अटीतटीला आलेले पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |

 

पवार जेव्हा म्हणतात की, “बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” तेव्हा त्यामागचे वास्तव काही निराळेच असते.
 

बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उठेल,” असे विधान शरद पवारांनी केले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते. महाराष्ट्रात झालेल्या मतदानात अनेक अर्थ दडलेले आहेत. वाढीव मतदान हे सरकारच्या विरोधात असते, हा अलिखित नियम अनेक वर्षांनी तुटण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. मतदानानंतर राजकीय तोफा थंडावलेल्या असल्या, तरीही मुलाखती देण्याचे पवारांसारख्या नेत्याचे काम नक्कीच विचार करायला लावते. निवडणुकीच्या राजकारणातून पवारांनी निवृत्ती घेतली आहे म्हणजे निवडणूक न लढविण्याच्या निर्णयावर आज तरी ते ठाम आहेत. खुद्द त्यांच्या घरातच त्यांना अपेक्षित असलेल्या घराणेशाहीपेक्षा अधिक मोठी घराणेशाही सुरू झाली, तेव्हा पवारांनी सरळ आपण निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून टाकले आणि ते मोकळे झाले. यालाधोरणी आजोबावगैरे असे विशेषणे लावून पवारांच्या रमण्यात रमणाऱ्या पत्रकारांनी लेख वगैरेही लिहिले. पण, खरंतर ही पवारांची अगतिकताच होती. त्यांच्या १३व्या बॉम्बस्फोटाची अफवा पसरविण्याच्या पळपुटेपणालाहीधोरणीपणाच म्हटले गेले तसेच इथेही. एकाच घराण्यातील अनेकांना तिकीट देण्याचा स्वत:च्या पक्षाच्या अस्तित्वावर काय परिणाम होऊ शकतो, याची पवारांना पुरेपूर कल्पना आहे. आधीच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात पवार आणि राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केलेले. त्यात वरून मोदींचा मार.


अटलजींच्या काळात काही ना काही करून आपल्या डोक्यावरचा लाल दिवा कायम ठेवलेल्या पवारांना अशा वातावरणाची सवय नाही. काँग्रेसमध्ये पवारांची घुसमट मोठी होती. भलीमोठी मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द, संरक्षणमंत्री यासारखी पदे भूषविल्यानंतर पवारांना पंतप्रधानपदाचे वेध लागले होते. इंदिरापर्वाच्या सांगतेनंतर आलेल्या राजीव गांधींना मात्र पवारांविषयी कधीच विश्वास नव्हता. सोनियांपर्यंत अविश्वासाची ही परंपरा कायम राहिली. सीताराम केसरींना कोंडून सोनिया गांधींनी काँग्रेस ताब्यात घेतली, तेव्हा पवार आणि काँग्रेसमधल्या अनेकांना आता आपले काय होणार याची भीती वाटत होती. पवारांचा साहसवाद इथे कामाला आला. त्यांनी सरळ सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्याला हात घालत काँग्रेस हायकमांडला आव्हान दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या पक्षाची स्थापना केली. दिवस बरे होते आणि मोदीपर्व सुरू व्हायचे असल्याने ज्या काँग्रेसशी सवतासुभा करून पवार बाहेर पडले होते, त्याच काँग्रेससोबत पवार सत्तेत पुन्हा सहभागी झाले. व्यापक देशहित लक्षात ठेवून आपण हे करीत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. वस्तुत: हा सोनियांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्याला ज्या मंडळींनी त्यावेळी होकार भरून मतदान केले होते, त्यांच्या विश्वासाला धक्का लावण्याचाच हा प्रकार होता.

 

पवारांवर राजकीय विश्वासघाताचे आरोप आज झालेले नाहीत. त्यांनी जे फोडाफोडीचे राजकारण केले, त्याची कितीतरी जिवंत उदाहरणे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय दिसतात. ‘आपला दिलदार मित्र’ आणि ‘राजकीय प्रतिस्पर्धी’ असे ज्यांचे वर्णन पवार स्वत: करीत राहतात, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात फोडाफोडीला कुणी सुरुवात केली? गणेश नाईक, छगन भुजबळ हे सेनेतले वजनदार नेते पवारांनी स्वत:बरोबर नेले. गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आजही राष्ट्रवादीवासी आहेतच. या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर आज जे काही सोबत आहे तेही निघून जाईल, याची पवारांना भीती आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या राजकीय वारसासह राष्ट्रवादी काँग्रेस सोडली याचा पवारांना मोठा धक्का बसला. कारण, सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसच्या ज्या मोठ्या नेत्यांनी पवारांसोबत, पवारांसाठी काँग्रेसला रामराम केला होता, त्यात मोहिते-पाटील आणि नुकतेच निधन पावलेले राष्ट्रवादीचे आ. हनुमंत डोळसदेखील होते. आता ही जागा पुन्हा राष्ट्रवादीच्या खात्यावर निवडून आणणेसुद्धा पवारांना मुश्कील होणार आहे.

 

पवारांच्या मुळात जायला सुरुवात केली की, ज्या ज्या गोष्टी समोर यायला लागतात, त्यात वसंतदादांचे सरकार पाडण्यापासून अनेक गोष्टी येत जातात. आपल्या कोअर मतदाराला गृहित धरण्याचे किंवा निवडणुकीनंतर आगळीक करण्याची उदाहरणे पवारांइतकी अन्य कुणाचीही नाहीत. असे असताना पवार जेव्हा म्हणतात की, “बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” तेव्हा त्यामागचे वास्तव काही निराळेच असते. कारण, आता पवार घराण्यातही थोरली, धाकली पात आहे आणि या दोन्ही पातींचे राजकीय वारसही तयार आहेत. जी गडबड आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झाली, तीच गडबड पवार कुटुंबीयांमध्ये विधानसभेच्या वेळीही होणार यात शंका नाही. पवार कुटुंबीयांपैकी यापूर्वी न ऐकलेली नावे विधानसभा लढविण्यासाठी पुढे येतीलच. पार्थ पवार जिंकले तरी आणि हरले तरीही राष्ट्रवादीसमोर अनेक प्रश्न असतील. हरले तर पवार कुटुंबीयांपैकी कोणी हरू शकतो, असा संदेश खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जाईल, जो पवारांना परवडण्यासारखा नक्कीच नसेल. ही भावना येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने पवारांच्या नेतृत्वासमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जाईल आणि पार्थ पवार जिंकले, तर मात्र पार्थ आणि अजितदादा मिळून पवार व सुप्रिया यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे करतील. काका-पुतण्या राजकारणाची महाराष्ट्रातील अन्य उदाहरणे पवारांना लागू नसल्याची जी चर्चा होते, ती मग पवारांच्या बाबतीतही सुरू झाल्याचे महाराष्ट्राला पाहायला मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@