लाल क्रांतीची निर्यात आणि दारु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



‘अ‍ॅन इम्पेकेबल स्पाय : रिचर्ड सोर्ज : स्टॅलिन्स मास्टर एजेंट’ या पुस्तकात रिचर्ड सोर्ज या जर्मन-रशियन हेराचा विलक्षण जीवनवृत्तांत मांडला आहे. आपल्याला पटलेल्या तत्त्वज्ञानासाठी माणसं काय-काय उद्योग करतात, याचं चक्रावून टाकणारं चित्र यात आपल्या अनुभवाला येतं.


११ सप्टेंबर, २००१चा वर्ल्ड ट्रेड सेंटरचा महाभयंकर विद्ध्वंस, पेंटेगॉन या अमेरिकन लष्करी मुख्यालयाचा न घडू शकलेला विद्ध्वंस याबद्दल भरपूर लिहिले गेले आहे. नंतरच्या काळात या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या ओसामा बिन लादेन या महाखलनायकाचा खात्मा अमेरिकन ‘सील’ कमांडो पथकाने कसा केला, यावरही भरपूर साहित्य उलपब्ध आहे. पण, हा सगळा प्रतिक्रियात्मक भाग आहे. अमेरिकेवर विद्ध्वंसक हल्ला झाला. मग अमेरिकेने त्याचा कसा सूड घेतला, हे खूप मोठ्याने मोठ्या प्रमाणात सांगितले जात आहे. अमेरिकेतल्या विविध गुप्तचर संस्थांच्या गुप्तसूत्रांनी, इस्लामी अतिरेकी खुद्द अमेरिकन भूमीवर काहीतरी जब्बर उत्पात घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा सूचना दिल्या होत्या. पण, स्वत:च्या टिमक्या बडवत देशभर प्रवास करणाऱ्या जॉर्ज बुश प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. वेळेवर प्रतिबंधक उपाययोजना केल्या नाहीत, असा गंभीर आरोप अमेरिकेतल्याच अनेक मान्यवर पत्रकारांनी केलेला आहे. गुप्तचर संस्था राज्यकर्त्यांना शत्रूच्या हालचालीची माहिती पुरवतात. त्यांचे काम तेवढेच असते. त्या माहितीचा वापर करून योग्य तो निर्णय म्हणजे, आपला देश, आपलासमाज, आपलं शासन यांना अनुकूल असा निर्णय घेण्याचे काम, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे काम हे राज्यकर्त्यांचे असते. त्यांनी ते केले नाही की, ‘९/११’ घडते. पण, एकटे जॉर्ज बुशच असे वागलेले नाहीत. जॉर्ज बुश हे खरंतर अगदीच सुमार कुवतीचे नेते होते. त्यांचे भाग्य म्हणून ते दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. परंतु, साक्षात् जोसेफ स्टॅलिन, जो माणूस धूर्तपणा, मुत्सद्देगिरी, सावधपणा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, क्रूरपणा या सगळ्याच गुणांचा (?) गाळीव अर्क होता, तोही असाच वागला होता. मैत्रीचा, अनाक्रमणाचा करार मोडून हिटलर सोव्हिएत रशियावर आक्रमण करणार आहे, ही अत्यंत मौल्यवान खबर त्याच्या विश्वासू हस्तकाने वेळेवर पोहोचवलेली होती. पण, हिटलरच्या गोड गोड भूलथापांना भुललेल्या स्टॅलिनने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ती खबर देणाऱ्या गुप्त सांकेतिक तारेच्या कागदावर ‘संशयास्पद’ असा शेरा मारून ती बाजूला टाकली अन् मग पुढचा भीषण अनर्थ घडला. सोव्हिएत सैन्याला सपाटून मार देत हिटलरच्या फौजा राजधानी मॉस्कोच्या वेशीवर येऊन थडकल्या.

 

ओवेन मॅथ्यूज हा मूळचा ब्रिटिश पत्रकार. सध्या तो इस्तंबूल आणि मॉस्कोमधून ‘न्यूजवीक’ या अमेरिकन साप्ताहिकासाठी काम बघतो. २००८ साली त्याने लिहिलेले ‘स्टॅलिन्स चिल्ड्रन’ हे पुस्तक प्रचंड गाजले. आता नुकतेच त्याने लिहिलेले ‘अ‍ॅन इम्पेकेबल स्पाय : रिचर्ड सोर्ज : स्टॅलिन्स मास्टर एजेंट’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्याने रिचर्ड सोर्ज या जर्मन-रशियन हेराचा विलक्षण जीवनवृत्तांत मांडला आहे. आपल्याला पटलेल्या तत्त्वज्ञानासाठी माणसं काय-काय उद्योग करतात, याचं चक्रावून टाकणारं चित्र यात आपल्या अनुभवाला येतं. रिचर्ड सोर्जचा जन्म १८९५ मधील. त्याचा बाप जर्मन आणि आई रशियन होती. १९१४ साली पहिलं महायुद्ध पेटलं, तेव्हा १९ वर्षांचा सोर्ज जर्मन लष्करात भरती झाला. महायुद्ध सुरू असतानाच १९१७ साली लेनिनने रशियात साम्यवादी क्रांती केली. जगभराचे असंख्य तरुण मार्क्सवादी तत्त्वज्ञानाने आणि लेनिनने त्यावर आधारित उभारलेल्या राज्यव्यवस्थेमुळे अक्षरश: झपाटले गेले. रिचर्ड सोर्जने मार्क्सवादाचा कसून अभ्यास केला नि तो पक्का मार्क्सवादी बनला. तसे त्या काळात अनेक जण होते पण, सोर्जचं पाणी वेगळं होतं. तो नुसताच बोलघेवडा नव्हता. महायुद्ध संपून राजधानी बर्लिनमध्ये परतल्यावर त्याने प्रथम आपलं शिक्षण पूर्ण केलं. तो पदार्थविज्ञानशास्त्रात डॉक्टरेट पदवीधारक झाला. तोपर्यंत लेनिनचे हस्तक सर्व युरोपीय देशामधून फिरू लागले होते. हे हस्तक ‘लाल क्रांतीची निर्यात’ करण्याचा लेनिनचा संदेश तरुण वर्गात पसरवत होते. म्हणजे तुमच्या देशातलीकथित लोकशाही सरकारं उलथून टाका, लाल क्रांती करा, साम्यवादी व्यवस्था आणा, सोव्हिएत सत्ता तुमच्या पाठीशी आहे. ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’ उर्फ ‘कॉमिन्टर्न’ या संस्थेमार्फत संपूर्ण जगात लाल क्रांती घडवायची होती. रिचर्ड सोर्ज स्वखुषीने ‘कॉमिन्टर्न’ चा सदस्य बनला. प्रथम त्याला ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांमध्ये पाठवण्यात आले. विविध नामवंत जर्मन वृत्तपत्रांचा वार्ताहर हे त्यांच बाह्यरूप होते. त्या-त्या देशांमधील पत्रकार, संपादक, लेखक, बुद्धिमंत, विचारवंत यांना भेटणं, त्यांच्या-त्यांच्या देशात साम्यवादी विचारांचा प्रचार-पसार करणं आणि लाल क्रांतीसाठी अनुकूलस्थिती तयार करणं, हे त्याचं कार्यकर्ता म्हणून काम होतं. पण, त्याचं खरं काम होतं, त्या-त्या देशांमधून सोव्हिएत रशियाला महत्त्वाची माहिती पुरवत राहणारे खबरे, खबऱ्यांची जाळी निर्माण करणं.

 

स्वत: अत्यंत बुद्धिवान आणि वैचारिक बैठकीतून काम करणाऱ्या सोर्जला असा अनुभव आला की, हेरजाळी उभी करण्यासाठी वैचारिक बांधिलकी म्हणजे साम्यवादी तत्त्वज्ञानावरची निष्ठ कामी येतेच; पण, त्यापेक्षाही दारू जास्त कामी येते. म्हणजे तुम्ही स्वत: भरपूर दारू प्या, इतरांना भरपूर दारू पाजा. सतत दारूच्या मैफिली भरवा. यातून महत्त्वाच्या जागांवर काम करणारी माणसं तुमच्या ओळखीची बनतात. त्यांच्याशी मैत्री करायची, वाढवायची, त्यांच्याकडून माहिती मिळत राहील, सतत मिळत राहील, अशी व्यवस्था करायची. रिचर्ड सोर्जने अनेक देशांमध्ये अशी हेरजाळी उभी केली. त्यांच उल्लेखनीय यश हे होतं की, हिटलरच्या नाझी पक्षाच्या अंतर्वर्तुळात त्याने प्रवेश करून घेतला. अजून नाझी पक्ष जर्मनीत सत्ताधारी बनला नव्हता. पण, हिटलरची वैयक्तिक लोकप्रियता मात्र वाढत चालली होती. तेवढ्यात सोर्जला चीनमध्ये पाठवण्यात आलं. शांघायमधल्या ब्रिटिश उच्चाधिकाऱ्यांच्या वर्तुळात सोर्जने नेहमीच्याच युक्तीने प्रवेश मिळवला. १९३३ साली हिटलर जर्मनीत सत्तारूढ झाला आणि जाणत्या लोकांना पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता वाटू लागली. पण, लेनिननंतर सोव्हिएत रशियाचा सर्वेसर्वा बनलेल्या स्टॅलिनला जर्मनीपेक्षा चिमुकल्या जपानचीभीती वाटत होती. कारण, १९३१-३२ जपानने मांचुरिया प्रवेश जिंकला होता. म्हणजे आता जपान रशियावर समुद्राप्रमाणेच भूमीवरूनही थेट आक्रमण करू शकत होता. रशियाचे आरमार सामान्यच होते. पण, लष्कराचाही बोऱ्या वाजलेला होता. कारण, आपल्याविरुद्ध बंड करतात म्हणून स्टॅलिनने रशियन लष्करातल्या काही हजार अधिकाऱ्यांना सरळ ठार मारलं होतं. उलट जपानी आरमार आणि जपानी लष्कर अत्यंत अद्ययावत होतं.

 

त्याकरिता १९३३ साली स्टॅलिनने रिचर्ड सोर्जला जपानला पाठवलं. टोकियोत पोहोचून सोर्जने एक वेगळीच खेळी केली. तो जपानमधल्या एका उच्च जर्मन लष्करी अधिकाऱ्याला भेटला. त्याचं नाव होत युजिन ऑट. सोर्जने ऑटला सांगितलं की, “माझ्या चीन, जपान आणि सोव्हिएत वरिष्ठ वर्तुळात बऱ्याच ओळखी आहेत. मला नाझी पक्षाची ध्येयधोरण फार पसंत पडली आहेत. तेव्हा आपण या तिन्ही देशांबद्दल उपलब्ध होणारी माहिती जर्मन गुप्तहेर खात्याकडे पोहोचवूया. युजिन ऑट खूश झाला. माहितीचा ओघ टोकियोकडून बर्लिनकडे वाहू लागला. युजिन ऑटोचं आणि रिचर्ड सोर्जचं सुदैव असं की, अल्पवधीतच हिटलरने खुद्द युजिन ऑटोचीच जपानमधला ‘जर्मन राजदूत’ म्हणून नेमणूक केली. आता तर काय माहितीचा प्रवाह आणि ती माहिती काढण्यासाठी वापरलेला दारुचा प्रवाह हे एकमेकांशी स्पर्धा करू लागले. सोर्जने एक अगदी साधी युक्ती केली होती. तो बर्लिनला पाठवत असलेली माहिती आणि बर्लिनहून त्यांच्याकडे येणारी माहिती यांचा प्रत्येक कागद तो मॉस्कोलाही पाठवत होता आणि बिचारा युजिन ऑटो मात्र सोर्जला ‘निष्ठावंत नाझी’ समजत होता. पण, माहितीच्या या आदानप्रदानातून सोर्जला भयानक भवितव्य दिसलं. स्टॅलिन जपानला घाबरत होता आणि जपानचा रशियावर हल्ला करण्याचा अजिबातच बेत नव्हता. उलट ज्या हिटलरशी स्टॅलिनने मित्रत्व जोडलं होतं, तो हिटलरच स्टॅलिनवर जबरदस्त हल्ला करणार होता. सोर्जने सांकेतिक तारेने ही बातमी मॉस्कोला धाडली - १५ जून, १९४१ या दिवशी जर्मन फौजा रशियाच्या पश्चिम आघाडीवर प्रचंड आक्रमण करणार असून या लष्करी मोहिमेचं सांकेतिक नाव आहेऑपरेशन बार्बरोझा.’ परंतु, स्टॅलिन हिटलरच्या बोलण्यावर एवढा खूश होता की, त्याने या तारेच्या कागदावर शेरा मारला ‘संशयास्पद’ आणि तार बाजूला ठेवून दिली. प्रत्यक्षात १५ जून नाही, पण २२ जूनला हिटलरने खरोखरच झंजावाती हल्ला चढवला आणि मग स्टॅलिनचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीमात्र, यानंतर जर्मनी आणि जपान दोघांच्याही गुप्तचर खात्यांना सोजचा संशय आला. टोकियोतच त्याला अटक झाली. खटला चालला. “मला आवडणाऱ्या तत्त्वज्ञानासाठी (म्हणजे साम्यवादासाठी) मी हे काम केलं,” असं सोर्जने अभिमानाने सांगितलं. ७ नोव्हेंबर, १९४४ या दिवशी सोर्जला फासावर लटकावण्यात आलं. ‘लाल क्रांती आणि दारू’ यांचा प्रवास सोर्जपुरता तरी संपला. मनुष्य स्वभावतल्या ज्या दोघांचा फायदा घेत रिचर्ड सोर्जने हेरजाळी उभारली. ते दोष मनुष्य स्वभावात आजही आहेतच. किंबहुना, वाढलेच आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@