंतर, याच हस्तक्षेपवादामुळे अमेरिकेला जे काही जागतिक महत्त्व आज प्राप्त झाले, त्यामुळे त्यांची पत, प्रतिष्ठा आणि पॉवर कायम राहिली. पण, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अमेरिकेची ही हस्तक्षेपवादी नीती काहीशी बदलेल, अशा शक्यता आंतरराष्ट्रीय वर्तुळातही व्यक्त केल्या जात होत्या. कारण, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाबरोबर ‘अमेरिका फर्स्ट’चे नारेही निवडणूकपूर्व प्रचारात चांगलेच नाचवले होते. त्यामुळे ‘आपण भले आणि आपला देश भला’ याच विचाराने ट्रम्प राज्यकारभार हाकतील, अशी आशा बाळगणाऱ्या राजकीय पंडितांचे अंदाज मात्र सपशेल फोल ठरले. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीसाठी चीनला कात्रीत धरले, तर इराणवरही तेलनिर्यातीचे निर्बंध लादले. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळातही ट्रम्प आणि अमेरिका यांनी मध्यस्थाची भूमिका निभावल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकीकडे अमेरिकन सैन्याच्या अफगाणिस्तानातून माघारीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या ट्रम्प यांना तेथील तालिबानच्या दहशतीमुळे अजूनही अफगाणिस्तानातून काढता पाय घेता आलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘१०० टक्के आम्ही सोडवला’ असा एकही प्रश्न छातीठोकपणे ट्रम्प यांना आजघडीला तरी सांगता येणार नाही. त्यापैकीच सगळ्यात क्लिष्ट आणि अमेरिकेच्या संयमाची परीक्षा पाहणारा प्रश्न म्हणजे उ. कोरिया आणि त्याचा हुकूमशहा किम जाँग ऊन याच्याशी मैत्रिपूर्ण संबंधातून त्या देशातील अण्वस्त्रीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम लावणे.

 

खरंतर ट्रम्प यांनी यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्नही केले. द. कोरियाचीही त्यांना याकामी साथ लाभली. किम-ट्रम्प यांची दोनदा ऐतिहासिक भेटही झाली. आपल्या देशातून पाऊलही बाहेर न ठेवणारा हा उ. कोरियाचा हुकूमशहा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, कट्टर शत्रू मानणाऱ्या द. कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनाही भेटला. त्यामुळे कुठेतरी ट्रम्प यांनी किमची नाडी अचूक हेरल्याची आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा रंगू लागली होती. पण, या आठवड्याभरात चक्क दोनदा उ. कोरियाने पुन्हा कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर ट्रम्प यांची शिष्टाई निष्फळ ठरली, असेच खेदावे म्हणावे लागेल. द. कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, उ. कोरियाने मोठ्या जोशात येऊन या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्यामागचे कारण समजू शकले नसले तरी किमने अमेरिकेप्रती आपली नाराजी या चाचणीतून व्यक्त केली असल्याचा कयास वर्तविला गेला. कारण, किम-ट्रम्प यांच्या दोनदा झालेल्या चर्चेतून ठोस असे कुठलेही आश्वासन किम यांनी दिले नाही आणि ट्रम्प यांचा ‘आम्ही म्हणतो ती पूर्वदिशा’ हा स्वभाव हुकूमशहा किमच्या पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळे किमने अमेरिकेला फाट्यावर मारून पुन्हा एकदा आपले जुनेच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नोव्हेंबर २०१७ नंतर उ. कोरियाने अशी कुठलाही चाचणी घेतली नव्हती. त्यामुळे या आठवड्यात झालेल्या या दोन क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे जागतिक राजकीय विश्लेषकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. किम यांना यासाठी रशियाचा छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले जाते. कारण, किम नुकतेच रशिया भेटीवरून परतले होते आणि शिवाय रशियाकडूनच आयात केलेल्या ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्राची ही चाचणी असावी, असा एक कयासही पुढे आला आहे. त्यामुळे किम अमेरिकेच्या दबावापुढे झुकू नये, म्हणून रशियाची ही पडद्यामागील खेळी असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण, वरकरणी अमेरिका-रशिया संबंध फारसे ताणलेले नसले तरी दोन्ही महासत्तांमधील शीतयुद्धाच्या अस्तनीतले निखारे आजही धगधगते आहेत. तेव्हा, आगामी काळात कोरियन द्वीपकल्पातील या घडामोडी कुणीकडे वळतात, ते पाहणे जागतिक राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@