‘मिसाईल वुमन ऑफ इंडिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |


भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पांच्या प्रमुखपदावर काम करणार्‍या डॉ. टेसी थॉमस या इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचणार्‍या पहिल्या महिला आहेत. त्यांच्याविषयी...

 

अग्निपुत्र’ किंवा ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ कोण, असा प्रश्न विचारताच साहजिकच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव आठवते. मात्र, भारताची ‘अग्निपुत्री’ वा ‘मिसाईल वुमन ऑफ इंडिया’ अशी ओळख असणार्‍या डॉ. टेसी थॉमस यांचाही प्रवास भारतीयांसाठी तितकाच प्रेरणादायक आणि अभिमानास्पद आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन शक्ती’ची घोषणा केली. अवकाशात ३०० किमी अंतरावर असणार्‍या उपग्रहाला भेदण्याची ताकद ‘मिशन शक्ती’मुळे भारताला प्राप्त झाली. यासाठी गेली नऊ वर्षे भारताकडून ‘ए सॅट’ या क्षेपणास्त्रावर १०० हून अधिक शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत होते. डीआरडीओच्या यापूर्वीच्या ‘अग्नि,’ ‘पृथ्वी,’ ‘धनुष,’ ‘त्रिशुल,’ ‘ब्रह्मोस’ आदी क्षेपणास्त्र प्रकल्पांसाठी काम करणार्‍या ४९ वर्षीय डॉ. टेसी थॉमस या डीआरडीओमध्ये कार्यरत असून एक आदर्श गृहिणीही आहेत. भारताला संरक्षण क्षेत्रात सक्षम करण्यात त्यांचा वाटा मोलाचा मानला जातो.

 

केरळच्या अलापुडा या ‘इस्टर्न व्हेनिस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका निसर्गरम्य गावात एप्रिल १९६३ मध्ये टेसी थॉमस यांचा जन्म झाला. मदर तेरेसा यांच्या नावावरून त्यांचे नाव ‘टेसी’ ठेवण्यात आले. अभ्यासासह खेळ आणि इतर गोष्टींमध्येही टेसी हुशार होत्या. शाळेतील विविध स्पर्धांमध्ये जिंकलेली पारितोषिके आनंदाने घरच्यांना दाखवण्यासाठी घेऊन येणार्‍या टेसी सार्‍यांच्याच लाडक्या होत्या. अभ्यासातील हुशारीमुळे त्यांना खेळासाठी तसे फारसे कोणी रोखले नाही. टेसी उत्तम बॅडमिंटन खेळायच्या. बॅडमिंटनमध्ये बक्षीस मिळवू लागल्यावर करिअरही याच क्षेत्रात करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कालांतराने हे खेळाचे वेड मागे पडले. शाळेत असताना त्यावेळी अमेरिकेचे ‘अपोलो’ हे यान चंद्रावर उतरणार होते. त्यावेळी मिळालेली या यानाबद्दलची माहिती टेसी यांचे अंतराळाबद्दलचे कुतूहल निर्माण करणारी ठरली. मात्र, त्याकाळात डॉ. विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांनी पाहिलेले क्षेपणास्त्र सज्जतेचे स्वप्न डॉ. टेसी थॉमस पूर्ण करतील, अशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नसेल.

 

त्रिशुर अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रातील शिक्षणासाठी पुण्यात दाखल झाल्या. याच दरम्यान आयएएसच्या परीक्षेची तयारीही टेसी यांनी सुरू केली होती. या परीक्षेतही त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. कुठल्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याला असे यश म्हणजे गगन ठेंगणे असते. मात्र, टेसी यांच्या बाबतीत विधीलिखित काहीसे वेगळे होते. ‘डीआरडीओ’मध्ये त्यांनी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांची निवड झाली. मात्र, आठड्याभरात रूजू व्हा, अशी अटही त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. या क्षेत्राची निवड करणे तसे धाडसाचे काम होते. कारण, या संस्थेमध्ये आणि या कामात पुरुषांची आधीपासूनच मक्तेदारी होती. मात्र, हेच क्षेत्र निवडावे हा निर्धार त्यांनी केला.

 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट ऑफ टेक्नोलॉजी, पुणे येथे एम.टेक पूर्ण केल्यानंतर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांची ‘अग्नि’ या क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी निवड केली. क्षेपणास्त्राचे लक्ष्य भेदण्यासाठीचे मार्गक्रमण व लक्ष्य कसे अचूक भेदता येईल, यावर डॉ. टेसी यांनी काम केले. मेघगर्जनेसारखा आवाज करत तीन हजार अंश तापमानात लक्ष्य भेदणार्‍या ‘रिएन्ट्री व्हेईकल सिस्टीम’ या प्रणालीचीही निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन त्यांना डीआरडीओकडून आणखी जबाबदार्‍या देण्यात आल्या. यात ‘अग्नि २,’ ‘अग्नि ३,’ ‘अग्नि ४,’ ‘अग्नि ५’ आदी क्षेपणास्त्रांची कामे यशस्वीपणे मार्गी लावणार्‍या या रणरागिणीला ‘मिसाईल वुमन ऑफ इंडिया’ वा ‘अग्निपुत्री’ म्हणून ओळख मिळाली. सध्या त्या ‘अग्नि ६’ या महत्त्वाकांशी प्रकल्पावर काम पाहत आहेत. भारतीय सुरक्षादलांना अणवस्त्रांनी सुसज्ज करण्यामागील चेहरा टेसी या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आपले गुरू मानतात. त्यांमुळे गुरूंसारखे ‘मिसाईल वुमन’ असे टोपण नाव त्यांना मिळाल्याचा अभिमान टेसी यांना आहे. कलाम आणि टेसी यांच्या या कामगिरीमुळे भारत क्षेपणास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी बनला आहे.

 

पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट ऑफ टेक्नोलॉजी येथे एम. टेक करत असताना त्यांची ओळख सरोज कुमार पटेल यांच्याशी झाली. सरोजकुमार या सहकारी मित्राशी भावबंध जुळले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आंतरधर्मीय विवाह असूनही घरच्यांनी त्यांना स्वीकारले. इतक्या वर्षांच्या सुखी संसारानंतर पटेल दाम्पत्याने आपल्या क्षेत्राइतकाच वेळ संसारालाही दिला. सरोजकुमार सध्या नौदलात प्रमुखपदावर आहेत. त्यांचा मुलगा तेजस हा अभियंता आहे. भारतीय लढाऊ विमान ‘तेजस’ याच्या नावावरूनच ठेवल्याचे डॉ. टेसी यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते. संसार आणि करिअर अशी तारेवरची कसरत करत असताना कामाचा दर्जा त्यांनी तसूभरही कमी होऊ दिलेला नाही.

 

इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनतर्फे त्यांना घर आणि करिअर सांभाळणार्‍या उत्तम महिला म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यांच्या भारताच्या संरक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘लालबहादूर शास्त्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’द्वारे आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना भारताचे ‘वैज्ञानिकरत्न’ म्हणून संबोधित केले होते. याशिवाय ‘कल्पना चावला पुरस्कार,’ ‘सुमन शर्मा पुरस्कार,’ ‘इंडिया टुडे वुमन ऑफ दी इअर’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@