आंतरशालेय स्पर्धांचे पारितोषिक वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |



चेंबूर एज्युकेशन सोसायटी शाळेचा सिंहाचा वाटा



बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे खाजगी, अनुदानित, विना-अनुदानित प्राथमिक शाळांसाठी ‘आंतरशालेय पारितोषिक वितरण समारंभ’ नुकताच आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेंतर्गत असलेल्या शाळांसाठी वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट शाळा’ तसेच शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वन मिनिट गेम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळांमधील ज्येष्ठ आणि गुणवंत कर्मचारी स्पर्धा, लेखापाल स्पर्धाही होत्या.
 
वर्षभर चालणार्‍या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम दि. २७ मार्च रोजी चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशस्वी शाळेला, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. तसेच ज्या शिक्षकांना महापौर किंवा राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली होती, त्यांचाही सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. मुंबईतील सर्वच शाळांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांची दिवसभराची व्यवस्था कार्यक्रमासंबंधीचे नियोजन, जसे कार्यक्रमाच्या जागेची उपलब्धता, बसण्याची व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्था, उपस्थितांचे स्वागत आणि इतर व्यवस्था या सार्‍यांची चोख व्यवस्था मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेने केली होती. दिवसभराच्या कार्यक्रमाविषयी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे म्हणाले की, ”या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी चेंबूर एज्युकेशन सोसायटीने घेतली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चेंबूर शाळेत बृहन्मुंबई पालिकेच्या सरकारी आणि खाजगी अशा ९७ शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे एकत्रिकरण म्हणण्यापेक्षा एक वैचारिक स्नेहसंमेलन झाले. मुंबई शहरामधील मराठी शाळांची स्थिती, प्रश्न तसेच शाळांमधील स्वतंत्र चालणारे उपक्रम यासंदर्भात अत्यंत मोकळेपणाने माहिती मिळवून देणारे हे आयोजन होते. मराठी शाळा टिकाव्यात, यासाठी काय करावे यासाठीही हा कार्यक्रम महत्त्वाचा होता.”

 

वर्षा गांगुर्डे म्हणाल्या की, “मराठी शाळा यशस्वीरीत्या टिकणे ही आजची गरज आहे. तसेच शाळांमधील सर्वच व्यवस्थांची गुणवत्ता आणखीन उत्तम व्हावी, यासाठी ही प्रशासन कार्यरत आहे. यासाठी शाळेतील शिक्षकांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. वर्षभर चालणार्‍या स्पर्धांच्या माध्यमातून मराठी शाळेसाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी तयार झाली. त्याचे उत्तम फलित म्हणजे २७ मार्च रोजी चेंबूर एज्युकेशन सोसायटी शाळेमध्ये झालेला पारितोषिक वितरण कार्यक्रम होता.” यावेळी मंगेश सातमकर (अध्यक्ष, शिक्षण समिती), मिलिंद भागवत (पत्रकार), महेश पालकर (शिक्षणाधिकारी), कीर्तिवर्धन किरतकुडवे (उपशिक्षणाधिकारी), बापू मोरे (अधीक्षक), वर्षा गांगुर्डे (बिट ऑफिसर), अविनाश तांबे (अध्यक्ष, चेंबूर एज्युकेशन सोसायटी) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे वर्षा गांगुर्डे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. चौकटीतील कामाच्या पलीकडे जाऊन वर्षा गांगुर्डे यांनी अफाट मेहनत घेत या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@