जुहू किनाऱ्यावर सूक्ष्म जीवांची निळी चादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |



'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स''ची ( नोक्टीलिका) अमर्यादित वाढ सागरी परिसंस्थेला घातक

मुंबई : मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर सद्या रात्री निळी चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) या सूक्ष्म समुद्री जीवांमुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरला आहे. मात्र या जावांची अमर्यादित वाढ सागरी परिसंस्थेला घातक असून त्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत सागरी अभ्यासकांनी मांडले आहे.

 

जुहू किनाऱ्यावर शनिवारी मध्यरात्री समुद्रांच्या लाटांवर निळा प्रकाश पसरल्याचे दिसले. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' या सूक्ष्म जीवांच्या शरीरामधून निघाणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटांवर निळा रंग पसरला होता. जुहू जेट्टीजवळ शनिवारी मध्यरात्री साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास या जीवांमुळे निर्माण झालेला निळा प्रकाश लाटांवर दिसल्याची माहिती जुहू कोळीवाडा येथील मच्छीमार सुमित गंभीर यांनी दिली. मात्र या जीवांचे दर्शन मुंबईत पहिल्यांदाच झालेले नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये याचठिकाणी हे जीव मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी दोन ते तीन दिवस हा निळा प्रकाश लाटांवर दिसत होता. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हे जीव मोठ्या प्रमाणात किनाऱ्यापट्टीनजीकच्या भागात येतात. या जीवांना धोका जाणवल्यास ते आपल्या शरीरातून चकाकणारा निळा प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरतो.

 

मात्र हे जीव सागरी परिसंस्थेला घातक असल्याचे सागरी अभ्यासक सांगतात. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' मोठ्या संख्येने किनारपट्टीक्षेत्रात येत असल्याने ते माशांचे अन्न असणाऱ्या 'फायटोप्लॅन्कटन्स' आणि 'डिऍटॉम्स' मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे अन्नाच्या अभावी त्या क्षेत्रात माशांची संख्या कमी होत असल्याची माहिती सागरी अभ्यासक स्वप्निल तांडेल यांनी दिली. शिवाय हे जीव मृत पावल्यानंतर अमोनिया निर्माण होऊन पाणी आम्लयुक्त होते. या आम्लयुक्त पाण्यामुळे माशांचाही मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबादच्या 'इंडियन नॅशनल सेंटर फाॅर आॅशन इन्फाॅर्मेशन सर्विस' आणि अमेरिकेच्या 'नॅशन आॅशन अॅण्ड़ ऍटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन' (एनओएए) या दोन्ही संस्थांमधील शास्त्रज्ञांंनी मिळून अरबी समुद्राचा अभ्यास केला. गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासाच्या अहवालामध्ये अरबी समुद्रात वाढणाऱ्या 'बायोलूमिनेसेन्ट अॅल्गे'मुळे (नोक्टीलिका) मासे मरत असल्याची नोंद करण्यात आली होती.


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@