लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |


९१ मतदारसंघांत उद्या मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज मंगळवारी सायंकाळी संपला. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला २० राज्यांतील ९१ मतदारसंघांत मतदान होणार असून, यात विदर्भातील सात जागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी तसेच गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अनेक उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे.

 

पहिल्या टप्प्यातील मतदानात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया तसेच यवतमाळ-वाशीम या ७ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी भाजप तसेच काँग्रेस यांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघांत १२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात मुकाबला होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने निवडणुकीत रंगत आणली आहे.

 

आंध्र प्रदेशातील २५ लोकसभा मतदारसंघात होणार्या निवडणुकीत ३१९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तेलंगणातील १७, तर उत्तर प्रदेशातील ८ लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आज संपला. उत्तराखंड आणि आसाममधील प्रत्येकी पाच, तर ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघातही गुरुवारी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबत काही राज्यांत विधानसभा निवडणुकाही होत आहेत. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारही आज संपला. ओडिशा विधानसभेच्या १४७ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला २८ मतदारसंघांत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@