दलित जीवनाचे भाष्यकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2019   
Total Views |



ज्येष्ठ दलित साहित्यिक शंकरराव खरात यांची आज पुण्यतिथी. शंकररावांच्या लेखनाची, कथा-कादंबऱ्यांची माहिती बहुतेकांना असेलच, पण त्यापलीकडचे शंकरराव जाणून घेऊयात...


आज ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांची पुण्यतिथी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दलित जीवनाचे भाष्यकार, कथाकार व लेखक अशी त्यांची ओळख. त्यांचा जन्म ११ जुलै, १९२१ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी या खेडेगावात झाला. मराठी साहित्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. एका महार कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव यांनी मारलेली मजल ही वंचित घटकातील अनेकांना प्रेरणा देण्याचे काम करून गेली. म्हणूनच त्यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त आजच्या ‘माणसं’ या सदरात त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. आटपाडीच्या एका महार कुटुंबात शंकररावांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामा महार हे गावाचे वतनी महार म्हणून काम पाहायचे. पूर्वीच्या काळी असलेली विषमता त्यांच्याही पाचवीला पुजलेली होती. ते महार जातीचे असल्याने त्यांना अस्पृश्यतेचे चटके खावे लागले होते. अस्पृश्यतेच्या सावटाखाली असतानाही ते गावातील शाळेत शिकू लागले. गावात चौथीपर्यंत शाळा होती, जी कलेश्वराच्या मंदिरात भरायची. येथूनच त्यांनी आपले चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची आवड असल्याने मॅट्रिकचे (अकरावी) शिक्षण घेण्यासाठी ते औंधला गेले, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पूर्ण केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, सामाजिक विषमतेचे चटके त्यांना लहानपणापासून बसले होते. त्याकाळी महारांवर चॅप्टर केसेस लावल्या जायच्या. मात्र, या केसेस लढवण्यासाठी महारांकडे वकील नसायचा किंवा वकिलाला देण्याइतपत त्यांच्याकडे पैसा नसायचा. आपल्या बांधवांची ही विदारक अवस्था ते लहानपणापासून पाहत आले होते. आपण आपल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि याच भावनेतून त्यांनी १९४७-४८ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण करत वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दलित व गरिबांवरचा अन्याय त्यांना पाहवत नव्हता. यामुळे त्यांच्यावर चालवल्या जाणाऱ्या खोट्या केसेस शंकरराव अत्यल्प खर्चात किंवा मोफत लढत असत.

 

शंकररावांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक प्रभाव होता. त्यांच्या प्रभावामुळे त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली. आपली आवड आणि आपल्या व्यवसायाची सांगड घालत, ते वकिली व्यवसायामार्फत समाजसेवा करू लागले. याच काळात त्यांचा ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, विमुक्त भटक्यांच्या संघटनांशी संपर्क आला. उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अशा संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढत गेला. त्यांचे सेवाभूमिक काम उपेक्षितांच्या मनात घर करून गेले. विद्यार्थी दशेत असताना त्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला होता. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले शंकरराव उपेक्षितांचे प्रश्न सोडवत असताना बाबासाहेबांच्या विचारांचाही प्रसार करू लागले. शंकररावांचे कार्य उपेक्षितांपुरते मर्यादित राहिले नाही, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांना ‘सायक्लोस्टाईल’ केलेली पत्रके ठरलेल्या खासगी जागी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या संघटनेत काम करता करता त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग वाढत गेला. कामगार चळवळ व उपेक्षितांसाठीच्या अनेक संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध पदे भूषवली. सामाजिक चळवळीत कार्यरत असताना दलित जीवनावर आधारित कथा, कादंबऱ्या त्यांच्या वाचनात येऊ लागल्या. मात्र, हे लिखाण आपण अनुभवलेल्या व पाहिलेल्या दलितांचे जीवन नसून आपण वाचलेले लिखाण कृत्रिम असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे खरे दलित जीवन काय आहे? त्यांचे प्रश्न काय आहेत? हे आपण आपल्या लिखाणातून उतरवायचा त्यांनी निर्धार केला. यानंतर १९५६-५७ मध्ये ‘नवयुग’ दिवाळी अंकात त्यांची ’सतूची पडिक जमीन’ ही पहिली कथा प्रकाशित झाली. आपल्या पहिल्याच कथेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांची १९५७-५८ साली ’माणुसकीची हाक’ ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी प्रकाशित झाली आणि गाजलीही. यानंतर साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले आणि तेव्हापासून त्यांची साहित्यसाधना अखंडपणे चालू राहिली.

 

‘आज इथं तर उद्या तिथं,’ ‘आडगावचे पाणी,’ ‘गावचा टिनपोल गुरुजी,’ ‘गाव-शीव,’ ‘झोपडपट्टी,’ ’टिटवीचा फेरा,’ ‘तडीपार,’ ‘दौण्डी,’ ‘फूटपाथ नंबर १,’ ‘बारा बलुतेदार,’ ‘मसालेदार गेस्ट हाऊस,’ ‘माझं नाव,’ ‘सांगावा,’ ‘सुटका,’ ‘हातभट्टी’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली, तर ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र लिहिले. यासोबतच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य व डायरेक्टर, बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स सिलेक्शन कमिटी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, रेल्वे सर्व्हिस कमिशन, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे सदस्य इ. महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून १० जानेवारी, १९७५ला मराठवाडा, विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यासोबतच १९८४ साली जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. अशा या बहुरंगी व्यक्तिमत्वाची प्राणज्योत ९ एप्रिल, २००१ रोजी मालवली. त्यांच्या अफाट कार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’चा प्रणाम!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@