धक्कादायक! वैद्यकीय दाव्यांमुळे कोलगेट, सेन्सोडाईनवर कारवाई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019
Total Views |



ठाणे : वैद्यकीय दावे करणाऱ्या कोलगेट आणि सेन्सोडाईन या ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई केली आहे.या ब्रॅण्ड्सने केलेल्या वैद्यकीय दाव्यांनी लोकांची दिशाभूल केली जात असल्याने सुमारे साडेचार कोटीचा माल प्रशासनाकडून जप्त केला गेला आहे.

 

कशामुळे केली गेली कारवाई ?

 

औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याअंतर्गत ‘टूथपेस्ट’ या उत्पादनाला ‘सौंदर्यप्रसाधने’ या वर्गाखाली परवाना दिला जातो. त्यामुळे या टूथपेस्टना वैद्यकीय प्रमाणित किंवा संवेदनशील दातांसाठी सुरक्षित असा दावा करण्याची कायद्याने परवानगी नाही. सौंदर्यप्रसाधने म्हणून परवानगी दिलेली असताना वैद्यकीय दावे करणे कायद्याचे उल्लंघन केल्याने ही कारवाई झाल्याचे समोर येते आहे. डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या काही विशिष्ट टूथपेस्टना ‘औषधे’ म्हणून प्रमाणित केले जाते. त्यांनाच असा दावा करण्याची परवानगी आहे.

 

‘ग्लॅस्को स्मिथलाईन कन्झ्युमर (जीएसके) हेल्थ लिमिटेड’च्या ‘सेन्सोडाईन विथ फ्लुराईड’, ‘सेन्सोडाईन फ्लुराईड फ्रेश जेल’ या दोन उत्पादनांचा सुमारे ४ कोटी २७ लाखांचा माल जप्त करण्यात आला. या उत्पादनांच्या वेष्टनावर दुरुस्ती आणि संरक्षण, संवेदनशील दातांना दररोज संरक्षण, वैद्यकीयदृष्टय़ा प्रमाणित असे दावे केलेले आढळले. एकूण ४ कोटी ६९ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती ठाणे, कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनिकर यांनी दिली.

 

कोलगेटची सेन्सिटिव्ह टुथपेस्ट द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्टसने ठरवून दिल्याप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाने नेमून दिलेल्या दर्जाची पूर्तता करत आहे. दाव्याशी निगडित कागदपत्रे, कायदेशीर परवाना इत्यादी माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिलेली आहे. प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करत आहोत, असे कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@