ईशान्य भारतातून सापाची नवी पोटजात आणि प्रजातीचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |



 महाराष्ट्रातील डाॅ.वरद गिरी यांचे संशोधन

मुंबई (अक्षय मांडवकर) : ईशान्य भारतामधून सापाची एक नवी पोटजात (जिनस) आणि प्रजातीचा उलगडा करण्यामध्ये उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. भारताच्या उभयसृपशास्त्रात (हर्पेटोलाॅजी) महत्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ मालकोम ए. स्मिथ यांच्या नावे या नव्या पोटजातीचे नामकरण 'स्मिथोफिस' असे करण्यात आले आहे. तर नव्या प्रजातीचे नाव 'स्मिथोफिस अटेम्पोरॅलिसिस' म्हणजेच 'मिझो रेन स्नेक' असे ठेवण्यात आले आहे.

 

भारतातील सापांच्या पोटजातीत नव्या जातीची आणि त्याचबरोबर नव्या प्रजातीची भर पडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास त्यातील ५० टक्के प्रजातींचे वर्गीकरण झालेले नाही. याच वर्गीकरणाचा प्रयत्न उभयसृपशास्त्रज्ञांकडून सुरू आहे. ईशान्य भारतातून नव्याने उलगडलेली 'स्मिथोफिस' ही पोटजात या वर्गीकरणाच्या कामाचे यश आहे. 'रबडाॅप्स' या पोटजातीमध्ये आजवर केवळ दोन सापांच्या प्रजातींचा समावेश होत होता. यामध्ये पश्चिम घाटतील 'आॅलिव्ह फाॅरेस्ट स्नेक' म्हणजेच 'रबडाॅप्स आॅलिव्हसिऊस' आणि ईशान्य भारतातील 'बायकलर्ड फाॅरेस्ट स्नेक' म्हणजेच 'रबडाॅप्स बायकलर' यांचा समावेश होता. या दोन्ही प्रजाती संयुक्तरित्या केवळ या दोन क्षेत्रांमध्येच आढळून येतात. मात्र शास्त्रज्ञांनी या दोन्ही प्रजातींच्या गुणसुत्रांची (डीएनए) चाचणी केल्यानंतर त्यांनी या प्रजाती एकाच पोटजातीत मोडत नसल्याचे निरीक्षण नोंदवले.


 

'बायकलर' ही इंडोचायना प्रजातींच्या जवळ जाणारी प्रजात आहे. तर 'आॅलिव्हसिऊस' ही त्याहून वेगळी प्रजात असल्याचे उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ.वरद गिरी यांनी सांगितले. 'स्केल्स'चे निरीक्षण केल्यानंतर ईशान्य भारतातील 'बायकलर' ही प्रजात नव्या पोटजातीत वर्गीकृत केल्याची माहिती गिरी यांनी दिली. या पोटजातीचे नाव मालकोम ए स्मिथ यांचा कार्याचा गौरव म्हणून 'स्मिथोफिस' ठेवल्याचे गिरी म्हणाले. याशिवाय ईशान्य भारतातील मिझोराम मध्ये आढळलेल्या सापाच्या नव्या प्रजातीचा समावेशही 'स्मिथोफिस' या पोटजातीत करण्यात आला आहे. म्हणजेच 'स्मिथोफिस' या पोटजातीत आता दोन प्रजाती वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. मिझोराम मध्ये आढळलेल्या नवीन प्रजातीत 'टेम्पोरेल स्केल' नसल्याने तिचे नाव 'स्मिथोफिस अटेम्पोरॅलिसिस' ठेवण्यात आले आहे. ९ मे रोजी प्रकाशित झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनाचे काम डाॅ. वरद गिरी यांनी लंडनच्या 'नॅचलर हिस्टी म्युझियम'चे डाॅ.डेव्हिड गाॅवर, 'डब्ल्यूआयआय'चे अभिजित दास, अशोक कॅप्टन, मिझोराम विद्यापीठाचे एच.टी.लालरेमसांगा, डाॅ. सॅम्युएल लालरोंगा आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स'चे डाॅ.वी. दिपक यांच्या मदतीने केले आहे.

 

नव्या प्रजातीविषयी

'स्मिथोफिस अटेम्पोरॅलिसिस' या सापाच्या नव्या प्रजातीला सोप्या भाषेत 'मिझो रेन स्नेक' असे म्हणता येणार आहे. हा साप पाण्यात राहणारा असून बिनविषारी आहे. दाट मनुष्यवस्तीत हा साप आढळतो. हा साप प्रामुख्याने पावसाळ्यात पाहिला जात असून त्याचा आकार २.५ फूटांचा आहे. पाली, बेडूक आणि अंडी हे त्याचे खाद्य आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@