राहुलची निवृत्तीकथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |


 


तरुण रक्ताला संधी देण्याचे राहुल गांधींनी एवढेच मनावर घेतले असेल तर मग मध्य प्रदेश व राजस्थान या दोन्हीही राज्यात तशी संधी होतीच की! मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला मुख्यमंत्रिपदी बसविण्याऐवजी कमलनाथांना का लादले गेले? तीच स्थिती राजस्थानचीही.


पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारण्यांच्या निवृत्तीचे वय ६० इतके असावे, असे वक्तव्य केले. वस्तुतः राजकारण्यांना वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे आपल्या उभ्या-आडव्या पसरलेल्या देशात सर्वत्रच पाहायला मिळते. एकदा राजकारणात प्रवेश केला की, संबंधित व्यक्ती अखेरच्या श्वासापर्यंत ‘जनसेवेसाठी दिधले अवघे जीवन’ म्हणत खुर्चीला, पदाला चिकटून बसल्याचा अनुभव सामान्यजनांना नेहमीच येतो. राहुल गांधींना हेच चित्र बदलावेसे वाटत असेल, तर त्याचे नक्कीच स्वागत केले पाहिजे. परंतु, राहुल गांधी आणि काँग्रेसची सध्याची अवस्था अशी आहे की, घरात अंधार आणि बाहेर फडफडती पणती! कारण राहुल गांधींना खरोखरच ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे वाटत असेल तर पोराचे करिअर मार्गी लागावे म्हणून सोनिया गांधी अजूनही कशाला उठाठेवी करताना दिसतात, याचे उत्तर द्यावे. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या उरलेल्या सांगाड्यात आज सर्वत्र ज्येष्ठांचीच गर्दी झालेली दिसते. तरुण रक्ताला संधी देण्याचे राहुल गांधींनी एवढेच मनावर घेतले असेल तर मग मध्य प्रदेश व राजस्थान या दोन्हीही राज्यात तशी संधी होतीच की! मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला मुख्यमंत्रिपदी बसविण्याऐवजी कमलनाथांना का लादले गेले? तीच स्थिती राजस्थानचीही. तिथेही अशोक गहलोत यांच्याऐवजी सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदी बसवले असते तर राहुल गांधींची खरोखरच काही क्रांतिकारी पाऊल उचलण्याची मानसिकता असल्याचे स्पष्ट झाले असते. परंतु, आता या तरुणांना संधी दिली अन् हेच नेते आपल्यापेक्षा लोकप्रिय झाले तर? ही भीती राहुल गांधींपासून सोनिया गांधींनाही सतावू लागली, म्हणून सिंधिया वा पायलटांसारख्या तरुण तुर्कांऐवजी म्हाताऱ्या अर्कांना राज्यशकट ओढण्यासाठी खुर्च्या दिल्या गेल्या. अर्थात या नेत्यांनाही केवळ ज्येष्ठत्वामुळेच या गोष्टी मिळाल्या असेही नाही, कारण काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची गुलामगिरी जो अधिक इमानदारीने अन् निष्ठेने निभावेल त्याच्याच डोक्यावर सत्तेचा मुकुट बसवला जातो, हा इतिहास आहे, जो इथेही लागू पडतोच.

 

दुसरीकडे काँग्रेसमध्ये आज तरुणांची वानवा असल्याचे पदोपदी जाणवते. कारण पक्षात नवे नेतृत्व उभेच राहू दिले जात नाही. उलट असे कोणी काही पुढारलेपण करायला लागले तर संबंधित व्यक्तीला अपमानकारक वागणूक देण्यालाच, युवा नेतृत्वाचे खच्चीकरण करण्यालाच प्राधान्य दिले जाते. वाय. एस. आर. रेड्डी या दक्षिणेतील नेत्याचे उदाहरण याचा चांगला नमुना म्हणता येईल. म्हणूनच पक्षात त्याच त्या चेहऱ्यांनी वर्षानुवर्षे निरनिराळी अधिकारपदे अडवल्याचे दिसते. मनमोहन सिंग, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, मणिशंकर अय्यर, वीरप्पा मोईली, ए. के. अ‍ॅन्टनी, कॅप्टन अमरिंदर सिंग, व्ही. नारायणस्वामी, दिग्विजय सिंग अशी ही यादी कितीही मोठी होऊ शकते. आता राहुल गांधींचे म्हणणे मान्य केले तर या सगळ्यांचेच राजकीय भवितव्य गारद होऊ शकते. तसेही काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबीयांचे आदेश शिरसावंद्य मानण्याची प्रथा आहे, त्यामुळे राहुल गांधींनी फक्त शब्द उच्चारण्याचा अवकाश की, हे सगळेच ज्येष्ठ नेते आपणहून सक्रिय राजकारणाचा त्याग करतील! शिवाय ही सगळी मंडळी राजकारणातून हद्दपार केली रे केली की, काँग्रेस पक्ष चालविण्यासाठी आवश्यक ते नेतृत्वगुण आपल्यात असल्याचेही राहुल गांधींना अगदी ठसठशीतपणे दाखवून देता येईल. राहुल गांधींकडे तितकी हिंमत आहे का, एवढेच आता पाहायचे. राजकीय नेतृत्वाच्या वयाबद्दलचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. भारतात सर्वसाधारणपणे ६० व्या वर्षी राजकारण कळू लागते, असा एक समज आहे. कदाचित यामुळेच विविध पक्षांत ६० किंवा त्यापुढील वयाच्या व्यक्ती या महत्त्वाच्या पदांवर विराजमान झालेल्या दिसतात. अधिक वयाची माणसे आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रगल्भपणे निर्णय घेऊ शकतात, ही भावनाही त्यामागे असू शकते. परंतु, राहुल गांधींना हे वास्तव माहीत असल्याचे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी असे वक्तव्य केले असावे.

 

आणखी एक म्हणजे ६० पेक्षा अधिक वयाचे नरेंद्र मोदी निवृत्त होतील आणि आपणच पंतप्रधानपदी बसू, असाही आनंददायी विचार राहुलच्या मनात चमकून गेला असेल. इथे राहुल गांधींचा दुटप्पीपणाही आपल्या लक्षात येतो, तो म्हणजे त्यांनी भाजपवर केलेली टीका. एका बाजूला राजकारणात निवृत्तीसाठी ६० इतके वय असले पाहिजे, असे म्हणायचे आणि भाजपने तशी काही कृती केली की त्यावरून आरोपाची राळ उडवायची, असा कित्ताच राहुलनी गेल्या काही काळापासून गिरवला. भाजपने गेल्याच लोकसभा निवडणुकीवेळी सक्रिय राजकारणासाठी ७५ इतकी वयोमर्यादा घालून दिली व त्याची अंमलबजावणीही अगदी कठोरपणे केली. यंदाही भाजपने आपल्या याच भूमिकेवर ठाम राहत नवीन चेहऱ्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय घेतला, तर राहुलना तिथेही भाजपविरोधात तोंड चालवण्याची हुक्की आली. एखाद्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टींवर खरे तर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला काही बोलण्याची आवश्यकताच नाही. पण उचलली जीभ अन् लावली टाळूला असे करतच ज्यांचा गाडा चालू आहे ते तसे करणारच. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे राजकारणाची कूस बदलणारे आधुनिक, पुरोगामी निर्णय घेतले ते भाजपने, पण त्यावर टीका केली कोणी तर राहुल गांधींनी. अन् आता तेच राजकारण्यांच्या निवृत्तीचे वयही ठरवायला लागले. यालाच आपण काय बोलतो, कसे वागतो याचे भान नसणे म्हणतात. अर्थात सगळ्याच गोष्टीचे ताळतंत्र सोडलेला इसम असेच दोन तोंडांनी बोलणार म्हणा! आता अशा या दोन्ही डगरींवर पाय ठेवणाऱ्या, निवृत्तीच्या संदर्भात दोन दोन कथा सांगणाऱ्या इसमाला घरी बसवायचे की, आणखी कुठे, हा निर्णय मतदारांनीच घ्यायला हवा, इतकेच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@