दुसरा मोदी? नको रे बाबा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019   
Total Views |



काही दिवसांपूर्वी तर माढ्यातून ‘पाडा, पाडा’चे आवाज आले होते. मनात आणि डोळ्यासमोर एकच दृश्य दिसत होते. ते असे की, बारा वाजलेल्या घड्याळांना बंद इंजिनाने, मनगट नसलेल्या पंजाने टेकू दिला आहे, आजूबाजूला छोटेमोठे पक्ष आपल्या ऐपती आणि लायकीप्रमाणे चिकटले आहेत आणि या साऱ्यांच्या धडपडीतून कमळ फुलले आणि हे सगळे करणारा कोण तर माझी करंगळी धरून राजकारणात येणारा माणूस. पंतप्रधानपदाची स्वप्न बघण्यात माझी हयात गेली पण, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान म्हणाले की, माझी करंगळी पकडून ते राजकारणात आले. ते काय बोलले ते खरेच आहे, असा माझा तरी समज आहे. या समजाने मला इतकी हुशारी येते की सांगता सोय नाही. आता काही जळणारे लोक म्हणतात की, मोदी रा. स्व. संघाच्या आदर्शवादावर चालतात. त्यामुळे मोदींना विश्वासघात करण्याची, पाठीवर वार करण्याची हौस नाही. जाऊ दे.. हो, पण आता दुसरा मोदी तयार होऊ नये, याची मी काळजी घेतोय. कारण माझ्या करंगळीच्या स्पर्शाने राजकारणात आलेला पंतप्रधान माझा अजेंडा राबवत नाही म्हणजे काय? मी सत्तेत असताना देशावर दहशतवाद्यांचे किती हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले. मी त्यावेळी हातावर हात ठेऊन बसलो. पण माझ्यामुळे राजकारणात आलेला हा पंतप्रधान आता दहशतवाद्यांना खुलेआम तेही कायद्याच्या राज्याच्या साथीने मारत सुटला आहे. आमच्यावेळी लोक आमची आणि डॉनच्या मैत्रीची कुजबुज करायचे. पण आताचा पंतप्रधान तर डॉनबिनला तर सोडाच त्याला वाचवणाऱ्या, पोसणाऱ्या पाकिस्तानलाच झोडपतोय. ते पण त्याच्या घरात घुसून. मग तुम्हीच सांगा, याला काय माझे शिष्य म्हणावे? आणि म्हणे माझी करंगळी पकडून राजकारणात आला. बरं, मी कसा घरातच निवडणुकीची तिकिटं वाटतो, तो तर पंतप्रधान असूनही त्याला कसलाच मोह नाही. पुण्याची जहागिरी आमच्या ताब्यात होती तर आम्ही लवासाची राजधानी उभारली आणि याच्या ताब्यात सगळा देश आहे. पण हा स्वतःला चौकीदार समजतो. आता हा चौकीदार झाला म्हणून माझा पुतण्या त्याच्या विशिष्ट करामतीने धरण पण भरू शकत नाही आणि मी पुन्हा लवासा उभा करू शकत नाही. नकोच रे बाबा, दुसरा मोदी तयार व्हायलाच नको.

 

काकांचा बाहुला

 

कोणी युती करतो का युती?,म्हणत गेल्या निवडणुकीत कुणा कुणाला टाळ्या दिल्या, टाळ्या मागितल्या, कुणाकुणाचे गोडवे गायलो. कसल्या कसल्या नकला करून भाषणाचे फड गाजवले. लाखो लोक यायचे. राजाला साथ द्या, साथ द्या असे अख्खा महाराष्ट्र गुणगुणत आहे, असे मला तेव्हा वाटले होते. पण लोकांनी साथ दिली नाहीच वर मतदानपेटीत शून्य मत देऊन सत्तेतून हाकलविण्यासाठी लाथ तर मारली नाही ना, असे वाटले. आता जरा ट्रेंड बदलला. तर लोक बोंबलायला लागले. त्यांना माहिती नाही का की, माझी निशाणी इंजिन आहे. ते इंजिन मी कुठेही जोडेन. घड्याळाला, पंजाला, अगदी कपबशी का काय तिलाही जोडेन. माझी मर्जी. गेल्या वेळी इंजिनाची शिट्टी कमळ कमळ म्हणून आवाज देत होती. यावेळी घड्याळ-पंजा, पंजा-घड्याळ असा आवाज देते आहे. त्यात काय चुकलं? राजकारणात हे चालायचेच. माझे गुरुवर्य काका. अहं, मातोश्रीवाले काका नाहीत तर बारामतीकर काका त्यांचाच तर हा गुरुमंत्र. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतोय. काल काय बोललो ते आज नाही आणि आज काय बोललो ते उद्या नाही. आता मला पुण्याला, मावळला, नांदेडला सगळीकडे जायचे आहे. पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांची अख्खी फौज मी तैनात केली आहे. त्यांना काय, मुकी बिचारी हाका कुणीही. काही लोक म्हणतात की, कार्यकर्ते काय मेंढरे आहेत का? की तुमच्या तालावर कशीही आणि कधीही बेअक्कलपणे नाचायला. म्हणू देत लोकांना. पण मी घेतला वसा टाकणार नाही. काय म्हणता टोकन नाही घेतलं मी, वसा म्हणतोय वसा. लोकांना पण ना वाटते की, मी प्रत्येक गोष्टीमध्ये टोकन घेतो. काल परवा काही लोक म्हणत होते, “साहेब तुम्ही भाषण चांगले करता. काकांच्या नातवाला वाचून पण भाषण करता येत नाही. तुम्ही त्याच्या पाठीमागे लपून भाषण कराल का हो? तो फक्त तोंड हलवेल.” ही सुद्धा आयडिया तशी बेस्टच. कारण कमळवाल्यांच्या समोर जो कोणी तगडा उमेदवार असेल, त्यालाच आम्हाला निवडून द्यायचे आहे. तसेही आता माझे भाषण, त्यातले विचार आणि शब्द तर मावळच्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या नातवाच्या आजोबांचेच आहेत. मी काय बोलावे, काय करावे याची चावी बारामतीच्या काकांकडेच आहे. मी काकांचा बाहुला..

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@