झुंड आणि तिची भीती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019
Total Views |


 


असहिष्णुतेच्या ज्या गोष्टी हे सांगतात, त्याच्यापेक्षा कितीतरी भयावह गोष्टी या देशाच्या इतिहासात घडल्या आहेत. शिखांचे हत्याकांड असो, काश्मिरी हिंदूंची ससेहोलपट असो, गोध्रात रेल्वे जाळण्याचा प्रकार असो, यातील किती लोकांनी यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली आहे?


देशभरातल्या ६०० कलाकारांनी आपला एक मोर्चा उघडला आहे. अमोल पालेकर, गिरीश कर्नाड आणि नसिरुद्दीन शहा यांसारखे कलाकार यात अग्रस्थानी आहेतच. पण, अन्य मंडळींनीही या प्रवाहात येऊन स्वत:ला पावन करून घेतले आहे. या मंडळींचे नेमके दुखणे काय, असा प्रश्न जर का तुम्ही त्यांना विचारला, तर त्याचे नेमके उत्तर कुणीही देऊ शकणार नाही. आजच्या ज्या भारताचे वर्णन ही मंडळी करीत आहेत, तो भारत हे लोक सोडले तर कुणालाही दिसत नाही. अत्यंत सृजनशील असलेल्या या मंडळींनी आपल्याभोवती एक बागुलबुवा उभा केला आहे. या बागुलबुवाला मोदीद्वेषाचा बुरखा चढविला आहे आणि त्याचे ताबूत ठिकठिकाणी नाचविले जात आहेत. विश्वास पाटील नावाचे एक प्राध्यापक होऊन गेले. त्यांनी ‘झुंडीचे मानसशास्त्र’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या सगळ्यांकडे पाहिले की, त्या पुस्तकाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. वर ६०० लोकांच्या गर्दीतला प्रकार हा ‘हिस्टेरिया’च असला तरी त्यांचे म्होरके मात्र बनेल आणि राजकीयच आहेत. लोकशाहीत राजकीय असण्याला हरकत नाही, पण स्वत:ची राजकीय मते पटविण्यासाठी किंवा एका विशिष्ट राजकीय पक्षाची भलावण करण्यासाठी असले बुरखे पांघरले जातात, तेव्हा त्यावर टीका केलीच पाहीजे. ‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने सुरू असलेली ही चळवळ मतदारांवर किती प्रभाव टाकू शकते, हे येणारी निवडणूक सांगेलच. मात्र, त्याचबरोबर या मुखंडांचे थोबाडही मतपेट्यांतून रंगवेल. या साऱ्या नाटकांची सुरुवात तीन-चार महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. आता कामातून बाहेर गेलेल्या या सगळ्याच मंडळींनी येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळविण्याचा चंग बांधला आहे.

 

अमोर पालेकर या सगळ्या कथानकाचे सूत्रधार. देशातल्या असहिष्णुतेच्या कथा आळवताना ते स्वत: किती असहिष्णू झाले, याचे किस्सेच्या किस्से सांगितले जाऊ शकतात. आपल्या भाषणात त्यांनी एक कथा हातोहात खपविली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात नयनतारा सेहगलांचे मुखवटे घालून आलेल्या महिलांना कसे बाहेर काढले गेले, याची रम्य कथा पालेकर सांगातात. वस्तुत: असे काहीही झाले नव्हते. ज्या महिला नयनतारा सहगलांचे मुखवटे घालून आल्या होत्या, त्या स्वागताध्यक्षांचे भाषण सुरू असताना मध्येच उभ्या राहून माध्यमांचे लक्ष वेधू लागल्या. त्यामुळे झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे त्यांना बाहेर काढावे लागले. खरं म्हणजे, भाषण सुरू असताना असले आचरट चाळे करणे म्हणजे, स्वागताध्यक्षांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घालाच होता. पण, स्वत:च्या अभिव्यक्तीशिवाय अन्य कुणाच्याही अभिव्यक्तीची चिंता न करणाऱ्या बौद्धिक दहशतवाद्यांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? पालेकरांच्या अतिरेकाचा दुसरा प्रसंग मुंबईतला आहे. बरवे नावाच्या ख्यातनाम चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले होते. चित्रकार म्हणून त्यांचे काम लोकांसमोर यावे, असा या प्रदर्शनामागचा उद्देश होता. पालेकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोहोचले खरे; पण बरवेंच्या कामाची महती सांगायची सोडून देशात कसे असहिष्णुतेचे वातावरण वाढत आहे, याची टेप वाजवायला त्यांनी सुरुवात केली. आयोजकांनी जेव्हा त्यांना तसे न करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गळचेपीचा कांगावा सुरू केला.

 

अशीच गोष्ट गिरीश कर्नाड यांची. ‘नागमंडलम’ सारख्या नाटकांतून स्वत:ची प्रतिभा सिद्ध करणारा हा माणूस. वस्तुत: स्वत:ला ‘डावे’ म्हणविणारे हे लोक स्वत: वापरत असलेल्या प्रतिभांतून आपणच हिंदू संस्कृतीतली प्रतिके वापरत आहोत, याचा विचार कधीही करीत नाहीत. गळ्यात, ‘मीसुद्धा शहरी नक्षलवादी’ असा फलक लावून जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावताना, शहरी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भीमा-कोरेगाव सारख्या घटना यांना त्रास देत नाहीत. दलित-सवर्ण दंगल ही महाराष्ट्राच्या समाजजीवनातील मोठी खोल जखम. नामांतराच्या प्रश्नानंतर ही जखम भरली होती. आता भीमा-कोरेगावच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जाती-जातीमध्ये विष पेरण्याचे काम या मंडळींनी ज्या प्रकारे केले आहे, ते पाहाता पुढचा कितीतरी काळ या दोन जातीतली दरी भरून जायला लागेल, हे स्पष्ट आहे. हेच सामाजिक वास्तव आहे व या मंडळींना जी मोदीद्वेषाची काविळ झाली आहे, त्यातून पलीकडचे काहीच दिसत नाही. आपण मुस्लीम आहोत, त्यामुळे आपल्याला वेगळी वागणूक मिळाली, असा भास नसिरुद्दीन शहा यांना झाला आहे. या भासातूनच नसिरुद्दीन शहा या चळवळीत सहभागी झाले आहेत. इतकी वर्षे हे लोक इथे काम करीत आहेत, कमावत आहेत, इथल्या मातीत पिकलेले खात आहेत. यापूर्वी कधीही इथे दुजाभाव दिसला नाही. मात्र, आता या मंडळींना निरनिराळे भास होऊ लागले आहेत.

 

मूळ मुद्दा असा की, यातील कुणालाही नेमके काय घडले आहे, याची पुरेशी माहिती देता येणार नाही. आपल्या कुठल्याही वक्तव्यावर हे लोक ठाम नाहीत. असहिष्णुतेच्या ज्या गोष्टी हे सांगतात, त्याच्यापेक्षा कितीतरी भयावह गोष्टी या देशाच्या इतिहासात घडल्या आहेत. शिखांचे हत्याकांड असो, काश्मिरी हिंदूंची ससेहोलपट असो, गोध्रात रेल्वे जाळण्याचा प्रकार असो, यातील किती लोकांनी यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली आहे? मिझोराममधील रियांग जमातीचे सुमारे ३० हजार लोक आज आपली जमीन, घरे सोडून त्रिपुरामध्ये विस्थापितांचे जीवन जगत आहेत. ख्रिस्ती होण्यास नकार दिल्यानेच ही मंडळी आज विस्थापित झाली आहेत. या सगळ्यावर या मंडळींचे काहीच मत नाही. असेल तर ते कुठे नोंदविल्याचे कुणाला माहीत नाही. ते सापडणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे, या सगळ्यांना ‘मोदीफोबिया’ने झपाटले आहे. यांच्या आव्हानांना अन्य कुठेही जागा नाही, त्यामुळे केवळ माध्यमातून ही बोंबाबोब सुरू आहे. जशी निवडणूक संपेल, ही मंडळी आपापल्या कामात मश्गुल होतील.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@