दुष्काळ आवडे सर्वांना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |

निवडणुकीचा चौथा टप्पा आटोपला आहे. महाराष्ट्रातले मतदान झाले आहे. मराठी माणूस नाटक आणि राजकारणाचा वेडाच आहे, असे म्हणायचे. आता नाटकाचे वेड राहिलेले नाही. त्याची जागा क्रिकेटने घेतली आहे. एकतर आयपीएल सुरू आहे. दुसरीकडे निवडणुकीचा दणक्यात माहोल आहे. त्यामुळे लोकांना बाकी काही दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचारात दुष्काळाची अजीबातच चर्चा नव्हती. जनतेनेही आपले हे दु:ख बाजूला सारून लोकशाहीचा महासण साजरा केला. निकाल लागून सरकार स्थापन होईपर्यंत पावसाळ्याचे दिवस आलेले असतात. त्यानंतर लगेच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मैदान सजायला सुरुवात झालेली असेल आणि पावसाला नाही, तर पावसाच्या वार्तांना सुरुवात झालेली असेल. त्यामुळे पाऊस येणार, या अंदाजांचा गारवा हवेत निर्माण झालेला असेल. खरेतर पाऊस आला म्हणजे पाणीटंचाई संपते, असे नाही. पाणीकथा काही अशीच संपत नाही. आपला देशच मुळात गंगेचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे पाणी ही आपली ओळख आहे. आपल्या देशात कुणी कुणाचा रागही करत असेल, तर त्याला ‘पाण्यात पाहणे’ असे म्हणतात. प्रेम करत असेल तरीही, ‘तुझ्यावर माझे डोहाइतके खोल प्रेम आहे,’ असे म्हणतात. आता निवडणुकीचे मतदान झाले आहे अन् निकाल काय लागेल म्हणून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्य सरकारने राज्यात 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राने निधीही दिला आहे. शासन आणि प्रशासन आता निवडणुकीच्या जबाबदारीत आहेत अन् विरोधकही त्याच मूडमध्ये असल्याने, दुष्काळ हा लोकांनी केवळ सहन करण्याचा विषय आहे.
 
दुष्काळ म्हणजे तिसरे पीक आहे. का? भारतात अवर्षणाची स्थिती फारशी नाही. मॉन्सून सरासरीपेक्षा कमी येतो. यंदाही पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज आहे. पाऊस कमीजास्त दरवर्षीच होतो. आता त्याला जागतिक तापमानवाढीचे अन् त्यामुळे अलनिनो, लानिनो वादळांचे कारण दिले जाते. मात्र, 1960 पासून पर्जन्यमान पाहिले, तर पावसाची सरासरी सतत कमीजास्त होत राहिली आहे. काही ठिकाणी अल्पवर्षा असते. मात्र, मग माध्यमे, राजकीय नेते आणि अधिकारी यांची त्रयी अल्प वर्षेचे अवर्षण करतात. भेगाळलेल्या जमिनी अन् डोक्याला हात लावून बसलेले शेतकरी यांची छायाचित्रे छापली जातात. बातम्यांचा रतीब चालतो. दूरवरून पाणी आणणार्या ग्रामीण महिलांची छायाचित्रे भयावहता वाढवीत असतात. कधीकाळी आपल्या जिल्ह्यात दुष्काळ आहे, हे कलेक्टर अन् त्या जिल्ह्याच्या नेत्यांना लाजिरवाणे वाटायचे, आता त्यांना दुष्काळ हवाच असतो. त्यामुळे दुष्काळग्रस्तता अशी निर्माण केली जाते... या बातम्यांच्या फाइल्स तयार केल्या जातात अन् मग
सरकारवर दबाव निर्माण केला जातो...
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बातम्यांच्या फाइल्स, लोकांनी दिलेली निवेदने अन् छायाचित्रे यांची आरास मांडली जाते. हृदयद्रावक चित्र निर्माण केले जाते. केंद्राचीही दुष्काळ निवारण योजना असते. त्यातही आपल्या तालुक्याचा, ब्लॉकचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. वरवर हे सारे जनतेसाठीच आहे, असे वाटत असले तरी आत मात्र दुष्काळाचे ‘तिसरे पीक’ कॅश करण्याची मनीषा असते. सरकार कुठलेही असले, तरीही याची दखल घ्यावीच लागत असते. काय आहे, की एकदा दुष्काळ घोषित झाला की, त्या भागासाठी निधीचा ओघ सुरू होतो. विविध खात्याचे मंत्री आणि अधिकारी दुष्काळ निवारणार्थ त्यांच्या खात्याच्या योजना फटाफट सांगतात. निधीमुळे डोकी चालू लागतात. आता मराठवाड्यात गेली काही वर्षे सतत दुष्काळ आहे. महत्त्वाचे मद्य कारखाने औरंगाबादेत आहेत. उन्हाळ्यात बीयरची मागणी वाढलेली असते देशात. औरंगाबादच्या मुख्य कारखान्यातून दिवसाला साडेसात लाख बॉटल्स जातात. उरलेल्या चार कारखान्यांतून तीन-साडेतीन लाख बॉटल्स जातात. यांना पाणी कुठून येते?
 
 
 
दुष्काळ आला की, आधी लोकांना पाणी पुरविण्याची अहमहमिका चालते. वाईट काहीच नसते त्यात. मात्र, मग टँकर लॉबी उभी राहते. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पुस्तक लिहिणारे पी. साईनाथ यांनी ‘पाणीपती’ हा छान शब्द वापरला आहे. ते म्हणतात ते खरेच आहे. आपल्या देशात पाणी नाही असे नाही, पण पाण्यावर धनदांडग्यांचा अधिकार असतो. दुष्काळ घोषित झाला की, त्या भागातल्या विहिरी अधिग्रहित केल्या जातात. त्या टँकरपतींच्या हातात दिल्या जातात. खरेतर त्या विहिरीवरून जवळच्या गावांना पाणी पुरविण्यासाठी नळ योजना सुरू करण्यास फार वेळ आणि पैसा लागत नाही, मात्र टँकर वापरला नाही तर पाण्यासारखा पैसा पाणीपतींच्या तिजोरीत कसा जाणार? दिवसाला टँकरच्या किती चकरा झाल्यात, हे मोजतो तहसीलमधला बाबू... टँकरवाल्यांना डिझेलही दिले जाते. प्रत्यक्षात ज्यांना हवे तिथवर पाणी पोहोचतच नाही. त्या गावाच्या सरपंचाची सही मात्र टँकरवाल्याकडे असते... काय होते नि कसे, हे सुज्ञांच्या लक्षात आले असावे...
 
हिंदी चित्रपटात एक संवाद असतो, ‘‘मै तुझे पानी पिला पिला के मारूंगा...’’ दुष्काळात धनदांडगे- ज्यांना राजाश्रय असतो- असे लोक सामान्यांना पानी पिला पिलाकेच मारते हैं... दुष्काळाच्या काळात जमिनी विक्री करणार्या दलालांचेही फावत असते. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यातल्या दुष्काळात एका सामान्य शाळा मास्तरीणबाईंनी जवळपास 300 एकर जमीन बळकावली. दोघेही मास्तर अन् राजकीय पाठबळही. दुष्काळात पाणीही हेच देणार. पीक घ्यायला कर्जही हेच देणार अन् मग पीक छान दिसू लागले असताना पाणी देणे कधी थांबवायचे हेदेखील यांच्याच हाती असते. पाणी थांबविले की पिके करपतात. कर्ज डोक्यावर असते. ते देताना जमीन लिहून घेतलेली असते. ती नावावर करून घेतली जाते. मुंबई, पुण्याकडचे धनदांडगे ही जमीन विकत घ्यायला तयारच असतात. ती त्यांना विकली जाते. स्थानिक पातळीवरचे पुंड नेते ही दलाली करतात. अनेकांचे हात ओले होत असताना शेतकर्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी असते. मग ते कुणाशीही न बोलता चुपचाप आत्महत्या करतात...
 
टँकर असतात, चारा छावण्या असतात. एकीकडे पाणी नसते अन् शीतपेयांच्या नाहीतर बीयरच्या फॅक्टर्यांना मात्र पाणी पुरविले जाते. सुकलेल्या गावतलावांच्या जमिनीत पाणी असते. तिथे पाणीपती बोअर मारतात. टँकर्स त्यावरून भरतात. एक गुंड पाणीही वीस- पन्नास रुपयांना विकले जाते. दुष्काळग्रस्त भागात बोअर्सची संख्याही तिपटीने वाढलेली असते. खरेतर त्या पाण्यावर काही धनदांडग्या पाणीपतींचा अधिकार नसतो, मात्र ताबा त्यांचाच असतो.
 
 
चारा छावण्यांचीही एक कथा असते. चारा छावण्या लावण्याचे कंत्राट राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच दिले जाते. पाहणीच्या वेळी या छावणीतली गुरे दुसर्या छावणीत वेगाने हलविली जातात. पटसंख्या दाखविण्यासाठी मुले जशी हलविली जातात तशीच... बरे, हा पवित्र घोटाळा असतो. त्याचा हिशेब मागणेही पाप असते. कारण समोर केली जाते दुष्काळाने होरपळणारी सामान्य जनता... सरकार म्हणजे केवळ सत्ताधारीच, असे नाही. विरोधकही सरकारच असतात. नेमक्या ठिकाणी अडवायचे. कल्ला करायचा. सत्ताधारी अन्याय करतात, असे म्हणायचे. दुष्काळ निर्माण होऊच नये, अशी कामे व्हायला हवीत. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर... पण, तशी कामे होत नाहीत. ओरड करणारे विरोधकही ती करू देत नाहीत. सत्ताधारी ती करत असतील, तर काहीतरी कारणे दाखवून आंदोलने उभी केली जातात. दुष्काळ असण्यापेक्षा जास्त निर्माण केला जातो आणि मग दुकानदारी सुरू होते. दुष्काळी कामे ‘आपल्या’ माणसांना मिळाली की सारे कसे गप्पगार होते. पावसाळा सुरू झाला की, मग दुष्काळाच्या चर्चा बंद होतात. ऐन पसवाळ्यातही गावे तहानलेलीच असतात, हे वास्तव आहे. बारोमास टँकरवाली गावे आहेतच... जनता का गप्प बसते मग? कारण त्यांनाही दुष्काळाच्या नावाने अनेक सवलती मिळतात. झळा सहन करणारे चुपचाप मरतात. आवाज करू शकणारे दुष्काळ एन्जॉय करतात... कारण, दुष्काळ सार्यांनाच आवडतो!
@@AUTHORINFO_V1@@